जुही चावलामुळे पुन्हा चर्चेत आलेला ५ जी टॉवर खरंच लोकांच्या जीवावर उठलाय का ?

नुकताच सिनेअभिनेत्री जुही चावलाला दिल्ली उच्च न्यायालयाने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला. कारण होते ५ जी रेडिएशन बद्दल तिने दाखल केलेली याचिका.

गेल्या काही वर्षांपासून जुही चावला भारतात मोबाईल टॉवरमुळे होत असलेले रेडिएशनबद्दल लोकांच्यात जनजागृतीचं काम करत आहे. ५ जी टॉवरच्या टेस्टिंग वेळी पसरत असलेल्या तीव्र किरणोत्सारामुळे चिमण्या व इतर लहान पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे का तसेच मानवी आरोग्यावर देखील याचा काही परिणाम होतो आहे का याबद्दल सरकारकडे विचारणा करावी अशी याचिका जुही चावलाने दाखल केली होती.

 मात्र ५जी बिनतारी यंत्रणा तंत्रज्ञानाला आव्हान देणारी केलेली याचिका सदोष असून प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेली आहे, असे नमूद करत दिल्ली उच्च न्यायालयाने हि याचिका शुक्रवारी फेटाळून लावली.

जुहीने आणि अन्य दोघा वादींनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करून न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय केला, असे न्या. जे. आर. मिधा यांनी म्हटले. शिवाय चावला यांनी सुनावणीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग लिंक आपल्या सोशल मीडियावरून प्रसारित केली, त्यावेळी अज्ञात व्यक्तींकडून सातत्याने व्यत्यय आणला जात होता,जुही चावलाचे काही फॅन्स तिच्या सिनेमातील गाणी गाऊन कोर्टाच्या कामात अडथळा आणत होते.

या सगळ्यामुळे कोर्टाने हा सगळं पब्लिसिटी स्टंट आहे असं म्हणत जुहीला शिक्षा सुनावली. आता तिला २० लाखांचा दंड भरावा लागणार आहे.

हा जुही चावलाचा वाद सुरु असताना याच ५ जी टॉवरवरून एक अफवा देखील व्हायरल होत आहे. या कॉन्स्पिरसी थियरीने ५ जीचे रेडिएशन कोरोना पसरवतात असं म्हटलं आहे.

नक्की काय होतंय व्हायरल,

भारतात आलेल्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे कारण ५ जी टॉवर्सची चाचणी आहे. याआधी ४ जी टेस्टिंगमुळे मोठ्या प्रमाणात चिमण्यांचा बळी गेला. आणि आता लोकांचे जितक्या संख्येने मृत्यू होत आहेत त्यासाठी कोणताही आजार कारणीभूत नसून ५ जी टॉवरच्या टेस्टिंगमुळे निर्माण होणारे रेडिएशन जबाबदार आहेत असं या दाव्यात म्हटलं जात आहे.

व्हायरल मेसेजमध्ये असा ही दावा केला जात आहे की 5 जी टॉवर्सच्या चाचणीमुळेच महामारीची ही दुसरी लाट आली आहे. तसेच टॉवरमधून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे हवा विषारी होत असल्याचेही सांगितले जात आहे. ज्यामुळे लोकांना श्वास घेण्यात त्रास होत आहे.

व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये 4 जी, 5 जी आणि रेडिएशनच्या “वाईट” प्रभावाच वर्णन आहे. रेडिएशनमुळे घरात सर्वत्र करंट तयार होतो आणि घसा नेहमीपेक्षा थोडासा कोरडा पडतो. या 5 जी टॉवर्सच्या चाचणीवर बंदी घातल्यास सर्व काही ठीक होईल, असे या पोस्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. आणि लोकांनी या तंत्रज्ञानाचा विरोध केला पाहिजे असं ही सांगितल आहे. हे मॅसेज व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटी, फेसबुक आणि ट्विटरवरच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

तसंच दररोज या संदर्भात काहीतरी पोस्ट करण्यात येत आहे. पोस्टमध्ये लोकांना या टॉवर्सच्या चाचणीची मागणी करण्याचे आवाहन केले जात आहे. हा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर, लोक एकमेकांना प्रश्न विचारत आहेत की,

खरच ५ जीमुळे कोरोना वाढत आहे का?

