घटस्फोट, अब्रू नुकसानी, दोघांनाही दंड ; जॉनी डेप Vs एंबर हर्ड असं आहे संपुर्ण प्रकरण

जॉनी डेप-एम्बर हर्ड आणि त्यांचा हायप्रोफाईल घटस्फोट जो जगभरात गाजला. हे सगळं प्रकरण एखाद्या पिक्चरच्या स्टोरीपेक्षा कमी नाहीये. 

तसा तर त्यांचा अन आपला काही थेट संबंध नाहीये पण सोशल मीडिया असो वा बातम्या असोत सगळीकडे या दोघांच्याच चर्चा आहेत. या दोघा नवरा-बायकोच्या डिवोर्स आणि मानहानीच्या केसमध्ये कुणी म्हणतंय जॉनीने एम्बर हर्डवर घरघुती हिंसाचार केलाय तर कुणी म्हणतंय जॉनी डेपवर त्याच्या बायकोने म्हणजेच एम्बरने अत्याचार केलाय. 

नुकताच या केसचा निकाल लागला आणि जॉनी डेपने ही केस जिंकली. 

काही लोकांना तर ही केसच माहिती नाही म्हणूनच जगभरात गाजणारं हे प्रकरण जरा विस्कटून सांगा असं त्यांचं म्हणणं आहे. 

आणि ज्यांना ही केस माहितीये ते म्हणतील लैंगिक शोषणाचे आणि घरघुती हिंसाचाराचे आरोप तर जॉनीवर झाले होते असं असतांना तो कसा काय ही केस जिंकू शकतो? असा प्रश्न विचारला जातोय.

याच प्रकरणात आणखी एक ट्विट म्हणजे इलॉन मस्कचं देखील या केसमध्ये नाव आलं.

तर विषय आहे पायरेट्स ऑफ कॅरेबियनमधला कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणजेच जॉनी डेप आणि त्याची एक्स वाइफ एम्बर हर्डचा. 

जॉनी आणि एम्बरची लव्हस्टोरी २००९ ला सुरु झाली. ते पाहिल्यान्दा हॉलिवूड चित्रपट ‘द रम डायरी’च्या सेटवर भेटले होते. ६ वर्ष डेटिंग चाललं आणि २०१५ मध्ये त्यांनी लग्न केलं. २०१६ मध्ये एम्बरने आरोप केले कि, जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करतो पण जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले. अशा पद्धतीने २०१७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. अन तो घटस्फोट अजूनही गाजतोय कारण जॉनीने त्याच्या एक्स वाइफवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. 

त्याला कारण ठरलं एम्बरने लिहिलेलं एक आर्टिकल. 

२०१८ मध्ये तिने वॉशिंग्टन पोस्टमध्ये ओपिनियन पोस्ट लिहिली होती कि, मी लैंगिक शोषणाची आणि घरगुती हिंसाचाराची कशी बळी ठरले, मी स्वतःला त्यातून कसं वाचवलं, बायकांवर कशी हिंसा होते हे बदलले पाहिजे वैगेरे वैगेरे.

पण या लेखामध्ये तिने जॉनी डेपचे नाव न घेता इनडायरेक्टली त्याच्याकडे बोट दाखवलं होतं. त्यानंतर तिला बरीच सहानुभूती मिळाली होती. ती फेमस होत होती पण तेच दुसरीकडे त्या पोस्टनंतर जॉनी डेपचं आयुष्यच बदललं. 

३ वेळेस ऑस्कर नॉमिनेट झालेल्या जॉनीची इमेज खराब झाली, त्याला चित्रपटांमधून काढून टाकण्यात येत होतं.

 मग जॉनी डेपने दावा केला की याच लेखानंतर त्याचे वाईट दिवस सुरु झाले. मग त्याने एम्बर हर्डवर ५० मिलियन डॉलरचा दावा ठोकला, मानहानीचा खटला दाखल केला. त्याला उत्तर देण्यासाठी एम्बर हर्डने जॉनीवर घरगुती आणि लैंगिक हिंसाचाराचा आरोप करत १०० मिलियन डॉलरचा दावा ठोकला. याच खटल्याची सुनावणी गेले ६ आठवडे चालू होती तीही लाइव्ह ब्रॉडकास्ट होत होती. अक्ख जग हा खटला लाईव्ह बघत होतं आणि या ६ आठवड्यांच्या खटल्यात रोज नवे-नवे धक्कादायक खुलासे दोन्ही बाजूंकडून केले जात होते. 

एम्बरने जॉनीवर असे आरोप केलेले कि, तो दारू घेतल्यावर तिच्यावर अत्याचार करत असायचा मारहाण करत असायचा. 

तर जॉनीने एम्बरवर आरोप केले कि, 

एम्बरला भांडणाची सवयच होती. ती कायम टॉक्सिक बोलायची अनेकदा ती व्हॉयलेन्ट व्हायची आणि जॉनीच्या थोबाडीत मारायची. कधी रिमोट तर कधी वाईनचा ग्लास फेकायची ज्यामुळे त्याचे मधले बोट कापले गेले.

एकदा जॉनी झोपेतून उठला आणि त्याच्या बाजूला मानवी विष्ठा पडलेली होती. 

जॉनी डेपच्या वकिलांच्या मते एम्बर जॉनीवर मानसिक अत्याचार करायची आणि ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतः पीडित असल्याचं नाटक करत होती. या खटल्यात थेरपिस्ट आणि फॉरेन्सिक सायकॉलॉजिस्टची देखील साक्ष घेण्यात आली. जॉनी डेपच्या  सायकॉलॉजिस्टच्या मते एम्बरला दोन प्रकारच्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत.

