इतर कंपन्यांच्या तुलनेत टाटा परवडेबल दरात Ev कार देतं, याचं कारण आहे ‘देशी जुगाड’

पेट्रोल-डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत्या किमतींनंतर थोडा दिलासा म्हणून लोक सीएनजी गाड्यांकडे वळले होते. नंतर त्याचेही दर वाढतायेत म्हणून पार सगळे वैतागून गेलेत. अजून पर्याय शोधत अनेक जण इलेक्ट्रिक व्हेईकल्सपर्यंत पोहोचलेत. 

आता पर्याय कळल्यानंतर राहतो सर्वात महत्वाचा मुद्दा ‘परवडेबल आहे का बुआ?’ 

आणि याच प्रश्नाने सगळ्यांना आणलंय टाटाच्या दाराशी. 

का? 

कारण इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्सची किंमत ही २० लाखांच्या पुढे असताना केवळ टाटा अशी एकमेव कंपनी आहे जिच्या किमती मिडल क्लास लोकांना समोर ठेवून ठरवण्यात आल्यायेत. 

म्हणून प्रश्न पडतो की, इव्ही बनवायला मुळातच खूप खर्च येतो, म्हणून आम्ही महाग विकतो, असं इतर कंपन्या सांगत असताना, टाटाला हे तुलनेने स्वस्तात विकणं कसं परवडतं? त्याचंच उत्तर शोधलंय आणि आलोय तुम्हालाही सांगायला… 

कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर सरकारचा जास्त भर असल्याने सरकारच्या वतीने विशेष सवलती देण्यात येतायेत. त्यामुळे टाटा, महिंद्रा या कंपन्यांबरोबर मर्सिडीज, ऑडीसारख्या मोठ्या कंपन्यासुद्धा इलेक्ट्रीक व्हेइकलच्या मार्केटमध्ये उतरल्या आहेत. मात्र यांच्यात आणि टाटामध्ये मुख्य फरक आहे, तो म्हणजे कॉस्टचा.

आणि हे टाटाला कसं जमलं? याचं साधं सोपं उत्तर म्हणजे 

‘जुगाड’

टाटाने जेव्हा इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचं ठरवलं होतं तेव्हाच सर्वसामान्यांना डोळ्यांसमोर ठेवत त्यांना काय लागतं? हे बरोबर टिपलं. खर्चाच्या बाबतीत खूप जागरूक असलेल्या भारतीयांसाठी परवडणारी कार बनवावी लागेल, हे त्यांना समजलं. त्यामुळे मुळातच जास्त खर्चात न जाता गाड्या बनवण्याचं त्यांनी ठरवलं.  

कारण बाजाराचं एक साधं गणित आहे खर्च वाढला की वस्तूची किंमत वाढते. 

ईव्ही प्लांट किंवा लाइन बांधणं खूप महाग झालं असतं, तेव्हा त्यांनी आपल्या मुख्य प्लांटमधील एक अनयुज्ड शॉपचं रिनोव्हेशन केलं. आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रीक कारसाठी नवीन डिझाईन तयार करण्याऐवजी डिझेल आणि पेट्रोल व्हर्जनमध्ये उपलब्ध असणारं साध्याचं यशस्वी मॉडेल निवडून त्याला बॅटरी पॅकसह तयार करण्याचं ठरवलं. 

त्यासाठी  Nexon SUV कारची बॉडी निवडण्यात आली. यामुळे डिझाईनसाठी लागणारा खर्च कमी झाला आणि त्या कारला ‘नेक्सॉन इव्ही’ असं नाव देण्यात आलं.  

हे इतर प्रमुख इव्ही वाहन निर्मात्यांच्या अगदी उलट आहे, ज्यांनी ईव्ही टूलिंग आणि तंत्रज्ञानामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मात्र, टाटाच्या या यशामागे एक कारण हे सरकारी अनुदान आणि जादा टॅरिफ हे देखील असल्याचं नाकारता येत नाही.

