कृषी कायदे रद्द केले आता शिखांना आकर्षित करण्यासाठी भाजपने सोशल इंजिनिअरींग सुरु केलेय.
येत्या २०२२ मध्ये यूपीच्या विधानसभा निवडणूका जवळ येऊन ठेपल्यात. सगळेच राजकीय पक्ष प्रत्येक गटाच्या मतदार गटाला आकर्षित करायच्या प्रयत्नात लागेलेले आहेत. त्यात अलीकडेच मोदींनी आगामी निवडणुकींना केंद्रस्थानी ठेवून तीन कृषी कायदे रद्द केले आणि मोठ्ठा बॉम्ब टाकलाय…
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी नड्डा सोमवारपासून राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत…तसेच अप्रत्यक्षपणे नड्डा यांनी पक्षाच्या प्रचाराची सुरुवात केली आहे.
त्याचाच भाग असलेले मुद्दे म्हणजे, आता भाजप कृषी कायदे रद्द करून आता शिखांना आकर्षित करण्यासाठी सोशल इंजिनिअरींगची तयारी केलीये…त्यातली पहिली पायरी तर पडलीच आहे. आता हळूहळू भाजप नेते शिखांसाठी भाजपने त्यातल्या मोदींनी काय काय केले याचा पाढे वाचून दाखविण्याचा कार्यक्रम देखील सुरु झाला आहे.
त्यात पहिले सोशल इंजिनिअर म्हणून एंट्री केली ती म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी…
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज उत्तर प्रदेशातील कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. येथे जेपी नड्डा यांनी नामदेव गुरुद्वारामध्ये पूजा केली. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समुदायासाठी खूप काम केले आहे आणि शीख समुदायांच्या जुन्या मागण्या देखील पूर्ण केल्या आहेत. १९८४ च्या दंगलीत सहभागी असलेल्या लोकांची SIT ठेवून त्यांना तुरुंगात पाठवण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे, मग त्या दंगलीत सहभागी असलेले लोकं कितीही प्रभावशाली का असेनात तरी त्यांना जेलमध्ये पाठवण्याची तयारी मोदींनीच दाखवली.
हे सर्व बोलत असतांनाच जेपी. नड्डा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, प्रदेश प्रभारी राधामोहन सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
थोडक्यात या कार्यक्रमात जसं कि आपण वर बोललोत, त्याच प्रमाणे नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्तापर्यंत शीख समाजासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला.
याच सोबत जेपी नड्डा म्हणाले की, भाजप हा एकमेव पक्ष आहे जो भाजप, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्त्वावर काम करत आहे…त्याच प्रमाणे मोदींनी शिखांसाठी देखील न्याय केला आहे. अलीकडेच रद्द केलेले ३ कृषी कायदे देखील त्यांनी मागे घेतले आहेत, असंही आवर्जून त्यांनी सांगितलं आहे.
याचदरम्यान जेपी नड्डा यांनी भाजपचे क्षेत्रीय कार्यालय कानपूर आणि जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले…यावेळेस त्यांनी नमूद केले कि, २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोणताही जिल्हा पक्षाच्या कार्यालयांशिवाय नसावा, प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालये आधुनिक असावीत. अमित शाहजींनी हे काम पुढे नेले आणि मीही तेच काम पुढे नेत आहे. आज मला आनंद होत आहे की, देशात ४३२ कार्यालये तयार झाली आहेत. तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्ही भाजपचे कार्यकर्ता आहात, कारण भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्यामध्ये समोर बसलेला कार्यकर्ता उद्या राज्याचे किंवा पक्षाचे नेतृत्व करू शकतो” असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर प्रथमच भाजपचे वरिष्ठ नेते या नात्याने जेपी नड्डा यांनी शीखांशी संवाद साधलाय.
याच दौऱ्याच्या दुस-या दिवशी कानपूर येथील नामदेव गुरुद्वारात नड्डा यांनी डोकं टेकवलं. त्यानंतर ते म्हणाले, “मी भाजपचा एक सैनिक असल्याने, गुरु नामदेवजींच्या चरणी माझे डोके टेकवत आहे, अशा महापुरुषाच्या गुरुद्वारात येण्याने प्रेरणा मिळते, हीच प्रेरणा घेऊन पक्ष मजबूत करणे हाच आमचा उद्देश आम्ही ठेवला आहे, हे मी अभिमानाने सांगू शकतो. आपल्या पंतप्रधान मोदींनी शीख बांधवांसाठी आणि समाजासाठी जेवढे काम केले आहे तेवढे कोणीही केले नाही”.
पण मागे ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शीख शेतकर्यांसह आठ लोकांच्या मृत्यूनंतर देशभरात गदारोळ माजला होता. लोकांचा भाजपच्या मंत्र्यांवर राग होता. त्यामुळे नड्डा यांना राज्यातल्या दौऱ्याच्या दरम्यान शीख धर्मीयांसोबत सकारात्मक आणि गोड बोलणं भागच होतं ते त्याचप्रमाणे बोलले अश्या विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
हे हि वाच भिडू :