या सगळ्यामध्ये एक मोठा ट्विट तेंव्हा आला जेंव्हा टेस्लाचे मालक इलॉन मस्कचं यात नाव आलं. 

या सुनावणीच्या वेळेस एकूण १२० लोकांची साक्ष घेण्यात आलेली. त्यात जेम्स फ्रँको, इलॉन मस्कसारख्या हायप्रोफाईल लोकांचाही समावेश होता.  

जॉनीने असा आरोप केलेला कि, डिवोर्स होण्याच्या आधीच एम्बर आणि इलॉन यांच्यात अफेअर सुरू झालं होतं. मात्र इलॉन मस्कने हे आरोप फेटाळले होते. 

आमचं अफेअर होतं मात्र दोघांच्या डिवोर्सच्या एका महिन्यानंतर सुरु झालं होतं असं इलॉन मस्कचं म्हणणंय. २०१७ मध्ये एम्बरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत त्याची कबुलीही दिली होती. 

एम्बर जरी कोर्टात रडत रडत मी अत्याचार पीडित आहे असं सांगता होती मात्र तितक्यात दुसरा ट्विस्ट आला तो म्हणजे जॉनी डेप आणि एम्बरची एक ऑडिओ क्लिप जी इंटरनेटवर वणव्यासारखी पसरली होती. 

या ऑडिओ क्लिपमधून एम्बर नाही तर तिचा नवरा खऱ्या अर्थाने घरगुती हिंसाचाराचा बळी ठरला होता हे स्पष्ट होत होतं. 

ऑडिओ क्लिपमध्ये ती मान्य करते ती अनेकदा स्वतःवरचा संयम गमावून बसते आणि हिंसक होते. यातच तिने जॉनीला मारहाण केल्याचंही मान्य करते. याबाबत जॉनीने अनेकवेळा समजावूनही सांगितलं होतं. 

अशाप्रकारे जॉनी आपल्या बाजूने एका पाठोफाठ एक असे जबरदस्त साक्षीदार आणि पुरावे सादर करत होता तर एम्बर तिच्या स्टेटमेन्टवरून यू-टर्न घेताना दिसत होती.

अखेर वॊशिंग्टनच्या व्हर्जिनिया कोर्टाने याबाबत निर्णय दिला. जॉनी डेपने केस जिंकली. या प्रकरणात दोघांचीही अब्रू नुकसानी तितकीच झाली आणि त्याला दोघेही जबाबदार आहेत असा निकाल या कोर्टाने दिला असून, एम्बरने जॉनीला १५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ११६ कोटींची नुकसान भरपाई द्यावी आणि एम्बरला जॉनीने २ मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना कोर्टाने जॉनी डेपला केली आहे. 

केस जिंकल्यानंतर जॉनी डेपने प्रतिक्रिया दिली कि, 

निकाल काहीही लागला असता मात्र मी हा खटला लढण्याचं एकमेव उद्दिष्ट होतं ते म्हणजे सत्य बाहेर आणणं. कारण एम्बरने माझ्यावर जे खोटे आरोप केले त्या आरोपांच्या गिल्टमध्ये मी आयुष्य जगू शकलो नसतो त्यामुळे ही केस जिंकणं माझ्यासाठी महत्वाचं होतं”.

जॉनीने हि केस तर जिंकली मात्र एक प्रश्न मात्र समोर येतो म्हणजे, 

एम्बर फक्त एक स्त्री आहे म्हणून तिला या केसमध्ये सहानुभूति मिळत होती मात्र जॉनीचं काय ? 

घरघुती हिंसाचारात फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील बळी ठरतात हे कुणी मान्यच करायला तयार होत नाही..  पुरावा म्हणून सादर केलेल्या ऑडिओ क्लिप्समध्ये एम्बर हर्ड जॉनीला म्हणते, ”तू डोमेस्टिक व्हायोलन्सला बळी पडलाय यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही, तुला हवं तर कुणालाही सांगून बघ.” थोडक्यात तिचं म्हणणं असं आहे, की पुरुषावर अत्याचार होऊ शकतो, यावर कुणी विश्वासच ठेवणार नाही. पण जॉनीमुळे या प्रकरणामुळे वाचा फुटली. 

एव्हड्या प्रगत परदेशात ही परिस्थिती असेल, तर भारतात काय असेल? 

मेन वेलफेअर ट्रस्ट नावाच्या एका भारतीय संस्थेला लॉकडाऊन दरम्यान घरगुती अत्याचाराला सामोऱ्या जाणाऱ्या १ हजार ७७४ पुरुषांचे फोन आलेले. 

२०१९ मध्ये हरियाणाच्या ग्रामीण भागात पुरुषांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबाबत रिसर्च झाला होता. तेव्हा पुढं आलं, की १००० पैकी ५१ टक्के पुरुषांना आपल्या बायकोकडून घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागलं होतं. यात शारीरिक हिंसाचाराचं प्रमाण ६ टक्के आढळलं, पण मानसिक हिंसाचाराच्या घटना ५१ टक्क्यांहून अधिक वेळा घडल्या होत्या. 

यावरून याच गांभीर्य सहज कळतंय..पण अत्याचार होणारे बरेच पुरुष बदनामीच्या भीतीनं ना मदत मागतात, ना कुणाशी बोलतात.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.