Just sul (जस्ट सुल) म्हणजेच शांतीनाथ सूळ आपल्या सोलापूरचा आहे..!
बिग बॉसचा नाद लय डेंजर, भले तुम्ही टीव्हीवर बघत नसाल, तरी सोशल मीडियावर कुठं ना कुठं बिग बॉसचा व्हिडीओ दिसतोच. एक बघितला की दुसरा आणि दुसरा बघितला की तिसरा, सायकल सुरुच. असंच बघता बघता बिग बॉसचा एक लेटेस्ट व्हिडीओ दिसला, तर त्यात आलेला दिसला ‘जस्ट सुल.’
त्यावरुन आठवला एक जुना किस्सा, तर विजय शिंदे नावाच्या एका भिडूचा मेसेज आलेला. काय तर म्हणे जस्ट सुल वर लिहिता का ? आम्ही तेव्हा म्हटलं लिहूया कि. एक भारतीय माणूस आपल्या कॉमेडी व्हिडीओनी अख्ख्या इंटरनेटला कच्चं खातोय म्हटल्यावर त्याच्यावर लिहायलाच पाहिजे. पण शिंदेनी आणि त्यांचे दोस्त सुदर्शन कादे या भिडूंनी आम्हाला माहिती दिली की ते जस्ट सुल नाही तर आपल्या सोलापूरचा सूळ आहे.
पहिली पाच मिनिटं आम्हाला हे जरा पचायला अवघड जात होतं. जगातल्या सगळ्यात फेमस कॉमेडियन पैकी एक समजला जाणारा जस्ट सुल आपल्या मोहोळचा आहे.
खरं नाव शांतीनाथ सूळ.
सूळ काका जन्मले १ जून १९६९ रोजी मोहोळच्या यावली या गावी. शेतकरी कुटुंब. दुष्काळी भाग. शांतीनाथ यांना लहानपणीच लक्षात आलं होतं शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. शाळेत हुशार देखील होते. पहिल्यांदा सोलापुरात डिप्लोमा इंजिनीरिंग केलं, तिथून पुढे मुंबईला आले. सरदार पटेल कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण केलं.
सुरवातीचं वडिलांच्या मित्राच्या ओळखीने त्यांना आखाती देशात जॉब मिळाला. खोऱ्याने पैशे कमवायचे म्हणत विमानात बसून युएईला गेले. प्रत्येक मध्यमवर्गीय मिडलक्लास माणसा प्रमाणे मान मोडून काम केलं.
लॅमीज इन्व्हेस्टमेंट नावाच्या कंपनीत प्रोडक्शन मेंटेनन्स पासून ते पर्चेसिंग पर्यंत ए टू झेड गोष्टी हाताळल्या.
वयाच्या २१ व्या वर्षी प्रेमात पडून लग्न केलं. एक मुलगा आणि एक मुलगी असा छोटासा संसार चालला होता. सौदी अरेबियासारख्या तेलाच्या देशातून मग नंतर आफ्रिकन झाम्बियाकडे गेले. ठरवलेलं तस पैसे कमवले, गावाकडे म्हाताऱ्या आईवडिलांना चांगले सुखाचे दिवस आणले. भावाला पण झाम्बियाला आणलं. आई वडीलसुद्धा आफ्रिका बघायला आले.
धोतर लुगडं वाली हि मोहोळची साधीभोळी मंडळी विमानात बसून पाश्चात्य जगाची रौनक बघून दिपून गेलेली.
सगळं चांगलं चाललेलं. शांतीनाथ यांचा स्वभाव सुरवातीपासून हसरा आणि खेळकर. कधी कधी स्वतःवर जोक करत ते ऑफिसमधील वातावरण नेहमी हलकंफुलक ठेवायचे. विशेषतः बॉसच्या मुलाशी सईद अहमदशी त्यांचं चांगलं जुळायच. दोघांच्या वयात मोठा गॅप होता पण तरीही सेन्स ऑफ ह्युमर मूळे दोघांची चांगली मैत्री झाली होती.
एक दिवस शांतीनाथ यांना सईदने सहज बोलता बोलता विचारलं की,
“सुल तुला फेमस व्हायचं आहे काय?”
शांतीनाथ काका म्हणाले, का नाही?
