दाऊदच्या भावाचा बदला घेणारा बडा राजन मेला आणि छोटा राजनचा उदय झाला…

मुंबई गुन्हेगारी विश्व म्हणजे जिथ मरणाची भीती विसरावी लागायची. जीव मुठीत घेऊन वावरणारे नागरिक, गोळ्यांचा पाऊस पाडणारे गुन्हेगार, चकमकी, टोळीयुद्ध या सगळ्या परिस्थितीतून मुंबई गेली आहे. चोरीच्या आरोपात तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर सुधारण्याऐवजी , आयुष्यात पुढे जायचं असेल तर गुन्हे करणे एवढाच एक मार्ग आहे अस वाटून एका साध्या शिंप्याने मुंबईत दहशत बसवली होती.

या टोळ्यामधील एक टोळी म्हणजे राजन नायर अर्थात बडा राजनची गोल्डन गॅंग.

बडा राजन हा गुन्हेगारी विश्वातील पहिला असा गँगस्टर आहे ज्याने न्यायालयात गोळीबार करून हत्या घडवून आणली होती.

बडा राजन हा बडा कसा बनला आणि त्याच्या आयुष्यात काय गडबडी झाल्या ते आपण बघूया.

राजन महादेव नायर हे त्याचं खरं नाव आणि तो मुळचा केरळचा होता. १९७५च्या सुरवातीला तो एक साधा शिंपी होता. एका मुलीवर त्याचं प्रेम जडलं आणि त्या मुलीने त्याला महागातल गिफ्ट मागितलं. कपडे शिवताना त्याला पगार म्हणून फक्त ३० रुपये मिळायचे.

महागातल गिफ्ट द्यायच्या विचाराने त्याने एका ऑफिसमधून महागतला टाइपरायटर चोरला आणि चोर बाजारात जाऊन विकला त्यातून त्याला दोनशे रुपये मिळाले त्यातून त्याने त्या मुलीला एक महागातली साडी घेऊन दिली.

त्याला मग चोरी करण्याची चटक लागली आणि एके दिवशी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि तुरुंगात रवाना झाला. त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने स्वतची एक टोळी तयार केली आणि तिला गोल्डन gang अस नाव दिलं. घाटकोपर , मानखुर्द, विक्रोळी, भांडूप या ठिकाणी त्याच्या टोळीने जबर दहशत बसवली. रिक्षावाले, दुकानदार या लोकांकडून ते जबरदस्तीने खंडणी वसूल करायचे.

बडा राजनच्या टोळीत अब्दुल कुंजू आणि राजेंद्र निकाळजे हे दोन अत्यंत धडाडीचे लोकं होते आणि ते राजनचे अत्यंत जिवलग मित्र होते. मुंबईतल्या सहकार थेटरात ‘ अमर अकबर अंथोनी ‘ हा चित्रपट तुफ्फान चालला होता. या चित्रपटाची तिकिटे बडा राजनच्या टोळीने ब्लॅक केली आहेत असं पोलिसांना कळल आणि पोलिसांनी धाड टाकली, पण उलट या लोकांनी पोलिसांवरच हल्ला केला त्यात बडा राजनला अटक झाली . राजेंद्र निकाळजे हा तिथून पळून गेला.

बडा राजनला सोडवण्यासाठी राजेंद्र प्रयत्न करू लागला. जेव्हा बडा राजन बाहेर आला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्याचा जिवलग मित्र असणाऱ्या अब्दुल कुंजुने वेगळी टोळी स्थापन करून बडा राजनच्या प्रेयसीशी लग्नही केलं होत.

या प्रकरणाने बडा राजन पेटून उठला आणि कुंजुला संपवण्याचा त्याने निर्धार केला. बडा राजनने कुंजू टोळीवर हल्ला केला आणि त्याच्या लोकांना बेदम मारहाण केली. कुंजुच्या बायकोलाही पळवून नेण्याचा प्रयत्न झाला पण ती सुटली. त्यानंतर हे प्रकरण चांगलचं पेटलं. एकेकाळचे जिवलग मित्र एकमेकांच्या जीवावर उठले होते.

