स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तिरंगा सगळ्यांसाठी नव्हता, आता मात्र तो घराघरात पोहोचतोय..

१९४७ च साल होतं. देशाला अखेर ब्रिटिशांपासून मुक्तता मिळाली होती. अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाचं ते फलित होतं. देशाचे तुकडे होणं हे क्रमप्राप्त होतं, त्यानुसार पाकिस्तानला देखील स्वतंत्र करण्यात आलं. ‘भारत’ उदयास आला होता. नवीन देश म्हणून स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करतोय तेव्हा सहाजिकच अनेक गोष्टी स्वीकारणं गरजेचं होतं.

स्वतःची राज्यघटना, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह तसंच ‘राष्ट्रीय ध्वज’.

२२ जुलै १९४७ रोजी झालेल्या बैठकीत भारताच्या संविधान सभेने राष्ट्रध्वजाचं सध्याचं स्वरूप स्वीकारलं होतं. शिवाय त्याच्या वापरासंदर्भात नियम देखील लावण्यात आले होते.

या नियमांनुसार सुरुवातीला सामान्य लोकांना झेंडा हाताळण्याचा अधिकार नव्हता.

मात्र आता २०२२ उजाडता उजाडता ‘हर घर तिरंगा’ मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली आहे. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा असणार म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिरंगा फडकवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

हा बदल नक्की कसा झाला? नियमावलीत कधी आणि कसे बदल केले गेले? ध्वजाचा हा ऐतिहासिक प्रवास कसा होता? सविस्तर बघूया…

२२ जुलै १९४७ रोजी भारताने सध्याचा तिरंगा फायनल केला. ‘सध्याचा’ यासाठी कारण त्याआधी जवळपास ५ वेळा ध्वजात बदल करण्यात आले होते.

१. ७ ऑगस्ट १९०६ साली तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये फडकवला गेलेला ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो. लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे, मध्यभागी वंदे मातरम् हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र-सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर ८ कमळ असा हा झेंडा होता.

२.  भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामांनी जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये १९०७ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता. केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य होते, तर हिरव्या पट्टयावर ८ तारे होते जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांतांचं प्रतीक मानले जात.

पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावरही ‘वंदे मातरं’ ही अक्षरं होती.

३. १९१७ साली लोकमान्य टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांनी होमरुल चळवळीदरम्यान तिसरा झेंडा फडकवला. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते. पूर्वीप्रमाणे यावर कमळ नव्हती, उलट यावर ७ तारे होते, हे सात तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढले होते.

४. १९२१ साली आंध्र प्रदेशातील बेझवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगांचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचं ते प्रतीक होतं.

गांधीजींनी इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या झेंड्यात घेतलं गेलं.

५. १९३१ साली आजच्या झेंड्यात असलेली रंगांची रचना अस्तित्वात आली. काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचं आणि गटांचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं. पण या ठरावाने या रंगांचा धर्मांशी असलेला अर्थ काढून टाकला.

मग आलं स्वातंत्र्याचं वर्ष… १९४७

१९४७ साली घटना समिती स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती. स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा? हा प्रश्नही घटना समितीत चर्चेला आला होता. १९३१ साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला. चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेलं धर्मचक्र आलं.

यातील केशरी पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक, मधला पांढरा पट्टा शांती आणि सत्याचं प्रतीक, त्यावर असलेलं निळ्या रंगाचं धर्मचक्र गतीचं द्योतक आणि हिरवा रंग सुजलाम-सुफलाम ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून सांगण्यात आलं.

अशाप्रकारे भारताचा राष्ट्रध्वज जन्माला आला. राष्ट्रध्वज म्हणजे देशाची आन-बाण-शान. तेव्हा त्याचा अपमान केला जाऊ नये म्हणून काही नियम आखून देण्यात आले. 

१९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यावर ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्’ने १९५१मध्ये ध्वजासंदर्भात पहिल्यांदा काही नियम जाहीर केले. यानुसार, भारतातील नागरिकांना कोणत्याही दिवशी आपल्या घरावर आणि कार्यालयावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी नव्हती. केवळ उच्चपदस्थ सरकारी व्यक्तींना तो अधिकार होता आणि त्यासाठी देखील नियम होते.

