आमीरसारखां दिसत नाही म्हणून शाहरूखला नकार देणारी जुही.
अनेक जणांप्रमाणे शाहरुख सुद्धा जीवाची मुंबई करायला दिल्लीमधून आला होता. शाहरुख खान बरोबर काम करायला बॉलीवूडमधला प्रत्येकजण उतावीळ असतो. एक काळ होता जेव्हा शाहरुखला कोणी दारात ही उभं करत नव्हत.
खर तर शाहरुखचा चेहरा इंडस्ट्रीसाठी पूर्णपणे अनोळखी नव्हता. दिल्लीमध्ये असतानाच तो टिव्ही सिरीयलचा स्टार झाला होता. सर्कस, फौजी सारख्या त्याच्या सिरीयल गाजल्या होत्या. पण त्याचं हेचं टिव्हीस्टार असण हा बॉलीवूडसाठी मायनस गुण होता.
शाहरुखला मुंबईत राहण्यासाठी जागा सुद्धा नव्हती. पण तेव्हा त्याला मुंबईमधल्या अनेक मित्रांनी राहायला जागा देण्यापासून खावूपिवू घालण्यापर्यंत खूप मदत केली.
अशातच त्याचा खास मित्र होता विवेक वासवानी.
विवेक वासवानी हा छोटा प्रोड्युसर आणि पार्टटाईम नट होता. अनेक निर्मात्यांकडे शाहरुखला घेऊन तो जायचा. शाहरुखच्या कौतुकाचे इमले त्यांच्या पुढे रचायचा. पण कोणीही त्याला घास टाकायचे नाही.
तेव्हा शोलेचे निर्माते जी.पी. सिप्पी सलमानला घेऊन पत्थर के फुल बनवत होते. विवेक वासवानी या चित्रपटात सहनिर्माता होता. त्याने जी.पी. सिप्पींकडे शाहरुख साठी गळ टाकला. त्यांनी शाहरुख ला भेटायला ऑफिस मध्ये बोलावलं. त्याला पाहताच ते विवेक ला म्हणाले,
“ये कैसा हिरो?? इसके तो बाल भालू जैसे है.”
शाहरुखला थोबाडीत मारल्यासारख झालं. कपडे केस यांच्याकडे लक्ष न देताच तो सिप्पीना भेटायला गेला होता. सिप्पींच्या डोक्यात हिरो म्हणजे उंचापुरा गोरापान पंजाबी मुंडा असावा असं गणित होत. त्यांनी शाहरुखला सरळ नकार दिला.
तेव्हा शाहरुखचा मित्र आणि त्याच्या गाजलेल्या सर्कस या सिरीयलचा दिग्दर्शक अझीझ मिर्झा हा एका कथेवर काम करत होता.
राजकपूरच्या जुन्या गाजलेल्या श्री ४२० या चित्रपटावर प्रेरित झालेली ती कथा होती. त्याची आणि सिप्पींची गाठ घालून देण्यात आली. सिप्पीना ती कथा खूप आवडली पण हिरो म्हणून त्यांना आमीर खान हवा होता. विवेक वासवानीला आमीरला साईन करण्यासाठी पाठवण्यात आलं. आमीर खान आणि सलमान खान हे तेव्हा मोठे स्टार होते.
आमीर खानला भेटल्यावर विवेकने आपल्या पिक्चरची कथा सांगितली पण या पिक्चरला नकार देण्याची विनंती केली. आमीरला तो म्हणाला
“मुझे ये फिल्म मेरे एक दोस्त को लेके बनानी है. सिर्फ सिप्पीजी को अच्छा लगे इस लिये मै तुम्हे मिल रहा हुं.”
आमीरला या वेड्या दोस्तीचं आश्चर्य वाटलं. पण तो यासाठी तयार झाला. तारखेचे कारण सांगून शोले बनवणाऱ्या सिप्पीना त्याने नकार दिला.
दरम्यानच्या काळात शाहरुखला हेमामालिनी दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात संधी मिळाली होती. विवेकच्या भूनभूनीला कंटाळून सिप्पींनीसुद्धा शाहरुखला घ्याचे ठरवले. पण त्यांनी विवेकला अट घातली की पत्थर के फुल पिक्चर मध्ये जो त्याचा नफ्याचा वाटा आहे त्यातून हा पिक्चर बनवण्यात येईल.
