भारतात औद्योगिक क्रांती करणाऱ्या जे.आर.डी टाटानांही इंजिनियरिंग करायला जमल नाही.

भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह कोणता तर तो म्हणजे टाटा हे लहान मूल पण सांगेल. अगदी भल्या मोठ्या ट्रकपासून ते पासून मिठापर्यंत अनेक गोष्टी टाटा बनवतात.

लाखो इंजिनियर्स टाटांकडे कामाला आहेत. भारताची औद्योगिक क्रांतीच मुळात टाटांमुळे झाली. विशेषतः जे आर डी टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा उद्योगसमूहाने मोठी भरारी मारली होती. अभियंत्यांच्या कित्येक पिढ्या टाटांनी घडवल्या.   पण त्यांना स्वतःला इच्छा असूनही इंजिनिअरिंगच शिक्षण घेता आलं नाही.

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. जहांगीर रतनजी उर्फ जेआरडी टाटांची आई सुझेन ही फ्रेंच होती. दुर्दैवाने तीच लवकर निधन झालं होतं. जहांगीरच बालपण फ्रान्समध्येच गेलं. आज्जीने त्याचा आणि त्याच्या भावंडांचा संभाळ केला. पण त्याच्या वडिलांना इच्छा होती की आपली मुलं भारतात मोठी व्हावीत. इथला बिझनेस सांभाळावा.

जहांगीरला इंजिनियर व्हायचं होत तेही केंब्रिजसारख्या मोठ्या विद्यापीठात. नुकतीच जहांगीरचे काका आणि टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा दोराबाजी टाटा यांनी तिथे 25000 पौंडची घसघशीत डोनेशन दिल होत. जहांगीर हुशार होता पण तिथं प्रवेश मिळवायचा तर इंग्रजीही तसंच पक्क पाहिजे. जे.आर.डीचं बालपण फ्रान्स मध्ये गेलं असल्यामुळे त्यांची फ्रेंच भाषेवर कमांड होती पण इंग्रजी कच्चं होतं.

अखेर रतनजीनी जहांगीरच इंग्रजी सुधारावे यासाठी एक वर्ष इंग्लंड पाठवण्याची तयारी केली. 

याच काळात पहिल्या महायुद्धाला सुरवात झाली. फ्रान्स आणि इंग्लंड हे दोन्ही देश या युद्धात जर्मनी विरुद्ध उतरले होते. युरोपमध्ये प्रत्येक तरुण आपल्या देशातील सैन्यात सामील होत होते. फ्रान्सने तर नियम केला की प्रत्येक कुटुंबातील थोरला मुलगा लष्करात जाणे सक्तीचे केले होते.

जेआरडी टाटा फ्रान्समध्ये जन्मले असल्यामुळे त्यांनाही हा नियम बंधनकारक होता. त्याच्या आजीने आपल्या ओळखी वापरून हे टाळता येईल का याचा शोध घेतला पण ते काही जमले नाही.

अखेर त्यातल्या त्यात जहांगीरला कोणत्या दलात सामील होणार याची निवड करायची मुभा दिली गेली. त्याने घोडदळ निवडलं. त्याने कॉलेजमध्ये पोलो गेम्स मध्ये भाग घेतला असल्यामुळे आपल्याला घोडदळ जमेल अस त्याला वाटलं होतं.

अंगापिंडाने अगदी नाजूक असलेल्या जहांगीरचा महायुद्धाच्या धामधुमीत लष्करात निभाव कसा लागणार याचीच सगळ्यांना चिंता होती. त्याची नेमणूक झालेली अल्जेरियन तुकडीतले घोडे फ्रान्सच्या पोलो क्लब प्रमाणे नाजूक नव्हते. उंच अरबी लष्करी घोड्यावर बसून तिथल्या मेहनतीने जहांगीर वैतागला. त्याला ठिकठिकाणी फोड्या आल्या.

आता यातून बाहेर कस पडायचं याचा विचार करत असताना त्याला एक संधी चालून आली.

त्याच्या कप्तानाला एक पत्र टाईप करून हवं होतं. पूर्ण तुकडीत फक्त जहांगीरला टायपिंग जमत होतं. त्याची नेमणूक मग कप्तानच्या हाताखाली क्लार्क म्हणून झाली. युद्धभूमीवरन पत्र पाठवण्याची मुख्य जबाबदारी त्याची होती पण शिवाय कप्तानचा सहायक म्हणून निर्णयप्रक्रियेतही भाग घेऊ लागला.

या कामात मात्र जेआरडी टाटा रमले. बघताबघता सक्तीचं एक वर्ष संपलं. टाटाची निवड अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी झाली. मग त्याने वडिलांची परवानगी घेण्यासाठी त्यांना विचारलं. रतनजीनीं मात्र त्याला वेड्यात काढलं,

“बस झालं बाकीचे उद्योग. इथं आपला धंदा तुझी वाट बघतोय लगेच परत ये.”

हाताशी आलेल्या पोराला रतनजीनीं उरलेलं शिक्षण सुद्धा पूर्ण करू दिलं नाही. तातडीने जेआरडीला मुंबईत बोलवून टाटांच्या ऑफिसमध्ये कामाला लावले.

इकडे दुर्दैवाने काहीच दिवसात मोरोक्कोमध्ये जेआरडींची आख्खीच्या अख्खी तुकडी तिथल्या अतिरेक्यांच्या लढ्यात शहीद झाली. रतनजी टाटांनी आग्रह धरून आपल्या मुलाला बोलावून घेतलं नसत तर भारत आपल्या सर्वात महान उद्योगपतीला युद्धभूमीवर मुकला असता.

त्यांना कधीच आपलं इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण यामुळे त्यांचं काही अडलं नाही. 

पुढे जेआरडी टाटा हे मेहनतीच्या जोरावर टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष बनले. टीसीएस, टाटा मोटर्स सारख्या अनेक कंपन्या स्थापन केल्या. एअर इंडिया सुरू केली, विमानाचे पहिले लायसन्स धारी भारतीय पायलट बनले. आपल्या जवळपास पन्नासवर्षांच्या कारकिर्दीत टाटा उद्योगसमूहाच नाव जागतिक किर्तीच बनवलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.