मात्र त्याचा अपमान होऊ नये म्हणून जे नियम घालून देण्यात आले ते The Prevention of Insults to National Honour Act, 1971 नुसार ठरवण्यात आले होते. 

या ऍक्टनुसार राष्ट्रध्वज, राज्यघटना, राष्ट्रगीत आणि भारतीय नकाशा यासह देशाच्या राष्ट्रीय चिन्हांचा अवमान किंवा अपमान करण्यास मनाई करण्यात आली आहे.

या कायद्याच्या कलम २ मध्ये म्हटलंय की, सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जो कोणी व्यक्ती ध्वजाचा कोणत्याही प्रकारे अपमान करताना दिसेल त्याला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येतील.

ध्वजाचा अपमान केव्हा समजला जाईल, याचाही उल्लेख यात केला आहे..

  • तिरंगा कोणत्याही व्यक्तीला किंवा वस्तूला सलाम करण्यासाठी फडकवणे
  • विशिष्ट प्रसंग वगळता अर्ध्या उंचीवर तो फडकवणे
  •  सशस्त्र दले, इतर निमलष्करी किंवा कोणत्याही सरकारी अंत्यविधी वगळता त्याचा ड्रेपरी म्हणून वापर करणे 
  • ध्वजावर कोणत्याही प्रकारच्या आकृती काढणं
  • राष्ट्रध्वजापेक्षा अधिक उंचीवर दुसरा झेंडा फडकवू नये.
  • त्याचा वापर पुतळा, स्मारक किंवा व्यासपीठ झाकण्यासाठी करणं
  •  उशी, रुमाल, नॅपकिन किंवा कोणत्याही ड्रेस मटेरियलवर त्याची प्रिंट वापरणं 
  • ध्वज जमिनीला टेकू देणं, पाण्यात वाहून देणं किंवा उलट्या पद्धतीने फडकावणं

अशा सगळ्या गोष्टींचा अपमानाच्या प्रकारांत समावेश करण्यात आला. 

२००२ मध्ये मग ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया’ ही ध्वजसंहिता आखून देण्यात आली. फ्लॅग कोडने ध्वजाच्या योग्य प्रदर्शनाचे नियम अधिसारखेच ठेवले फक्त यापूर्वीचे सर्व कायदे आणि प्रथा एकत्र आणण्याचा हा एक प्रयत्न होता. यात ध्वजाचा आकार, निर्मिती, रंग आदी सर्वच बाबतींत नियम लागू करण्यात आले.

शिवाय या ध्वजसंहितेने सार्वजनिक आणि खाजगी संस्था आणि शैक्षणिक संस्थांद्वारे ध्वज प्रदर्शित करण्यावरील बंधने दूर केली. फक्त १९७१ च्या ऍक्टमधील अपमान होणार नाही याचे नियम पळाले जावेत असं सांगण्यात आलं.

नव्या ध्वजसंहितेनुसार भारतातील प्रत्येक नागरिक राष्ट्रध्वज फडकवू शकतो. 

या ध्वजसंहितेचे सोयीसाठी तीन भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात राष्ट्रध्वजाचं सर्वसाधारण वर्णन आहे. दुसऱ्या भागात सामान्य जनता, शैक्षणिक संस्था आणि खासगी संस्थांसाठी ध्वजारोहणासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. तिसऱ्या भागात राज्य आणि केंद्र सरकार आणि त्यांच्या संघटनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत.

यातील नियम बघूया… 

१. ध्वजाच्या निर्मीतीबद्दल देण्यात आलेल्या नियमांनुसार, यापूर्वी फक्त हाताने कातलेले, विणलेल्या झेंड्यांना अनुमती होती. लोकर, कापूस किंवा रेशीम खादी पासून त्यांची निर्मिती करण्याची परवानगी होती. फॅब्रिकच्या प्रत्येक चौरस सेंटीमीटरमध्ये फक्त १५० धागे असतील, प्रति शिलाई चार धागे आणि एका चौरस फूट फॅब्रिकचे वजन २०५ ग्रॅम असावं.