त्याचं दरम्यान दुसरीकडे दाउद इब्राहिमचा भाऊ साबीरला पठाण टोळीने गोळ्या घालून यमसदनी पाठवलं होत. भावाच्या हत्येने दाउद पिसाळला होता काहीही करून तो भावाच्या हत्येचा बदला घेऊ इच्छित होता. त्यासाठी तो योग्य माणूस शोधत होता. तेव्हा त्याला बडा राजन बद्दल कळल की तो सुरवातीला एक साधा टाइपरायटर  चोर ते सध्याचा कुख्यात गुंड आहे. दाउदलाही असाच माणूस हवा होता तेव्हा त्यान बडा राजनला बोलावण धाडलं.

एका मुसाफिरखान्यात दाउद आणि बडा राजन ही भेट झाली. तिथे दाउदने बडा राजनचं खूप कौतुक केलं , त्याच्या प्रवासाविषयी भरभरून तो बोलला, अर्धी मुंबई तुला घाबरते वगैरे अस पुष्कळ बोलण त्यांच्यात झालं. इतका मोठा डॉन आपलं कौतुक करतोय ,आपल्यावर इतका विश्वास दाखवतोय म्हटल्यावर बडा राजन हुरळून गेला आणि त्याने दाउदला वचन दिल की

तुमच काहीही काम सांगा ते काम मी पूर्ण करील.

दाउद याच वाक्याची संधी पाहत होता आणि त्याने पठाण टोळीला संपवण्याचा निर्धार त्याला सांगितला. त्या पठाण टोळीने माझ्या भावाचा जीव घेतलाय त्यांना काहीही करून संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, त्याचा बदला घेण गरजेचं आहे ही सल दाउदने बोलून दाखवली.

पठाण टोळीतील अमीरझादा आणि आलमजेब या दोघांना संपवायचं आहे त्यासाठी लागणारे हत्यारं , पैसे सगळ मी पुरवायला तयार आहे पण ह्या दोघांच्या हत्या तू घडवून आणल्या पाहिजे

असं दाउदने बडा राजनला फर्मावले. दाउदच्या विश्वासाला पात्र ठरावा म्हणून बडा राजनने त्याला वचन दिलं की भाई तुमचं काम झालचं म्हणून समजा.

आणि इथून सुरु झाला एका मोठ्या प्लानचा थरार….

या कामासाठी लागणारे शुटर बडा राजनने धुंडाळणे चालु  केले.  बडा राजनला माहिती देण्यात आली की अमीरझादा हा सध्या तुरुंगात आहे.  तुरुंगात असल्यामुळे त्याला मारणं शक्य नाही पण जेव्हा कोर्टाच्या सुनवाईसाठी त्याला न्यायालयात नेलं जाईल तेव्हा भर कोर्टात आपण त्याला मारू शकतो असा आराखडा बडा राजनने आखला.

या कामासाठी त्याने दोन शुटर्स निवडले ते म्हणजे फीलिप्स पांढरे आणि डेव्हिड परदेशी.

यातला डेव्हिड परदेशी हा २४/२५ वर्षाचा विकृत मानसिकतेचा तरुण होता. डेव्हिडला या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. त्याला ट्रेनिंग देण्यासाठी बडा राजनने  उरण जवळील उल्वा नावाच्या गावाची निवड केली.  या गावात लोकवस्ती अगदीच विरळ होती , आजूबाजूला डोंगर,टेकड्या होत्या तिथ त्याला पिस्तुल चालवायच प्रशिक्षण देण्यात आल.

हा डेव्हिड परदेशी नेम लावायचा, नेम चुकायचा, कोणी काही बोललं हे सुद्धा त्याला कळत नव्हत इतका तो भांबावलेला होता.

काही दिवसांच्या ट्रेनिंग नंतर दाउद कुठवर तयारी आली म्हणून प्रशिक्षणाच्या ठिकाणी गेला आणि डेव्हिड परदेशीची ट्रेनिंग बघून कपाळावर हात मारून घेतला, त्यावेळी दाउद म्हणाला यह लडका कुछ काम का नही हे, दाउदचा सगळा उत्साह उतरला आणि सगळी निराशेची भावना दाउदच्या मनात तयार झाली पण तो बडा राजनला एक शब्दही बोलला नाही कारण त्यांच्यात करार झाला होता. वाट बघत बसण्याखेरीज त्याच्याकडे गत्यंतर नव्हते.

