लग्नासाठी गोवा मुक्ती संग्रामात उतरलेला जॉनी वॉकर…!

सिनेमातला जॉनी वॉकर. खऱ्या आयुष्यातला बद्रुदीन काझी. पण आपण त्याला जॉनी वॉकर म्हणूनच ओळखतो. या माणसाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या माणसाने कधीही दारूला स्पर्श केला नव्हता. पण सिनेमात याने दारूड्याचेच रोल केले.

जसं निळू फुलेंकडे पाहिल्यानंतर एखाद्याला निळू फुले म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात देखील खुनशी पाटील, नालायक लफडेबाज वाटायचे तसच काहीस जॉनी वॉकरचं होतं. म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात जॉनी वॉकर मनाने एकदम भारी माणूस होता.

आयुष्याच्या सुरवातीच्या काळात जॉनी वॉकर नाशिकमध्ये होते. इथे त्यांनी बरेच छोटेमोठे उद्योग केले. दोन वेळच्या जगण्यासाठी भजी, पेपर, आईसफ्रुट अस सारं काही विकलं. त्यानंतर जॉनी मुंबईला आला. इथे त्याला मुंबईच्या बेस्टमध्ये कंडक्टरची नोकरी मिळाली. याच नोकरीने जॉनीला सिनेमात आणलं. 

बेस्टचा कंडक्टर असताना B96 असा बिल्ला होता. हा बिल्ला जॉनीने आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यन्त जपून ठेवला होता.

तर झालं अस की, बस कंडक्टर सोबत जॉनी सिनेमात एक्स्ट्राचे रोल करु लागला. सिनेमा दुखी, दर्दी असला तरी जॉनीचा रोल जॉलीच असायचा. त्यामुळे पडद्यावर आलेला जॉनी वॉकर लोकांचा खास होवून गेला. खरतर सिनेमा कितीही स्वप्नवत जगातला असला तरी जॉनी सारखं पात्र प्रत्येकाला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसासारखं वाटायचं. हेच जॉनी वॉकर प्रसिद्ध होण्याचं कारण होतं..

तर झालेलं अस की त्याकाळाची अभिनेत्री शकिलाची बहिण नूर ही जॉनी वॉकरची प्रेयसी होती. एका सिनेमाच्या शूटींगवेळी नूर आणि जॉनीची ओळख झाली व या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. 

नूर आणि जॉनीचं हे प्रकरण नूरच्या घरच्यांना कळलं. त्या काळात लव्ह मॅरेज करण्याचा प्रश्नच नव्हता. नूरच्या घरच्यांनी विरोध केला. अशा वेळी सिनेमात काम करणाऱ्या जॉनीला प्रत्यक्ष आयुष्यात हिरोगिरी करण्याची हुक्की आली..

आपल्या लग्नाला विरोध करणार असतील तर आपण पळून जावून लग्न करु ते देखील अगदी फिल्मी स्टाईलने.

जॉनीने पुर्ण प्लॅन तयार केला. तारिख ठरवली १६ ऑगस्ट १९५५.

या दिवशी जॉनी नूरच्या घराजवळ जाणार. तिला विशिष्ट खाणाखूणा करून बाहेर बोलवणार आणि सोबत आणलेल्या टॅक्सीतून हे दोघे पळून जाणार. या दरम्यान नूरच्या घरातल्यांनी काही राडा केलाच तर जॉनीचे मित्र आपल्या दूसऱ्या गाडीत पाठीमागे राहणार असा तो प्लॅन..

ठरल्याप्रमाणे जॉनी दुसऱ्या दिवशी उठला. वास्तविक त्याला जाग आली ती जोरजोरच्या घोषणांनीच. जॉनीने घराबाहेर पाहिलं तर रस्त्यावर प्रचंड जाळपोळ आणि आरडाओरडा चालू होता. बाहेर येवून जॉनीनं पाहिलं तर त्याला कळालं गोवा मुक्ती संग्रामचं आंदोलन पेटलं आहे. सारी मुंबई आंदोलनकर्त्यांनी पॅक केली आहे. आत्ता इथून टॅक्सी मिळणं देखील अशक्य आहे. थोडक्यात प्लॅन फिस्कटल्यात जमा होता.

WhatsApp Image 2022 03 26 at 2.43.52 PM

पण आजचा प्लॅन रद्द झाला आहे हे नूरला कळवणं देखील महत्वाचं होतं.

तेव्हा ना मोबाईल होते ना टेलिफोनचं घराघरात जाळं होतं. मग जॉनीनं अक्कल लावली. एक टॅक्सी कशीबशी करून घेतली. त्यावर मोठ्ठा कर्णा लावला. टॅक्सीवर गोवा मुक्ती संग्रामचा बोर्ड लावला आणि याच टॅक्सीतून तो रस्त्यावरून निघाला.

चौकाचौकात आंदोलक उभे ठाकलेले. पण टॅक्सी पाहून आपलीच टॅक्सी म्हणून आंदोलक टॅक्सी सोडून द्यायचे.

या प्रवासादरम्यान जॉनी जोरजोरात घोषणा देत होता. गोवा किसके बाप का गोवा तो हिंदुस्थानका…!!!

घोषणा देत देत ही टॅक्सी अखेर नूरच्या घराबाहेर पोहचली. स्पीकरवरून सांकेतिक खुणा करून जॉनीने नूरला बाहेर बोलावून घेतले. आज या परिस्थितीत आपण लग्न करणं अशक्य असल्याचं तिला सांगितलं. मात्र हाच प्लॅन दूसऱ्या दिवशी होईल हे सांगायला तो विसरला नाही. दूसऱ्या दिवशी मुंबई शांत झाली

आणि नुरच्या घरात राडा सुरू झाला..  जॉनी नूर ला घेवून पळाला..!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.