विराट, रोहितची विकेट, मॅन ऑफ द मॅच, पण मुकेश म्हणतो “ज्यादा कुछ नहीं, अच्छा लग रहा है”

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, आयपीएलमधली सगळ्यात हाय व्होल्टेज मॅच. यंदाच्या आयपीएलमधली ही मॅच मारली चेन्नई सुपर किंग्सनं. चेन्नईच्या विजयाचे दोन हिरो होते, एक मॅच फिनिश करणारा महेंद्रसिंह धोनी आणि मुंबईला अगदी सुरुवातीपासून हादरे देणारा, मॅन ऑफ द मॅच ठरलेला मुकेश चौधरी.

मॅच संपली आणि सोशल मीडियावर लोकांनी धोनीचं आणि त्याच्या बॅटिंगचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं. आम्हीही धोनीचं कौतुक केलंच, पण त्याआधी मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या मुकेश चौधरीला अभिनंदनाचा मेसेज टाकला.

त्याला मुलाखतीसाठी विचारलं, तर गडी म्हणला, ”थोडी देर में करते है.”

आता आयपीएलचा मॅन ऑफ द मॅच, लोकांच्या चर्चेचा विषय असणारा प्लेअर खरंच फोन करेल का याबाबत शंका होती. पण मुकेशचा स्वतःहून फोन आला.

त्याला पहिला प्रश्न विचारला, ”मुंबई इंडियन्स के अगेन्स्ट मॅन ऑफ द मॅच, विराट कोहली और रोहित शर्मा की विकेट, कैसा लग रहा है..?”

वाटलेलं की लांबलचक उत्तर देईल,

पण मुकेश म्हणला…”कुछ नहीं, अच्छा लग रहा है.”

मुकेश चौधरी. लेफ्ट आर्म पेस बॉलर. यंदाच्या आयपीएल आधी हे नावही तुम्हाला माहीत नसेल, जेव्हा त्यानं चेन्नईकडून पदार्पण केलं तेव्हा तुम्ही त्याला पहिल्यांदा खेळताना पाहिलं असेल. ही आयपीएलमधल्या आणि आयपीएल आधीच्या मुकेशची गोष्ट. थोडी त्याच्या तर थोडी आमच्या शब्दात.

राजस्थानमधल्या भिलवडा गावाचा हा मुलगा. चांगला अभ्यास करेल, म्हणून घरच्यांनी बोर्डिंग स्कुलला टाकलं, तेही पुण्यात. पोरगं तसं अभ्यासात हुशार, पण शाळेत टेनिस बॉलवर खेळता खेळता त्याला क्रिकेटची गोडी लागली. ही क्रिकेटची गोडी त्याला घेऊन आली मैदानावर.

पुण्याच्या २२ यार्ड्स क्रिकेट अकादमीमध्ये राजेश माहुरकरांच्या कोचिंगमध्ये मुकेशच्या क्षमतेला पैलू पडत गेले. पुढं मुकेशची निवड एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये झाली, जिथं झहीर खान, ब्रेट ली, जवागल श्रीनाथ असे कित्येक बाप फास्ट बॉलर्स बनले. तिथं मुकेश घडला आणि घडतोयही.

सीके नायडू स्पर्धेपासून देशांतर्गत स्पर्धांमध्ये चमकायचा सिलसिला त्यानं कायम ठेवला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यानं रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. २०१९-२० पासून तो महाराष्ट्राच्या पेस बॉलिंगचा आधार बनला.

रणजी स्पर्धा असेल किंवा सईद मुश्ताक अली मुकेशच्या नावापुढं विकेट्सचे आकडे सातत्यानं वाढत होते. आता गरज होती, एका मोठ्या ब्रेकची… असा ब्रेक जो मुकेशचं टॅलेंट आणखी मोठ्या स्टेजवर आणेल.

मग आली आयपीएल…

सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स अशा दिग्गज कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या संघात मुकेश नेट बॉलर होता. २०२१ मध्ये त्यानं चेन्नईच्या खेळाडूंना, कोचेसना नेट बॉलर म्हणून प्रभावित केलं आणि २०२२ मध्ये तो ब्रेक आलाच.

