या टाटांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवून कामगारांचे पगार भागवले होते

साल १९२०, जगाला वेठीस धरणारं पहिलं महायुद्ध संपलं होतं. या युध्दात लाखो लोक मारले गेले होते. त्याच्या कितीतरी अधिकपट जखमी झाले होते. जर्मनी सारखे युद्ध हरलेले देश मोडकळीस आलेच होते पण युद्ध जिंकलेल्या इंग्लंड अमेरिकेसारख्या अर्थव्यवस्था देखील शिणलेल्या होत्या.

बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. युद्धात मग्न असलेले सैनिक परतले होते. गावागावात अशा रिकामटेकड्यांचे जथेच्या जथे वेळेचं करायचं काय या प्रश्नाच्या उत्तरात भटकताना दिसत होते.

अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेला देखील या महामंदीचे काय करायचे हा प्रश्न पडलेला. भलेभले अर्थतज्ज्ञ गोंधळून गेले होते. त्यात सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे बेरोजगारी आणखी वाढत चालली होती. उद्योगक्षेत्र ठप्प झाले होते.

भारतासारख्या पारतंत्र्यात असलेल्या गरीब देशाचं कंबरडं मोडलं होतं. एक तर मोठे असे म्हणता येतील असे उद्योग आपल्याकडे नव्हतेच. जे होते ते सरकारवर अवलंबून होते आणि त्यात हे महायुद्ध. वाढती महागाई आणि औद्योगिक मंदीचा सर्वात मोठा फटका भारताच्या एका कंपनीला बसला होता.

टिस्को उर्फ आजची टाटा स्टील

सर जमशेदजी टाटा यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली टिस्को ही भारतातीलच नाही तर आशियातील आघाडीची स्टील निर्मितीची कंपनी होती. भारतावर राज्य करणारे ब्रिटिश मोठ्या प्रमाणात येथून पोलाद आपल्या देशात नेत होते. पण महायुद्धानंतरच्या मंदीमुळे ते प्रमाण आटलं. इंग्लंडमधलेच अनेक उद्योगधंदे बसले होते. यामुळे काय झालं कि तिथे पडून असलेला स्टीलचा साठा ब्रिटिश सरकारने भारतात आणून ओतायला सुरवात केली.

टाटा स्टीलची मागणी कमी झाली. भाव पडले. स्वप्नात देखील विचार करता येणार नाही असं महाप्रचंड नुकसान टाटांना सोसायला लागलं. त्यातल्या त्यात आधार होता तो जपानचा. जमशेदपूर वरून जपानला मोठ्या प्रमाणात स्टील निर्यात केलं जायचं. पण योगायोगाने जपानमध्ये मोठा भूकंप आला आणि तिथली मागणी देखील थांबली.  

मागणी आणि उत्पादन यांचं प्रमाण इतकं घटलं की कामगारांना द्यायला पगाराएवढे पैसे देखील टाटांकडे नव्हते. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांनी त्यांचे बँकर असणाऱ्या इंपीरियल बँकेकडे धाव घेतली. हि इंपिरियल बँक म्हणजे आजची स्टेट बँक.

टाटांना जवळपास २ कोटी इतक्या भांडवलाची गरज होती. पण बँकेने त्यांना नकार दिला. टिस्कोची आर्थिक स्थिती एवढी हलाखीची आहे कि त्यांना जुनी देणी देखील देता येणार नाही त्यात नवीन कर्ज कसे देणार हा विचार बँकेने केला.

टाटा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले. कोणीच मदत करण्यास तयार होईना. टाटांचे शुभचिंतक त्यांना टिस्को विकण्याचा सल्ला देऊ लागले. 

जमशेदजी टाटा यांचे थोरले चिरंजीव दोराबजी टाटा तेव्हा कंपनीचे सर्वेसर्वा होते. त्यांनीच घाम गाळून जमशेदजींच्या स्वप्नातील ही स्टील कंपनी उभी केली होती. काहीही केलं तरी टिस्को विकायची नाही हे त्यांचं पालपूद होतं.

त्यांचा चुलत भाऊ आरडी टाटा तर एका संचालकांच्या सभेत टेबल वर हात आपटून म्हणाले,

“कदापि नाही. मी जिवंत असे पर्यंत टाटा स्टील विकली जाणार नाही. 

टाटा कुटूंबाचं याबाबतीत एकमत होतं. पण नुसता बोलून हा आर्थिक प्रश्न सुटणार नव्हता.