अमीरझादा हा पठाण टोळीचा आणि करीम लालाचा अत्यंत जवळचा माणूस होता. एका चित्रपटाच्या निर्मात्याचं अपहरण केलं म्हणून त्याला पोलिसांनी तुरुंगात डांबल होतं.दाउदची त्याच्या हालचालींवर बारीक नजर होती.

६ सप्टेंबर १९८३ ला अमीरजादा कोर्टात हजर होणार आहे अशी बातमी आली आणि बडा राजनच्या नियोजीत हालचालींना वेग आला. ठरलेल्या नियोजनानुसार डेव्हिड परदेशी हा पिस्तुल घेऊन कोर्टात जाणार आणि अमीरझादाला गोळी घालणार, बाजूच्या खिडकीतून उडी मारणार आणि बाहेर जीप घेऊन असलेल्या बडा राजनसोबत तिथून फरार होणार असा सगळा प्लान होता.

डेव्हिड परदेशी कोर्टात आला आणि समोरून त्याला पोलीस बंदोबस्तात अमीरझादा येताना दिसला. शर्टमधल्या पिस्तुलाजवळ त्याचा हात जायचा खरा पण चुकून एखादी गोळी पोलिसांना लागली तर अजून गोत्यात जाऊ म्हणून त्याचे हात थरथरत होते.

अमीरझादा त्याच्या एकदम टप्प्यात आला आणि त्याने बरोब्बर त्याच्या कपाळात गोळी झाडली ,अमीरझादा तडफडत कोसळला .

न्यायालयात एकच गदारोळ उडाला, गोळी झाडून डेव्हिड परदेशी खिडकीतून उडी मारणार तोच मागून त्याच्या मानेत पोलिसांची गोळी घुसली तो तसाच जखमी अवस्थेत पडून राहिला, आतला गोंधळ आणि गोळीचा आवाज ऐकून काम फत्ते झालं आणि डेव्हिड दुसर्या मार्गाने पळाला म्हणून बडा राजन सुद्धा तिथून पळून गेला.

इकडे डेव्हिड परदेशीला गोळी झाडणाऱ्या सब इन्स्पेक्टर इसाक बागवान यांनी परदेशीची चौकशी सुरु केली. त्यात डेव्हिड परदेशीने दाउद आणि बडा राजनचं नाव घेतलं. दाउद आणि बडा राजनला अटक झाली त्यामुळे दाउद चिडला. दाउद आणि बडा राजन यांच्याविरुद्ध साक्ष द्यायला पोलिसांनी डेव्हिड परदेशीला उभं केलं. दाउद आता परदेशीचा जीव घेणार हे सगळ्यांना कळल होतं. काही दिवसांनी दाउदची सुटका झाली आणि डेव्हिड परदेशीची धावपळ सुरु झाली.

पोलिसांनी डेव्हिड परदेशीला संरक्षण दिलं. त्याचा चेहरामोहरा बदलला पण काही दिवसांनी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला म्हणून बातमी आली.

यावरून लक्षात येत की दाउद सूड घेण्यात किती कट्टर होता. त्याला गोत्यात आणणाऱ्या लोकांनासुद्धा त्याने माफ केलं नाही.

अमिरजादा मारला गेल्याने दाउदचा बदला पूर्ण झाला होता पण करीम लाला प्रचंड दुखी झाला होता कारण त्याचा जवळचा माणूस मारला गेला होता.

पण या प्रकरणात दाउदला मदत कोणी केली याचा तपास करीम लालाने केला आणि बडा राजन हे नाव समोर आलं. बडा राजनला संपवण्याचा करीम लालाने निर्धार केला पण बडा राजन तुरुंगात होता. त्यानेही मग बडा राजनला सुद्धा आपण कोर्टातच मारायचं अस ठरलं. पण ही जोखीम कोण घेणार.