वीस लाखांच्या बेस प्राईजवर चेन्नई सुपर किंग्सनं त्याला संघात घेतलं.

चेन्नई ही साहजिकच आयपीएलमधली बडी टीम. ‘खेळण्याचं दडपण होतं का?’ असं विचारल्यावर मुकेश म्हणतो… ‘बोहोत जादा प्रेशर नही था. बस जिस जिस पे काम किया था वही सब करना था.’

त्याला पहिल्यांदा संधी मिळाली, ती लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्धच्या मॅचमध्ये. शेवटच्या ओव्हरला ९ रन्स डिफेन्ड करण्याच्या टास्कमध्ये मात्र त्याला अपयश आलं. चुकून कधीतरी क्रिकेट बघणाऱ्या फॅन्सनं त्याची मापं काढली. पण मुकेशला स्वतःवर विश्वास होता.

त्या मॅचनंतरचा अनुभव तो सांगतो, ”बहोत बुरा लगा था. पर सिनिअर प्लेअर्स, टीममेट्स और कोचेसने बताया की ये अलग लेव्हल है. थोडी देर लगेगी. मैने भी खुदके उपर भरोसा रखा था.”

पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये त्याची धुलाई झाली. पण सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यानं चांगलं कमबॅक केलं. याच मॅचमध्ये त्यानं एक भारी गोष्ट केली, ती म्हणजे केन विल्यम्सनची विकेट काढली. पण मोठ्या प्लेअर्सची विकेट काढण्याचा सिलसिला इथेच थांबला नाही.

विराट कोहलीला बॉलिंग टाकताना मोठमोठ्या बॉलर्सला प्रेशर असतं, तिथं मुकेशची तर सुरुवात होती. पण भावानं आपल्या पहिल्याच बॉलला विराट कोहलीला आऊट केलं. रोहित शर्माची विकेट घ्यायला त्याला २ बॉल लागले, तर ईशान किशनच्या दांड्याही पहिल्याच बॉलला उडवल्या. फॉर्म मध्ये असणाऱ्या बेबी एबीची विकेट घेत त्यानं मुंबईला तिसरा हादराही दिला.

मोठ्या प्लेअर्सच्या विकेट काढल्यावर कुठलाही माणूस त्यावर किमान तासभर गप्पा हाणू शकतो.

पण मुकेश म्हणतो, ”अच्छा लगा जब विकेट मिली. थोडा प्रेशर था क्योंकी ये तुम्हारे अच्छे बॉल पर भी बडे शॉट्स खेल सकते है. तो बुरे बॉल पे तो पक्का सिक्स फोर है. पर में अपने बेसिक्स पे अडा रहा. और विकेट्स मिल गयी.”

कसलाच माज नाही, स्वतःचा मोठेपणा सांगणं नाही. धोनीबद्दल बोलतानाही आपल्याला काय टिप्स मिळाल्या एवढंच सांगणं. स्वतःचं कौतुक केलेलं सांगितलं नाय. एकदम निवांत.

मुकेश आपल्या करिअरबद्दल बोलताना म्हणाला, ”मैने कभी सोचा नही था, की क्रिकेट खेलूंगा. २२ यार्ड्स, डेक्कन जिमखाना और महाराष्ट्र क्रिकेटने मुझे मौका दिया. चेन्नई सुपर किंग्सने भरोसा रखा. अब यहातक पहुंचा हूँ.”

एवढं सगळं सांगताना मुकेश एक गोष्ट विसरतो, भिलवडामधून एक पोरगं बोर्डिंग स्कुलमध्ये येतं आणि आयपीएलच्या स्टेजवर चमकतं यात सगळ्यात मोठा वाटा त्याच्या मेहनतीचा आणि आत्मविश्वासाचा असतो. त्यानं स्टम्प हवेत उडवले खरे, पण पाय मात्र अजूनही जमिनीवरच आहेत.

फोन ठेवताना मुकेशला विचारलं, घर पे माहोल कैसा है? त्याचं उत्तर होतं…

“घर पे सब खुश है, उनको भी अच्छा लग रहा है.”  

  • भिडू चिन्मय साळवी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.