पत्रकाराची कमाल ; सलग ५० व्या वर्षी गाव बिनविरोध करून परंपरा राखली…!

राज्यातील १४ हजार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.

कोरोना संसर्ग अजून ही आटोक्यात आलेला नाही, त्यामुळे निवडणूका न घेता ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात. अशी मागणी सर्वच स्तरांमधून होत होती, अगदी राजकारणी मंडळींनी देखील यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या मागणीला पाठिंबा देत अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या देखील.

मात्र सातारा जिल्ह्यात एक गाव असं आहे जिथे एका पत्रकाराने स्वतःच्या प्रयत्नांतून गावाची ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात शंभू महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेलं १ हजार लोकसंख्येचं वाण्याचीवाडी गाव.

सातारा पुढारी आवृत्तीचे संपादक हरीष वसंतराव पाटणे यांच्या एका शब्दावर अवघ्या अर्ध्या तासात शेवटच्या दिवशी वाण्याचीवाडी ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. ७ सदस्यांनी अर्ज दाखल केले आणि निवडून आले.

मात्र ही निवडणूक गावाच्या इतिहासातील पहिली बिनविरोध निवडणूक नाही, तर हा गेल्या ५० वर्षांचा इतिहास आहे. 

तर, हरिष पाटणे यांच्या वडिलांपासून म्हणजेच वसंतराव पाटणे यांच्यापासून बिनविरोधाची चालत आलेली परंपरा कायम राखली आहे.

साधारण १९७० मध्ये वाण्याचीवाडी गावाची लोकसंख्या अगदी मर्यादित म्हणजे ५०० ते ५५० अशी होती. डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या नकाशावर देखील हे गाव नव्हतं. एक छोटीशी वाडी असल्यामुळे कोणाचं लक्ष नसायचे. विकास नावाच्या संकल्पनेपासून गाव कोसो लांब. त्यामुळे गावातील तरुण देखील काही थोडं फार शिकलं तर शिकलं, नाही तर पोटापाण्यासाठी मुंबईची वाट धरायची. असाच चालायचं.

अशातच गावात निवडणूक लागली.

आधीच विकासाच्या नावानं बोंब, त्यात आणखी कुठं राजकारण करत बसायचं, यामुळे वसंतराव पाटणे आणि त्यांचे सहकारी जगन्नाथ भिलारे, आनंदराव मोरे यांनी पुढाकार घेत गाव पहिल्यांदा बिनविरोध करण्याचं मत मांडल. याला प्रतिसाद देखील मिळाला. आणि त्यानंतर हीच प्रथा गावात चालू झाली.

यानंतर देखील ज्या कारणासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करायची ठरली होती तो मूळ उद्देश मात्र बाजूलाच राहिला होता.

अगदी अलीकडच्या १९९०-९५ च्या काळापर्यंत देखील गावात ना रस्ते होते, ना पाण्याची सोय नीट होती. शौचायलयासाठी देखील असच बाहेर कुठेतरी. पक्की स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यविधी उघड्यावरच उरकून घ्यावे लागत होते.

त्यावेळीच गावातील हरिष पाटणे यांनी शिक्षण पूर्ण करत पत्रकार होऊन आपल्या करियरचा रस्ता म्हणून सातारा गाठलं. त्यांचं पत्रकार म्हणून नाव होऊ लागलं. मात्र ते शहरात आले तरी वडिलांनी चालू केलेली परंपरा विसरले नाहीत.

वडिलांच्या निधनानंतर आता ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी ते पुढाकार घेऊ लागले.

दुसरीकडं पत्रकार म्हंटल कि साधारण एक नेत्यांच्या जवळचा आणि राजकारणी माणूस अशी प्रतिमा सर्वसामान्य लोकांसमोर समोर येते, पण याच जवळीकतेचा स्वतःच्या गावाच्या विकासासाठी विधायक फायदा करून घ्यायचं पाटणे यांनी ठरवलं.

नेते मंडळींची भेट घेऊन स्वतःच्या नाही तर गावाच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून शब्द टाकू लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करून शासनाच्या कोणत्या निधीमधून पैसे आणता येतील याचा आढावा घेऊन त्या योजना गावात राबवायला सुरुवात केली.

यामुळे गावकऱ्यांनी देखील त्यांना गंभीरतेने घ्यायला सुरुवात केली. जरी वडिलांची परंपरा असली तरी आधी गावासाठी काम करून त्यानंतरच ती परंपरा स्वतःच्या हातात घेतली.

त्यानंतर प्रत्येक निवडणुकीची एक यंत्रणा तयार झाली. हरिष पाटणे गावात गेल्यानंतर गावकऱ्यांची बैठक होते. यामध्ये याला गावात राहणारे ग्रामस्थ, मुंबईतील ग्रामस्थ, तरुण सगळेच उपस्थित असतात.

या बैठकीत पहिल्यांदा कोणता उमेदवार इच्छुक असल्यास नाव सुचवले जाते. त्यातील गावकऱ्यांना आणि अखेरचा शब्द म्हणून पाटणे यांना जो उमेदवार योग्य वाटेल तो उमेदवार अंतिम होतो. अशा प्रकारे अर्ध्या ते एक तासात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होते. विरोधात एक हि पॅनल उभं राहत नाही.

जे चांगले काम करतील त्यांना या बैठकीच्या सल्ल्याने पुन्हा एकदा संधी दिली जाते.

पाटणे आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आज गावात सुसज्ज स्मशानभूमी झाली, अंतर्गत रस्ते डांबरीकारणाचे झाले. मुख्य गावात येणार रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार झाला. नुकतेच ४२ लाखांचा निधी पाण्याची मोठी टाकी बांधण्यासाठी मंजूर झाला आहे. लवकच ते काम पुर्ण होवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.

४ वर्षांपूर्वी गावाला ग्रामस्वच्छता अभियानाचा पहिला पुरस्कार मिळाला. त्याच्या आधी आर. आर. पाटील असताना तंटा मुक्त गाव अभियानाचा पहिला पुरस्कार मिळाला.

सगळ्या गावाला चौणेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एकत्र आणलं. त्यामुळे गावात विधानसभेला, लोकसभा अशा निवडणुकांमध्ये कोणता उमेदवार आपल्याला निधी येईल अशाच उमेदवाराला मतदान होते.

हरिष पाटणे यांचे वडिल राजकीय व्यक्तिमत्व होते मात्र ते हरिष पाटणे पत्रकार आहेत, म्हणजेच वेगळ्या फिल्डमध्ये आहेत. तरिही वडिलांनी जपलेली गावची परंपरा पुढे घेवून जाण्यासाठी ते पुढाकार घेतायत हे महत्वाच..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.