जमीन, घरांना तडे गेलेत, उत्तराखंडमधलं सगळं गाव उध्वस्त व्हायच्या वाटेवर आहे…

जोशीमठ हे उत्तराखंड राज्यातलं एक सुंदर आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे. हरिद्वार-बद्रिनाथ या मुख्य मार्गावरच हे गाव वसलेलं आहे. या गावाचा वारसा सांगायचा झाला तर, असं म्हटलं जातं की, शंकराचार्य यांनी स्वत: हे गाव वसवलंय.

हे गाव हिमालयाच्या पर्वतरांगेत अलखनंदा नदीच्या काठावर वसलंय.

हे गाव मुळात डोंगरावर वसलेलं आहे. एकंदरीत नुसता विचार जरी केला की, एखाद्या नदीच्या काठावर आणि त्यातल्या त्यात हिमालय पर्वतरांगेतल्या डोंगरात एखादं गाव वसलंय. तर, त्याचं सौंदर्य काय अन् किती असेल याचा विचार आपण करूच शकतो.

पण सध्या हे जोशीमठ नावाचं ऐतिहासिक आणि अतिशय सुंदर गाव हे चर्चेत आहे ते जोशीमठ धोक्यात आलंय म्हणून.

जोशीमठ या गावात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडायला लागल्यात. या भेगांमधून पाणी बाहेर येतंय. आता हे गाव डोंगरावर वसलेलं असल्यामुळे या गावावर होत असलेल्या या गोष्टींचा परिणाम हा या डोंगरावरही होतोय.

जोशीमठ गावात हे असं का होतंय?

आता हे असं का होतंय याबद्दल बोलायचं झालं तर, सप्टेंबर महिन्यात याविषयी संशोधन करणाऱ्या एका टीमने दिलेल्या रीपोर्टने जोशीमठवर हे संकट ओढावलंय त्यामागची कारणं सांगितली आहेत.

जोशीमठ हे अस्थिर पायावर बांधलं गेलंय, ज्या डोंगरावर हे गाव वसलंय त्या डोंगराचं भुस्खलन होण्याची शक्यता आहे ही कारणं त्या टीमकडून सांगण्यात आली होती.

पण मग, हे सगळं इतक्या वर्षांनी का होतंय?

तर, याचं उत्तर आहे ते आताचं मॉडर्नायझेशन. म्हणजे विषय असाय की आता त्या जोशीमठ या सुंदर गावाचं शहर बनवण्याच्या नादात त्या गावात जे कन्स्ट्रक्शन सुरू झालं ते या मागचं एक प्रमुख कारण आहे.

याशिवाय, याशिवाय पिढ्यांनुसार तिथली मूळ लोकसंख्या वाढत गेली. ही वाढती लोकसंख्या हे जोशीमठवर ओढवलेल्या संकटाचं कारण आहे. कारण जितकी लोकसंख्या वाढत गेली तितका तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवरचा ताणही वाढत गेला.

याशिवाय, अतिवृष्टी हा नैसर्गिक मुद्दाही या मागचं कारण आहे.

याचे परिणाम नेमके काय होतायत?

या सगळ्याचा परिणाम म्हणून जोशीमठ इथे जमिनीला तडे जातायत, भेगा पडतायत आणि या जमिनीला पडलेल्या भेगांमधून पाणी बाहेर येतंय. या सगळ्या संकंटांमुळे आता जोशीमठमधील जनताही घाबरलीये.

स्थानिक जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जवळपास साडे पाचशे घरांमध्ये या अश्या भेगा पडल्या आहेत तर त्यातली १०० घरं ही राहण्यासाठी योग्य नाहीत.

थंडीच्या दिवसात भुस्खलन होण्याची शक्यता अधिक असल्याचंही बोललं जातंय. तर, जिथे भुस्खलन होऊ शकतं अश्या क्षेत्रात ५७४ घरं आहेत आणि या ५७४ घरांमध्ये जवळपास ३,००० नागरिक राहतात.

प्रशासनाने हेल्प लाईन क्रमांक जारी केलाय.

जोशीमठ इथल्या मुख्य पोस्ट ऑफिसला तडे गेलेत. त्यानंतर हे पोस्ट ऑफिस दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय. याशिवाय मुद्दा असाय की, या घटनेनंतर नागरिकांमधली भीती वाढलीये. त्यामुळे प्रशासनाने दुर्घटना झाल्यास दुर्घटनाग्रस्तांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय. ८१७१७४८६०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचंं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

हा वाढता धोका लक्षात आल्यानं इथले नागरिकही आक्रमक झालेत.

आता हा धोका वाढत चालला असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप करत जोशीमठमधील रहिवासी हे आक्रमक झालेत. त्यासाठी त्यांनी २४ डिसेंबर रोजी मशाल मोर्चाही काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी या पडणाऱ्या तड्यांसाठी आणि जमिनीतून निघणाऱ्या पाण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात ही मागणी करण्यात आली.

मोर्चाचा परिणाम म्हणून समिती स्थापन झाली.

जोशीमठ इथली नेमकी समस्या समजून घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी एक पाच सदस्यांची टीम तयार करण्यात आली. भूगर्भशास्त्रज्ञ, अभियंते आणि अधिकारी अश्या विभागात काम करणारे लोक या टीममध्ये आहेत. या टीमने त्यांचं परिक्षण केलेलं आहे. या टीमच्या म्हणण्यानुसार झाडं आणि पर्वत तोडण्याचा परिणाम म्हणून भुस्खलन होतंय

आता सरकार काय करणार?

सरकारद्वारे सध्या जोशीमठ इथली सर्व बांधकामं थांबवण्यात आलेली आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी आश्वासन दिलंय की, आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क झालं आहे आणि रहिवाशांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था केली जात आहे.

बरं या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशीही सांगितली जाते की, १९७६ साली मिश्रा कमिटीने भविष्यात जोशीमठवर असं संकट ओढावू शकतं असा अंदाज वर्तवला होता.

जोशीमठ या या सुंदर आणि ऐतिहासिक गावात हे जे काही होतंय त्याला काही अंशी अतिवृष्टी सारखी नैसर्गिक बाब कारणीभूत असली तरी, सर्वात मोठी कारण हे तिथे सुरू झालेली कन्सट्रक्शन्स, वृक्षतोड, आणि वाढती लोकसंख्या हीच आहेत, असं सांगण्यात येतंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.