शिवाय याची निर्मिती कोण करेल यासाठीचे नियम ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड या समितीने निश्चित केले होते. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. भारतात ध्वज निर्मिती युनिट्स स्थापन करण्याची परवानगी खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे देण्यात आली आहे. तर बीआयएसला मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणाऱ्या युनिट्सचे परवाने रद्द करण्याचा अधिकार आहे. 

सध्या हुबळीतील कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ हे भारतातील एकमेव परवानाधारक ध्वज उत्पादन आणि पुरवठा युनिट आहे. ध्वजासाठीची खादी उत्तर कर्नाटकातील धारवाड आणि बागलकोट जिल्ह्यातील दोन हातमाग युनिटमधून मिळते. 

२. सूर्योदयाच्या वेळी ध्वजारोहण आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्वज उतरवणं कायद्याने बंधनकारक आहे. काही खास प्रसंगी सार्वजनिक इमारतींवर रात्रीच्या वेळेसही ध्वज फडकावता येतो. इतर देशांच्या राष्ट्रध्वजांबरोबर ध्वज फडकवायचा असेल, तर त्यासाठी असणाऱ्या खास नियमांचं पालन करावं लागतं.

नॉन नॅशनल फ्लॅग्ज म्हणजे कॉपोर्रेट फ्लॅग किंवा अॅडव्हर्टायझिंग बॅनरबरोबर ध्वज फडकावयाचा असल्यास राष्ट्रध्वज मध्यभागीच असायला लागतो. मिरवणुकीच्या वेळेसही राष्ट्रध्वज अग्रभागी असायला लागतो.

३. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री या महत्त्वाच्या व्यक्तींच्याच गाडीवर राष्ट्रध्वज लावण्यास परवानगी आहे. अन्य कोणालाही आपल्या गाडीवर ध्वज लावता येत नाही. तसेच राजकीय महत्त्वपूर्ण व्यक्ती परदेशात जात असल्यास त्या विमानावर राष्ट्रध्वज लावता येतो. महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यास ध्वज अर्धा उतरवण्यात येतो.

४. ध्वज खराब झाल्यास तो जमिनीखाली पुरून किंवा जाळून नामशेष करावा लागतो; पण त्या वेळीसुद्धा त्याचा यथोचित मान राखायला लागतो.

अशा या ध्वजसंहितेत २ वेळा बदल करण्यात आले आहेत.

३० डिसेंबर २०२१ च्या सुधारणेनुसार राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या, विणलेल्या किंवा मशीनपासून बनवला जाऊ शकतो. कापूस, पॉलिस्टर, लोकर, रेशीम खादीपासून त्याची निर्मिती केली जाऊ शकते.

२० जुलै २०२२ रोजी केंद्राने भारतीय ध्वजसंहितेत सुधारणा करून राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री देखील फडकविण्यास परवानगी दिली. यापूर्वी केवळ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान तिरंगा फडकवता येत होता.

तर ‘हर घर तिरंगा’ मोहीम फत्ते करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ध्वजांची निर्मिती करावी लागणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणून चीनमधून पॉलिस्टर मेड ध्वज आयात करण्याची परवानगी दिली आहे. याच निर्णयाला विरोधी पक्षांकडून विरोध होतोय.

मशीनमेड आणि पॉलिस्टर फ्लॅगच्या वापरास परवानगी देणाऱ्या नव्या नियमामुळे खादीच्या झेंड्यांच्या मागणीला खीळ बसली आहे, असं कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाचं म्हणणं असून त्यांनी ध्वजसंहितेत केलेल्या सुधारणांचा निषेध केला आहे.

तर पॉलिस्टरपासून बनवलेल्या तिरंग्याच्या आयातीला परवानगी देऊन ‘प्रत्येक घरात चीननिर्मित तिरंगा’ अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

अशा ‘खादी ते पॉलिस्टर’पासून बनवण्यात येणाऱ्या ध्वजाच्या प्रवासात ‘मंत्रालय ते सामान्य व्यक्ती’ असा देखील एक प्रवास ध्वजाने केला आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.