औरंगाबादचा ज्यूनिअर चार्ली चॅप्लीन जो अख्ख्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करतोय.

चार्लीच्या डोक्यावरची टोपी, काळा  कोट, तशीच पॅन्ट घालून हातात छडी घेतली कि त्याच्यात चार्ली उतरतो. मेकअप केला की तो बोलत नाही, चार्ली चॅप्लीनसारख्याच मूकाभिनयातून तो व्यक्त होतो. त्याच्या हसऱ्या चेहेऱ्यावरच्या हास्या पाठीमागचे मेकअप उतरल्यावरच कळते. तो म्हणतो,

 ” खात्यापित्या घरचा असतो तर चार्ली कशाला उतरला असता अंगात ?”

ही कहाणी आहे ज्युनिअर चार्ली चॅप्लिन ची म्हणजे सोमनाथ स्वभावने ह्याची.  

सडपातळ बांध्याचा आणि  आपले दोन्ही डोळे विरुद्ध बाजूला फिरवणारा सोमनाथ आपल्या वडीलांसोबत पैठण हुन औरंगाबादला आला तेव्हा स्मशानातल्या एका खोलीत राहत होता. तिथं त्याचे वडिल वॉचमन ची नोकरी करायचे. पैशांची चणचण सांगू नये एवढी होती. काही दिवसांनी त्यांच्या वडिलांना शिवहारअप्पा ह्यांना जगन्नाथ वाडकर या माणसाने नोकरी दिली. जगण्याचं गणित सोडवण्यासाठी ते सुयोग मंगल कार्यालयात काम करायला लागले.

सोमनाथ त्यावेळेस शाळेत जात होता. त्या आधी त्याने दोन शाळाना रामराम केला होता. शाळेत जात असतानाच त्याने एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. या कामात तो चांगलाच तयार झाला होता.

याकाळात त्याने पेपर टाकण्यापासून ते बजाज हॉस्पिटलपर्यंत पडेल ते काम केले. यातून थोडे पैसे गाठीशी आले मग कँटीनच कॉन्ट्रॅक्ट घेतलं. त्यात त्याचा चांगला जम बसला. सोबत आवड म्हणून अंगावर चार्लीचा कोट चढवला. कँटीनच्या व्यवसायामधून चांगले पैसे मिळू लागले. त्यातून त्याने चार गाड्या घेतल्या आणि त्या भाड्यानं द्यायला सुरुवात केली.

सगळं व्यवस्थित चालू असताना त्याच्या धंद्याचं गणित बिघडत गेलं आणि त्याला काही लाखाचं कर्ज झालं. सगळंच उलट होत होत. नवरा बायकोत वाद होऊ लागले. सासुरवाडीत पण त्याला खूप मनस्ताप सहन करावा लागला. गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या त्यात त्याची बायको पण त्याला सोडून माहेरी निघून गेली.

अनपेक्षित अपयशाने तो खचून गेला. जगण्याची उमेद संपली. आत्महत्या करावी आणि आयुष्य संपवावा असं त्याला वाटायला लागलं. त्याने तस केलही पण ते म्हणतात ना “देव तरी त्याला कोण मारी” तसेच त्याच्या सोबत झालं.

त्यातून बचावल्या नंतर त्याने एसटीचा लाल डब्बा पकडून मुंबईचा रस्ता धरला. इथं आल्यानंतर त्याने त्याचा काळा कोट घातला. गोल टोपी डोक्यात घातली. आणि मेकअप करून तो जुहू चौपाटी, काळा घोडा परिसरात ज्युनिअर चार्ली म्हणून फिरायला लागला.

लोकं त्याच्याकडे बघायची, हसायची. लहान पोर त्याच्या आजूबाजूला खेळायलाची. लोक त्याला पैसे द्यायला लागले. थोडे पैसे जमले त्यातून त्याने एक चादर घेतली. आणि फुटपाथ वर जिथं जागा मिळल तिथं झोपायला लागला.

हाच त्याचा  दिनक्रम झाला होता. दिवसभर लोकांना हसवत फिरायचं, रात्री पैसे किती आहेत हे बघून मिळलं ते खायचं. आणि जागा मिळल तिथं झोपायचं.

अशाच एका दिवशी दासबाबू नावाच्या एका दिग्दर्शकाने त्याला पाहिलं आणि त्याला एका पिच्चर मध्ये काम दिल. त्यानंतर त्याला लोकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलवायला सुरुवात केली. त्याच्या राहण्याचा प्रश्न आता मिटला होता. आता त्याला बऱ्या पैकी पैसे मिळायला लागले होते.

“हसरं दुःख” हे पुस्तक वाचून झाल्यानंतर सोमनाथ चार्लीच्या जास्तच प्रेमात पडला होता.

आता या ज्युनिअर चार्लीला त्याची एक चाक मोठं आणि एक चाक लहान असणारी आवडती सायकल मिळाली आहे. त्याच्यावर बसून आता तो वेगवेगळे हावभाव करत निघाला कि सगळ्या लोकात नुसता आनंद पसरतो. मानस हसायला लागतात. पण हे हसरं दुःख काही लपून राहत नाही.

तो फक्त दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवून त्यांचे दुख्खः हलके करत नाही तर त्याला सामाजिक भान देखील आहे. स्वच्छ भारत असो अथवा व्यसनमुक्ती असो या सामाजिक कार्याच्या जागृतीसाठी तो कार्य करत असतो. वेगवेगळ्या सरकारी संस्था त्याला यासाठी खास बोलावून घेत असतात.

गेल्यावर्षी त्याने देहदानाच्या जागृतीसाठी १४ दिवसात औरंगाबाद ते काश्मिर हा १४ हजार किलोमीटरचा प्रवास केला.

37030250 2192974750945254 7041420013583990784 n

मृत्यूनंतरही आपला उपयोग समाजासाठी व्हावा या विशुद्ध हेतूने सोमनाथ प्रेरित झाला आणि याची सुरवात स्वतःच्या देह्दानापासून केली. एकेकाळी त्याच्यावर रुसून गेलेली त्याची पत्नी रुपाली हीसुद्धा त्याच्या या अनोख्या उपक्रमात सहभागी झाली. हे दोघे व त्यांचे काही मित्र यांनी बस रेल्वे मिळेल त्या वाहनाने हा प्रवास केला आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यापासून सीमेवर लढणाऱ्या जवानापर्यत सर्वाना देहदानाबद्दल जनजागृती केली.

जीवनाचा गाढा ओढत असताना कधी हसत कधी दुःखाला बाजूला सारत, सामाजिक संदेश देत, मनोरंजन करत फिरणाऱ्या सोमनाथ स्वभावने म्हणजेच ज्युनिअर चॅप्लिन ह्याच्या नशिबात हे “हसरं दुःखच” आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.