विवेक वासवानीला धंद्यातल्या नुकसानीपेक्षा आपला दोस्त फिल्म मध्ये लॉंच होतोय याचाच आनंद जास्त होता. अझीझ मिर्झाचा पिक्चर जीपी सिप्पी प्रोड्यूस करणार आणि शाहरुख त्यात काम करणार हे फायनल झाले.
या पिक्चरच नाव ठरलं राजू बन गया जंटलमन !
सगळी तयारी सुरु झाली. आता प्रश्न उभा राहिला. हिरोईन कोण ? शाहरुख सोबत कोणती नटी चांगली दिसेल याची खूप चर्चा झाली आणि शेवटी नाव पुढे आले जुही चावला. मिस इंडियाची स्पर्धा जिंकलेली जुही चावला अभिनयात सुद्धा चांगली होती.
नुकताच तिचा आमीरसोबतचा कयामत से कयामत तक हा पिक्चर सुपर हिट झाला होता.
तिच्या घरात प्रोड्युसरची रांग लागलेली होती. विवेक वासवानी आणि अझीझ मिर्झा तिला भेटायला तिच्या घरी गेले. जुहीला पिक्चरची कथा आवडली. पण तिने त्या दोघांना पहिला प्रश्न विचारला की फिल्म चा हिरो कोण आहे? अझीझ मिर्झानी सांगितलं शाहरुख खान. जुहीनं हे नाव पहिल्यांदाच ऐकलं होत.
तिन सरळ विचारलं “दिखता कैसा है?” अझीझ मिर्झा ला काय उत्तर द्यावं ते कळेना.
रूढ अर्थाने शाहरुख काही देखणा नव्हता. तेव्हा सिंधी डोकं असलेला विवेक त्याच्या मदतीला धावून आला. तो म्हणाला,
“ये हिरो नेक्स्ट आमीर खान है.”
हिरो आमीर खान सारखा दिसतो म्हटल्यावर जुही पिक्चर मध्ये काम करायला तयार झाली. फिल्मच्या शुटिंगच्या पहिल्या दिवसापर्यंत अजूनही जुहीला माहित नव्हते शाहरुख खान कसा दिसतो. सेटवर त्याला बघताच जुहीचा चेहराच उतरला. तिने विवेक वासवानीला फोन केला.
“what nonsense? ये कहांसे आमीर खान जैसा दिखता है?”
जुही ची कशीबशी समजूत काढण्यात आली. तसंही तिने फिल्म साईन केली होती. मग आता परत फिरायचं नाही असा निर्णय तिने घेतला.
अशी कटू सुरवात होऊन ही जुहीची आणि शाहरुखची सेटवर थोड्याच दिवसात मैत्री झाली. राजू बन गया जंटलमन हिट झाला. त्याच्या अगोदर रिलीज झालेला शाहरुखचा दिवाना सुपरहिट झाला होता. शाहरुख खान हे नाव फेमस झाले.
पुढे त्या दोघांनी अनेक सिनेमात सोबत काम केलं. अझीझ मिर्झाला घेऊन ड्रिम्झ अनलिमिटेड नावाची फिल्मकंपनीदेखील काढली. आयपीएलच्या कोलकाता नाईट राईडर्स मध्ये देखील शाहरुख आणि जुही एकत्रच आहेत.
आणि विवेक वासवानी?
तो अजूनही छोटा प्रोड्युसर आणि पार्टटाईम नट आहे. कधीकधी कुठल्या तरी सिनेमात पात्रांच्या गर्दीत दिसतो. पण शाहरुखसोबतच्या मित्र मैत्रिणी, खुशमस्कर्यांच्या गराड्यात कधी त्याच दर्शन होत नाही.
हे ही वाच भिडू.
- निर्जरा सिंगल स्क्रिन थिएटरची शेवटची हिरोईन होती.
- पांचजन्य मधून नारा दिला : तुमचा शाहरुख तर आमचा ह्रितिक
- शाहरुख सिर्फ दो मिनिट..
- तब्बू आज ४७ वर्षांची झालीये, अन ह्या वयात सुद्धा तिचं लग्न न करता राहणं मला चोरटं सुख देतं.