ज्या पंतप्रधानांनी अपमान करून जेआरडींना एअर इंडियामधून बाहेर काढलं ते नेहरू नव्हते..

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जेआरडी टाटांना एअर इंडियामधून बाहेर काढलं अशा अनेक अफवा आणि अर्धवट सत्य तुम्हाला सोशल मिडियामध्ये वाचायला मिळतील. जसं कि, आपण पाहतो ठराविक गट नेहरूंच्या विरोधात अनेक कहाण्या फिरवत असतात. त्यातलीच एक म्हणजे, जेआरडी टाटा यांना एअर इंडियामधून नेहरुंनीच बाहेर काढले होते असं देखील एक दंतकथा सांगितली जाते.

तर हे अर्धवट सत्य आहे, एअर इंडियामधून टाटा यांना हटवण्या मागे नेहरू नाही तर पंतप्रधान मोरारजी देसाई हे होते. 

मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर जेआरडी टाटा यांना एअर इंडियामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याबाबत त्यांना अगोदर कल्पना देखील नव्हती.

एअर इंडियाची स्थापना टाटा समूहाने केली होती. एअर इंडिया ही भारताची पहिली विमानसेवा होती आणि हे स्वप्न साकार झाले आणि त्याचे स्वप्न जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांनी पाहिले होते, त्यांना जेआरडी किंवा जेएएच असेही म्हटले जाते. टाटा समूहाने सर्वाधिक बोली लावून एअर इंडियाचा ताबा घेतला असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, असे सर्व अहवाल सरकारने फेटाळले आहेत.

याची अधिकृत घोषणा होणं अजून बाकी असलं तरी देखील जवळपास हे निश्चित आहे असंही बोललं जातंय. 

जेआरडी टाटा हे दूरदर्शी दृष्टीकोनाचे व्यापारी मानले जात होते.  जेआरडी टाटा यांचे योगदान केवळ जमशेदपूर शहरापुरते मर्यादित नाही, तर त्यांनी या देशालाही खूप काही दिले आहे. जेआरडी टाटा केवळ एक व्यापारी नव्हते तर त्यापेक्षा बरेच मोठे व्यक्तिमत्व होते. लोकांच्या समस्या जवळून समजून घेणाऱ्या आणि त्या दूर करणाऱ्यांपैकी ते होते. हेच कारण आहे की आजही भारतात टाटांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांच्याशी संबंधित जशा प्रेरणादायी कथा आहेत तशाच काही त्यांचा एक अपमान करणारी कथा देखील आहे.

जेआरडी टाटा हे १५ वर्षांचे असल्यापासूनच त्यांचा एक छंद होता ते म्हणजे विमान उडवायचा. पुढे विमानाची क्रेझ आणखी वाढली.

पायलटचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय होते.

नंतर त्यांनी १९३२ च्या एप्रिल मध्ये टाटा एअरलाइन्सची पायाभरणी केली. जेआरडीसाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्याने स्वतः कंपनीचे विमान कराचीहून मुंबईला नेले होते. त्यावेळी त्यात २५ किलोच्या पत्रांशिवाय काहीच नव्हते. कंपनीकडे स्वतःची फक्त दोन लहान सिंगल इंजिन जहाजे होती. सर्व अडचणी असूनही त्यांनी हार मानली नाही आणि आपली व्यावसायिक सेवा सुरू ठेवली. ब्रिटीश सरकार त्यांना प्रति पत्रासाठी फक्त ४ आणे देत ​​असायची.

टाटा एअरलाइन्स कडून एअर इंडियाचा प्रवास

दुसऱ्या महायुद्धानंतर टाटा एअरलाइन्स १९४६ मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनली आणि त्याचे नाव एअर इंडिया लिमिटेड असे बदलण्यात आले. 

स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने कंपनीचे ४९ टक्के शेअर्स खरेदी केले. ११९५३ मध्ये, सर्व नऊ खाजगी विमान कंपन्या इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्या. यानंतर एअर इंडियावर देखील सरकारचे  नियंत्रण आले. यामुळे JRD ला धक्का बसला, त्यांच्या स्वतःच्याच मालकीच्या एअर इंडिया कंपनीमध्ये कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.

मात्र हा धक्का पचवून जेआरडी टाटा यांनी एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून कंपनीमध्ये अनेक सुधारणा केल्या. पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि सर्व मतभेद असूनही त्यांनी जेआरडीला एअर इंडियाचे अध्यक्ष म्हणून कायम ठेवले होते. सगळं व्यवस्थित चालू होतं. पण त्यानंतर सगळं बदलायला लागलं. १९७७ साली जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

देसाई पंतप्रधान बनताच, जेआरडी टाटांना एअर इंडियामधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

पंतप्रधान देसाई यांनी हा एवढा मोठा निर्णय घेतांना साधी कल्पना देखील जेआरडी टाटांना दिली नव्हती. त्यांच्या जागी पी.सी.लाल यांना एअर इंडियाची कमांड देण्यात आली आणि या पी.सी.लाल यांनीच टाटा यांना हि बातमी दिली होती कि, मला तुमच्या जागी नियुक्त करण्यात आले आहे. 

हि बातमी ऐकून टाटा यांना मोठा धक्का बसला, आणखी मुद्दा म्हणजे मोरारजी देसाईंनी टाटा यांना या निर्णयामागचे कारण किंव्हा स्पष्टीकरण देखील दिले नव्हते. पंतप्रधानांच्या या निर्णयाच्या निषेधार्थ,  व्यवस्थापकीय संचालक के.जी अप्पूस्वामी आणि त्यांचे क्रमांक दोनचे नारी दस्तूर यांनीही राजीनामा दिला होता. ज्यांनी कंपनीला उभे केले त्यांनाच मोरारजी देसाईंनी त्या कंपनीतून बेदखल केले होते. हा सरळ सरळ अपमान होताच तर धडधडीत अन्याय देखील होता.

जेआरडी टाटा यांच्या अपमानाचा निषेध म्हणून कामगार संघटनेनेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. यानंतर एअर इंडियाची कमांड टाटांच्या हातातून निसटली होती. मात्र आता पुन्हा कित्येक वर्षानंतर टाटा सन्स कंपनीने स्वतः उभारलेल्या कंपनीची कमांड स्वतःच्या हातात घेऊ शकते अशी शक्यता आहे. त्याला आधार म्हणजे टाटा सन्सने एअर इंडियाची बोली जिंकली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.