अखेर त्यांच्या मदतीला सर दिनशॉ नावाचे गृहस्थ धावून आले. ते ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे दिवाण होते. त्यांनी शिंदे महाराजांना आपल्या गंगाजळीतुन १ कोटींचे कर्ज द्यायला लावले. पण अजूनही आणखी एका कोटींचा प्रश्न उरत होता.

शेवटी दोराबजी यांनी आपल्या बायकोच्या अंगावरील दागिने गहाण टाकले.

तुम्ही म्हणाल सोने १०० रुपये तोळे नसलेल्या काळात दागिने गहाण ठेवून १ कोटी रुपये कसे काय उभे राहिले? यायचं उत्तर होतं टाटांच्या बायकोकडे असणारा ज्युबिली हिरा.

एकेकाळी जगातला सर्वात मोठा हिरा म्हणून ओळखला जाणारा हा हिरा मूळचा दक्षिण आफ्रिकेतला. इंग्लंडची सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिच्या सत्ताग्रहणाची पन्नास वर्षे झाली याच्या स्मरणार्थ या हिऱ्याला ज्युबिली डायमंड हे नाव देण्यात आले होते. हा ज्युबिली हिरा खरेतर व्हिक्टोरिया राणीच्या मुकुटात स्थानापन्न होणार होता पण काही अनाकलनीय कारणामुळे हे घडलं नाही.

१९०० साली फ्रान्सच्या पॅरिस येथे ठेवलेल्या प्रदर्शनात सर दोराबजी टाटा यांनी आपल्या लाडक्या पत्नीसाठी हा ज्युबिली हिरा खरेदी केला.

मेहेरबाई टाटा यांना मात्र दागिन्यांची हौस कधी नव्हतीच. त्या आधुनिक विचारांच्या होत्या. मेहेरबाई उत्तम टेनिस खेळायच्या. भारतीय स्त्रियांनी रांधा वाढा उष्टी काढा यातून बाहेर पडावं हे मेहरबाई यांचं प्रांजळ मत होतं. महिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांनी मोठं कार्य देखील केलं होतं.

मेहेरबाई यांना भारतातील पहिल्या स्त्रीवादी असंही ओळखलं जातं.

जेव्हा कंपनीला कामगारांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत अशी वेळ आली तेव्हा मेहेरबाई यांनी ज्युबली हिऱ्या सकट आपलं सगळं स्त्रीधन दोराबजी टाटा यांच्या हवाली केलं. इंपिरियल बँकेत ते गहाण ठेऊन टाटांनी १ कोटी उभे केले आणि टिस्को वाचवली.

कितीही मोठं संकट येऊ दे त्यांनी कामगारांचा एक दिवसाचाही पगार थकवला नाही. 

या भांडवलाच्या जोरावर टिस्को नव्या दमाने उभी राहिली. असं म्हणतात की गेल्या शंभर वर्षात या कंपनीने जेवढी प्रगतीची शिखरे गाठली, देशाची मान अभिमानाने उंच केली याच गमक टाटांनी केलेल्या त्यागामध्ये आहे.

१९३१ साली मेहेरबाई टाटा यांचे रक्ताच्या कर्करोगाने इंग्लंड येथे निधन झाले. त्याकाळी हा रोग असाध्य मानला जायचा. त्यांच्या स्मरणार्थ कॅन्सरवर संशोधन व उपचार करण्यासाठी दोराबजी टाटा यांनी लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट स्थापन केले. त्यासाठी स्वतःच्या खिश्यातुन ७५ लाखांची देणगी दिली.

दोराबजी टाटा यांनी आपली संपूर्ण संपत्ती या ट्रस्टच्या हवाली केली. यात तो ज्युबिली हिरा देखील होता. पत्नीच्या मृत्यूच्या पाठोपाठ एका वर्षात सर दोराबजी यांचा देखील मृत्यू झाला.

१९३५ साली त्यांचे उत्तराधिकारी जे.आर.डी.टाटा यांनी हा हिरा व मेहेरबाई यांचे सर्व दागिने विकले व त्या पैशातून टाटा मेमोरियल हॉस्पिटल उभा केले.

आधी ज्युबिली हिरा आधी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड खरेदी करणार होते पण काही कारणाने ते बारगळलं. शेवटी हा हिरा एका फ्रेंच उद्योगपतीने खरेदी केला. आज हा ज्युबिली डायमंड एका लेबनीज उद्योगपतीच्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतो.

संदर्भ- टाटायन गिरीश कुबेर  

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.