गुडघ्याला बाशिंग बांधून हे लग्नाळू जोडपं जेलमध्ये लग्न करणारेत !

तुम्ही डेस्टीनेशन वेडिंग पाहिलं असेल…फार तर फार गोवा किंव्हा मग लयच श्रीमंत, सेलेब्रेटी लोकं असतील तर मालदीवमध्ये …असो तुम्हाला अशा लग्नांची जर निमंत्रण आली तर तुम्ही जायचा चान्स सोडत नसाल. पण एक असं लग्न आता होणारे. डेस्टीनेशन वेडिंग म्हणायला हरकत नाहीये..पण तुम्ही  त्या लग्नाला जाऊ शकत नाही……पण का ?

तर हे लग्न तुरुंगात होणार आहे ! उडाली ना भंबेरी ???

हो असं आगळवेगळं लग्न होणार आहे तेही एका हायप्रोफाईल जोडप्याचं. तुम्ही म्हणाल हौस म्हणून लोकं कुठेही लग्न करत सुटलीत. थांबा जरा..हि काय हौस म्हणून जेल मध्ये लग्न होत नाहीये तर वेळच तशी आलीये….

कुणावर ??? तर बहुचर्चित विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांच्यावर… ज्युलियन असांज हे त्यांच्या भावी पत्नी स्टेला मॉरिसशी लंडनच्या हाय सेक्युरिटी जेलमध्ये लग्न करणार आहेत. ते या जेल मध्ये कैदी आहेत. 

त्यांचं नशीब चांगलं म्हणा ब्रिटनच्या जेल सर्व्हिसने त्यांच्या लग्नाचा अर्ज स्वीकारलाय, अन त्यांच्या लग्नाला परवानगी देत त्या जेलच्या जेलरनेही माणुसकी दाखवली.

हे सगळं ठरल्यानंतरच या लग्नाळू जोडप्यांनी सगळीकडे आपल्या लग्नाची  बातमी  दिली. अन वरून अशाही भावना व्यक्त केल्यात कि, त्यांना आशा आहे की त्यांच्या लग्नात आणखी कोणताही अडथळा येणार नाही…सुखासुखी लग्न होवो असं या जोडप्याने नवसच केलेला दिसतोय.

या जोडप्याच्या लग्नाला मात्र बराच विरोध झाला होता.

बरं यांची स्टोरी काय आहे ते पाहणे महत्वाचे आहे. ज्युलियन असांज आणि स्टेला मॉरिस या दोघांची लव्हस्टोरी २०१५ मधेच सुरु झाली. पण स्टोरी सुरु झाल्यानंतर २ वर्षांनंतर या जोडप्याने साखरपुडा केला होता.  म्हणजेच भावाने ६ वर्षांच्या रेलेशनशीपनंतर लग्नाचा निर्णय घेतलाय. 

आम्ही काय आमच्या मनाची स्टोरी सांगत नाहीये तर द गार्डियनच्या वृत्तानुसार, असांज आणि त्याची जोडीदार स्टेला मॉरिस यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांना लग्न करण्यापासून रोखलं जात होतं. खूप प्रयत्नानंतर या जोडप्याला लग्नाची मान्यता मिळालीये.   या जोडप्याने ब्रिटनचे न्यायमंत्री डॉमिनिक राब आणि तुरुंगाचे गव्हर्नर यांच्यावर लग्नापासून बंदी घातल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केलेला.

पण ज्युलियन असांज जेल मध्ये का आहेत ?

यूके पोलिसांनी त्यांना २०१९ मध्ये अटक केली होती. खरं तर ज्युलियन असांज हे ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. त्यांच्यावर स्वीडनमध्ये घडलेल्या एका लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला गेला होता, त्यानंतर असांजने शिक्षा टाळण्यासाठी ते इक्वेडोरच्या दूतावासाकडे शरण आलेले. पण त्यांनी त्यांच्यावर झालेले  लैंगिक छळाचे आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. त्यामुळेच त्याच्यावरील आरोप मागे घेण्यात आले आहेत. २०१९ मध्ये त्याला यूके पोलिसांनी अटक केली होती. त्याच वेळी, असांज यांना अमेरिकेत गुप्त कागदपत्रे लीक केल्याबद्दल हेरगिरीच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. 

अफगाणिस्तान आणि इराक युद्धांशी संबंधित अनेक लष्करी आणि संरक्षण दस्तऐवज विकिलिक्सने प्रकाशित केले होते आणि तेंव्हाच असांज अडचणीत सापडले होते.

तर त्यांच्या भावी आयुष्याची जोडीदार स्टेला मॉरिस या व्यवसायाने वकील आहेत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. २०११ मध्ये दोघांची भेट झाली होती आणि त्यांची मैत्री झाली. मॉरिस दीर्घकाळापासून असांजच्या सुटकेसाठी खटला लढत आहे. असांज आणि मॉरिसचे नाते २०१५ मध्ये सुरू झाले आणि दोन वर्षांनंतर दोघांनी साखरपुडा केला होता.

मॉरिसने गेल्या वर्षी उघड केले की असांजने २०१२ मध्ये इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय मागितल्यापासून मॉरिस दोन तरुण मुलांचे संगोपन करतेय.

बरं तुम्हाला हे ,माहितीये का ? ब्रिटीश कायदा कैद्यांना तुरुंगात लग्न करण्यासाठी परवानगी देतो.

१९८३ विवाह कायदा अंतर्गत यूके कायदा कैद्यांना तुरुंगात लग्नासाठी अर्ज करण्याची परवानगी देतो. मात्र लग्न करणाऱ्यांना त्यांच्या लग्नाचा खर्च स्वतः चा स्वतः करावा लागतो. असो,

आता गुडघ्याला बाशिंग लावून नवरा पोरगा अन नवरी पोरगी रेडी आहे…त्यामुळे जेल मध्ये होणारे हे लग्न कसल्याही रुसव्या- फुगव्यानिशी पार पडावं म्हणजे मिळवलं !

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.