आलमजेबने त्यावेळी पुढाकार घेतला. अमीरजादा आणि आलमजेब हे करीम लालाचे सगळ्यात जवळचे लोकं होते त्यातला एक होता आलमजेब. पण करीम लालाने त्याला हे काम करण्यास मज्जाव केला. मग आलमजेबने अब्दुल कुंजुला शोधून काढला. अब्दुल कुंजूचं आधीच बडा राजनशी वैर होतं म्हणून राजनला संपवण्याचा त्याचाही मानस होता.

आलमजेब आणि कुंजूची भेट झाली , प्लान ठरला . अब्दुल कुंजू हा हुशार होता त्याने बडा राजनला मारण्यासाठी अजून एका जनाचा शोध घेतला आणि तो माणूस होता चंद्रशेखर सफालीका. ज्यावेळी गोल्डन टोळी खंडणी वसूल करायची त्यात हा रिक्षाचालक चंद्रशेखर सुद्धा भरडला जायचा , ही gang त्याच्या बहिणीला सुद्धा त्रास देऊ लागली होती त्यामुळे चंद्रशेखर आधीच वैतागला होता आणि तो या कामासाठी तयार झाला.

अब्दुल कुंजूने चंद्रशेखरला पन्नास हजार रुपये देऊ केले. याबदल्यात चंद्रशेखरला विक्रोळीच्या पार्कच्या बाजूला ट्रेनिंग देण्यात आल.

अमीरजादा मारला गेल्यानंतर २४ दिवसांच्या आत बडा राजनची कोर्टात सुनावणी होती. पण पेशी कधी आहे हे सुद्धा कोणालाही माहिती नव्हत इतकी कमालीची गुप्तता पोलिसांनी पाळली होती. कोर्टात आधीच झालेल्या हत्येमुळे पोलीस प्रचंड सतर्क आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची कडक तपासणी होत आहे. पण कुठूनतरी पठाण टोळीला आणि अब्दुल कुंजुला राजनच्या पेशीची माहिती कळली होती . त्यांचा शुटर तयारच होता.

एका पोलीस गाडीतून बडा राजन पोलिसांच्या गाडीतून उतरला .पोलिसांच्या गराड्यात तो न्यायालयात जाऊ लागला . पोलीस,राजन आणि एकूण सगळेच तणावात होते. कोर्टात हजर झाल्यावर न्यायाधीशांनी पटकन निर्णय दिला आणि पोलीस राजनला घेऊन माघारी फिरले . सगळ्यांना हायसं वाटलं. परत पोलिसांच्या गराड्यात राजन गाडीकडे जाऊ लागला.

पण दोन खुनशी डोळे त्याच्यावर नजर रोखून होते. ते डोळे होते चंद्रशेखरचे. त्याने त्यावेळी कोणाला संशय येऊ नये म्हणून एका आरमाराच्या अधिकाऱ्याचे कपडे परिधान केले होते. तो राजनच्या आसपास फिरू लागला आणि त्याने जवळ जाताच पिस्तुल काढलं आणि त्यातल्या चार गोळ्या राजनच्या शरीरात झाडल्या. त्या झालेल्या प्रकाराने सगळीकडे पळापळ सुरु झाली. राजनचा लागलीच जीव गेला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजनला बघून चंद्रशेखरला काहीच सुचेना, त्याने हातातली बंदूक खाली टाकली आणि तिथेच उभा राहिला. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली.

असा सेम सीन सनी देओलच्या अर्जुन या चित्रपटात घेण्यात आला . त्यामुळे चित्रपट आणि हे दृश्य ठरले.

अशा प्रकारे बडा राजन मारला गेला. या झालेल्या प्रकारामुळे पोलिसांवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. दिवसाढवळ्या कोर्टाच्या परिसरात दोन हत्या झाल्याने प्रचंड दबावाखाली तिथले कामकाज सुरु होते. हे प्रकरण गुन्हेगारी विश्वाला वळण देणारं ठरलं. पुढे बडा राजन मारला गेल्याने राजेंद्र निकाळजे हा पुढे छोटा राजन बनून टोळीचा म्होरक्या झाला.

हे ही वाच भिडू

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.