सुरुवातीला कंपनी दिवसाला फक्त आठ एसयूव्ही तयार करायची… मात्र लॉंचच्या २ वर्षांत मागणी वाढल्याने आता दिवसाला १०० हून जास्त गाड्या बनवल्या जातात. तर त्यातील बहुतेक आता जवळच्या दुसऱ्या प्लांटमध्ये तयार केल्या जातात. 

कारण टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे प्रॉडक्ट लाइन्स अँड ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितले की, नव्या बाजारपेठेसाठी ईव्ही प्लांट तयार करणे हे वाहनांच्या मागणीवर अवलंबून असते.

ईव्ही घटक आणि पायाभूत सुविधांसाठी टाटा कंपनी त्याच्या इतर कंपन्यांवर अवलंबून राहिलं आणि स्वस्त बॅटरी केमिकल प्रकाराची निवड करून टाटाने आगाऊ गुंतवणूकही मर्यादित केली. यामुळे नेक्सॉन ईव्हीची किंमत सुमारे १९,००० डॉलर्स इतकी होऊ शकली. 

यामुळे उच्च मध्यमवर्गीयांसाठी स्वस्त ईव्ही बाजारात आणण्याची कंपनीची योजना यशस्वी झाली.

यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इव्हीसाठी टाटा फक्त २ कारच्या मॉडेल्सचा वापर करतं. 

तीन वर्षांपूर्वी हे मॉडेल्स टाटाने बाजारात आणले होते, ज्यांच्या जोरावर आज ९० टक्के टाटाने आज भारताच्या इलेक्ट्रिक कार विक्रीचा ९०% हिस्सा काबीज केलाय. तर गेल्या जूनमध्येच टाटाने मार्च २०२६ पर्यंत १० इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात आणण्याची धडाकेबाज योजना आखली आहे. 

तर टाटाने आपल्या ईव्ही योजनांना निधी देण्यासाठी स्वत: च्या १ अब्ज डॉलर्सच्या पैशाची तरतूद केली आहे. ज्यानुसार २०२५ पर्यंत इलेक्ट्रिक मॉडेल्स त्याच्या विक्रीचा एक चतुर्थांश भाग होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. म्हणूनच टाटाने डेडिकेटेड इव्ही प्लांटची गरज आहे का? याचं मूल्यमापन करणंही सुरु केलंय. 

टाटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गोयल यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार…

त्यांनी योजना प्रत्येक गोष्टीचे स्थानिकीकरण करण्याची आहे. पुढच्या काही वर्षांत चुंबक सोडून गाडीचे सगळे घटक स्थानिक पातळीवर तयार होणार आहेत. तर सेल सोडून बॅटरी इन-हाऊस बनवली जाणार असल्याने  कंपनी आपल्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिमवर काम करत असल्याचंही गोयल यांनी सांगितलं.

तर मोठ्या बॅटरी आणि लांब ड्रायव्हिंग रेंजच्या ईव्ही तयार करण्यासाठी इंजिन प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्याची योजना आहे. साधारण दोन वर्षांत ते  मॉडेल्स बाजारात येण्याची शक्यता, टाटाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

या प्रवासात टाटाच्या ईव्ही व्यवसायाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. २०३० पर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या सर्व कारपैकी ३०% कार इलेक्ट्रिक असाव्यात, अशी सरकारची इच्छा आहे. तेव्हा हे लक्ष्य आशावादी वाटत असले तरी, स्पर्धा भरपूर असणार आहे. 

याच वर्षी दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई मोटर आणि किआ मोटर्स या कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सुरू करण्याची योजना आखली आहे. पण त्यांचे मॉडेल मोठे आणि महागडे असणार आहे. तर पेट्रोल-इलेक्ट्रिक हायब्रीड लाँच करण्याच्या अपेक्षाही काही प्रतिस्पर्ध्यांनी व्यक्त केल्या आहेत. 

तेव्हा भारताच्या ईव्ही मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी टाटाला तगड्या कॉम्पिटिशनला सामोरं जावं लागणार असं दिसतंय. तेव्हा वाढत्या कॉम्पिटिशनमध्ये टाटा तग धरू शकेल का? आणि त्यांचं टार्गेट पूर्ण करू शकेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.