फक्त आपल्या कर्मचाऱ्यांना लसी दिल्या नाहीत तर खेडोपाडी फिरून शेकडो गावांचं लसीकरण केलं

गेले वर्षभर जगाला छळणाऱ्या कोरोनावर लस आली आणि संपूर्ण जगाने निश्वास टाकला. संपुर्ण जगात आता ही लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. भारतात देखील सुरवातीचे काही दिवस भारत बायोटेक आणि सिरम या दोन संस्थांतर्फे बनवण्यात आलेल्या लस कोरोना योद्ध्यांना सरकार तर्फे हि मोफत वितरित करण्यात आल्या.

१ मार्च पासून या लशी सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांसाठी वितरित करण्यास सुरवात झाली आहे. शासकीय केंद्रावर या दोन्ही लशींची मोफत दिल्या जात असून खाजगी रुग्णालयात त्यांची किंमत २५० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

सरकार तर्फे कोरोनाची लस जेष्ठ नागरिकांसाठी तरी मोफत दिली जात असली तरी मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटूंबियांना लसीकरण मोफत करणार असल्याचं बोललं जात आहे. नुकताच इन्फोसिसने तशी घोषणा देखील केली. नीता अंबानींनी देखील आपल्या संपूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियाला ही लस मोफत देणार असं सांगितलं.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या काळजीपोटी कॉर्पोरेट कंपन्यांनी उचलेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

मात्र पन्नास वर्षांपूर्वी अशाच एका साथीच्या रोगावेळी दोन कंपन्या पुढे आल्या होत्या. त्यांनी फक्त आपल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण तर केलंच पण त्याच बरोबर शेकडो गावांचं लसीकरण करून हा साथीचा रोग आटोक्यात आणण्यात महत्वाची भूमिका देखील बजावली.

त्या दोन कंपन्या म्हणजे टिस्को आणि टेल्को.

गोष्ट आहे १९७४ सालची. त्याकाळी देवी हा जगातला सगळ्यात जुना आणि घातक असा संसर्गजन्य आजार. या रोगामुळे शरीरावर कायमचे व्रण शिलक राहत असत. डोळ्यांमध्ये देवीचा संसर्ग झाल्यास कायमचे अंधत्व येत असे. ५ ते १०% रुग्णांमध्ये पुरळातून आणि नाकातोंडातून रक्तस्राव व्हायचा. अशा अवस्थेत रुग्ण ७–८ दिवसांत मरण पावायचा.

जगभर मोठ्या प्रमाणात या रोगामुळे रुग्ण मृत्युमुखी पडत असत. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने देवी वर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. भारतातून हा रोग जवळपास नष्टच झाला होता मात्र बिहार झारखंडच्या दुर्गम प्रदेशात पुन्हा हा रोग आढळून आल्यामुळे सगळ्यांना धडकी भरली होती.

टिस्को म्हणजे आजची टाटा स्टील आणि टेल्को म्हणजे आजचे टाटा मोटर्स. जे.आर.डी. टाटांच्या या लाडक्या कंपन्या. या कंपन्या जिथे होत्या त्या जमशेदपूर भागात देवीचा रोग येऊन पोहचला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनची टीम जमशेदपूरला आली. 

जेआरडीनी टिस्को व टेल्कोला आदेश दिले की

WHO ला जी लागेल ती सगळी मदत पोहचवा. फक्त आपल्या कर्मचाऱ्यांचा नाही तर आसपासच्या गावच्या लोकांना देखील आरोग्य सुविधा पोहचवा.

दोन्ही कंपन्यांतर्फे दोन टीम बनवण्यात आल्या. टेल्कोला मुख्य काम देण्यात आले होते की जमशेदपूरच्या आसपासच्या दुर्गम जंगलात जाऊन देवीचे रोगी शोधून काढायचे. एक टीम शहरी भागातील प्रत्येक घराघरात जाऊन पेशन्ट शोधून काढत होती. या शिवाय जनजागृती साठी तिथल्या स्थानिक भाषेत देवीच्या लसीकरणाबद्दल माहिती देणारी व्हॅन सगळीकडे फिरत होती.

तटाने लसीकरणासाठी एक खास जेट गन वापरली होती ज्याचा वापर करून एका तासात ५०० ते ७०० शोट्स देता येत होते. सर्व अडथळ्यांना पार करून टाटांचे स्वयंसेवक रात्रंदिवस काम करत होते. अमेरिकेतून आलेल्या WHO च्या टीमचं नेतृत्व करत होते डॉ.लॅरी ब्रिलियंट. 

जवळपास ७२ तासात ५० डॉक्टर्स, २०० पॅरामेडिकल स्टाफ, ६०० ते ८०० सर्च व्हॉलेंटियर्स आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या ५० गाड्या बिहारच्या खेडोपाडी फिरत होत्या. शेकडो केसेस त्यांनी शोधून काढले व त्यातील अनेकांवर उपचार देखील केले. तेव्हा यात काम केलेले डॉ.एरिन ब्रॉचा सांगतात,

  “जेव्हा ही मोहीम पूर्ण झाली तेव्हा आमच्या पैकी एकजणही आपल्याला शूज नाहीत म्हणून रडलं नाही कारण आम्ही पाय नसणाऱ्या व्यक्तींचं दुःख डोळ्यांनी अनुभवलं होतं.” 

टाटांनी त्याकाळी तब्बल ७४ लाख रुपये या मोहिमेसाठी खर्च केले. एकदा तर आणीबाणीची वेळ येऊन ठेपली जेव्हा त्यांची एक टीम जंगलाच्या भागात दोन दिवसांसाठी गायबच झाली होती. त्यांचं काय झालं, नक्षलवादी किंवा अतिरेकी संघटनांनी त्यांचं अपहरण तर नाही ना केलं अशा अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या.

तेव्हा जे.आर.डी नि या टीमला शोधण्यासाठी चक्क एक विमान पाठवून दिलं.

युद्धपातळीवर राबवलेली ही मोहिम प्रचंड यशस्वी ठरली. एप्रिल १९७४ ला हे लसीकरण सुरु झालं होतं तर १५ जून ला देवीची साथ आटोक्यात आली असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं. संपूर्ण जगभरात ही मोहीम कौतुकास पात्र ठरली. टाटांची सामाजिक बांधिलकी या मुळे वाखणनली गेली.

या सर्वांचा परिणाम म्हणजे १९७७ साली भारतातून देवीचा रोग कायमचा हद्दपार झाला. त्यावेळी झारखंड व बिहार च्या भागात टाटांनी दिलेलं योगदान देवीला हरवण्यात अतिशय महत्वाची कामगिरी बजावून गेलं.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.