या प्रश्नांची उत्तर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आपल्या एका अहवालात दिली आहेत.

सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले की, सोशल मीडियावरील काही मेसेज आणि काही वृत्तपत्रात ५ जी स्पेक्ट्रम चाचणीमुळे देशात कोरोना झपाट्याने पसरत असल्याचा दावा केला आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आणि निराधार असून यात काहीही तथ्य नाही. अशाप्रकारच्या चुकीच्या दाव्यावर विश्वास ठेऊ नये.

जगातील अनेक देशात ५ जी नेटवर्कची सुरुवात याआधीच झाली आहे. लोक सुरक्षितपणे या सुविधांचा वापर करत आहेत. इतकचं नाही तर ५ जी नेटवर्क आणि कोविड १९ यात कोणताही संबंध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्ट केलं असल्याचं सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक एस. पी कोच्चर यांनी सांगितले.

रेडिएशन काय आहे?

मोबाइल फोन्स रेडिओफ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (RF EMF) ट्रांसमिट आणि रिसीव करतात. टेलिकॉम नेटवर्कच्या मागच्या जनरेशनपेक्षा 5 जी नेटवर्क फास्ट बनविण्यासाठी बीम-फॉर्मिंग टेक्नॉलजी आली आहे. या टेक्नॉलजीद्वारे, यूजर्स कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय RF EMF फ्रीक्वेंसी वापरू शकतील. २००९ पासून भारत ‘इंटरनॅशनल कमीशन ऑन नॉन-आयोनाइजिंग रेडिएशन प्रोटेक्शन (ICINRP)‘ या आंतरराष्ट्रीय आयोगाच्या गाईडलाईन्स फॉलो करीत आहे. गाईडलाईन्स मध्ये, ईएमएफच्या संपर्कात येऊन कोणाच्याही आरोग्यास कोणतीही हानी पोहोचू नये या सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रिटन मध्ये ही फुटले होते अफवांचे पेव..

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ब्रिटनमध्ये ही अधिकाऱ्यांना अशाच एका समस्येचा सामना करावा लागला होता. कोरोनाचं संक्रमण हे 5G मुळे झपाट्यानं पसरत असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे सोशल मीडियावर 5G टेक्नोलॉजीच्या आणि मोबाईल इंजिनियर्सना अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आल्या होत्या.

त्यावेळी कॅबिनेट मंत्री मायकेल गोव्ह यांनी या गोष्टी आणि अफवा मात्र फेटाळल्या. निव्वळ मूर्खपणा आणि चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत असं त्यांनी सांगितलं.

तेव्हा अशा पद्धतीच्या पोस्टवर गुगलकडून कारवाई करण्यात यावी यासंबंधिचे आदेश देण्यात आले होते. ब्रिटन मध्ये काही ठिकाणी या अफवेमुळे अनेक मोबाईल फोनचे टॉवर्स जाळण्याचा प्रयत्न केला गेला. ब्रिटनची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीटी (ब्रिटीश टेलिकॉम) च्या मोबाइल टॉवरला तेव्हा आग लागली.

अनेक राज्यात ५ जी नेटवर्कची चाचणी सुरु आहे. त्यातून येणाऱ्या रेडिएशनमुळे लोकांचा मृत्यू होतोय आणि त्याला कोविड १९ आजाराचं नाव दिलं जात आहे. हा दावा म्हणजे निव्वळ थापा आहेत. तर कृपया अशा व्हायरल मेसेजच्या नादाला लागू नका. जुहीचा मुद्दा वेगळा होता आणि हा कोरोनाचा व्हायरल मेसेज वेगळा आहे. लगेच तावातावाने टॉवर जाळायला घराबाहेर पडू नका. घरातच बसा, सेफ डिस्टन्स ठेवा आणि मास्क लावा..

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.