सईदने त्यांच्या साठी इंटरनेटच विश्व उघडून दिलं. दोघे मिळून छोटे छोटे कॉमेडी व्हिडीओ बनवू लागले. या व्हिडीओचा सेंटर पॉईंट सुळकाकाच असायचे. त्यामुळे नाव देखील दिलेलं,
JUST SUL
ते वर्ष होत २०१५. हिपहॉप कल्चर आणि इंडियन माणूस ही थीम घेऊन त्यांनी व्हिडीओ बनवायला सुरवात केली. थोडयाच दिवसात ते प्रचंड फेमस झाले.
फेसबुक युट्युब इन्स्टाग्राम सगळीकडे त्यांचा वावर सुरू झाला. अगदी भारतातही हे मीमंच जग नव्याने उघडलं जात होतं. थोडीशी चावट वाटणारी कॉमेडी देखील अप्रशिएट केली जात होती.अशात आपला एक भारतीय माणूस इंटरनेटवर धमाका करतोय म्हटल्यावर लक्ष जाणे साहजिक होतं.
रंगेबिरंगी कपडे, गळ्यात सोन्याची चेन, हातात अंगठ्या, रांगडी सोलापुरी मिशी, थोडंस सुटलेलं पोट, छातीवर काढलेलं टॅटू, सोबत एखादी भारी लॅम्बोरगिनी, हॉट मुलगी, आणि सगळ्या जगातल्या मद*फक* बीचेस ना आपल्या अर्ध्या कच्च्या इंग्लिशमध्ये स्वॅगची चव दाखवणारा शांतीनाथ सुळ जस्ट सुल म्हणून जगभरात फेमस झाला.
कधी रोनाल्डो तर कधी द रॉक, किम कार्डेशियन तर कधी निकी मिनाज यांच्या सारखे कपडे घालून नक्कल करत जस्ट सुल पार हॉलिवूड पर्यंत गाजू लागले. त्यांची ओळख इंटरनॅशनल स्टार अशी बनली.
आज जस्ट सुल हा एक ब्रँड बनलाय. जस्टीन बिबर पर्यंत कित्येक सेलिब्रिटी त्यांचे फॅन बनले. इन्स्टाग्रामवर त्यांचे लाखोंनी फॉलोवर आहेत. पोगबा सारखा फुटबॉल जगतातला देव त्यांची भेट घेतो त्यांच्या बरोबर व्हिडीओ बनवतो हि छोटी गोष्ट नाही.
ज्या सईद अहमदच्या वडिलांकडे त्यांनी वीस वर्ष काम केलं तो सईद आता त्यांचा मीडिया मॅनेजर बनलाय.
सोलापूरमधल्या एका छोट्याशा खेड्यातून आलेला मुलगा एक मोठा ब्रँड बनलाय हा काही साधा चमत्कार नाही.
आजही सूळ हेटर्स विल हेट असं म्हणत स्वतःवर जोक बनवणारे व्हिडीओ बनवतात, काही वेळा त्यात थोडासा खट्याळ वाटेल असा कंटेन्ट असतो. कधी दारू सिगरेट न पिणाऱ्या शांतीनाथ सूळ यांना विचारलं कि, तुम्ही हे का करता तर ते सांगतात,
“I like to make people laugh. LAUGH IS LIFE.”
सिगरेट तुमचं आयुष्य १० मिनिटांनी कमी करते तर हसू तुमचं आयुष्य कितीतरी पटीने वाढवते. आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी स्माईल जरी आता आली तरी ती आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे असं जस्ट सुल यांना वाटत.
दोन महिन्यांपूर्वी शांतीनाथ सूळ यांच्या वडिलांचं निधन झालं म्हणून ते भारतात आले होते. त्यांनी तसा व्हिडिओदेखील इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तो व्हिडीओ पाहून अनेकांना कळालं की हे फेमस जस्ट सुल आपल्या मोहोळचे आहेत.
ते इंटरनेटवर फेमस झाले असले तरी त्यांनी आपल्या मेकॅनिकलच्या बिझनेसकडे दुर्लक्ष केलेलं नाही. आजही जस्ट सुल अधूनमधून मोहोळला येत असतात. त्यांच्या वागण्यात आजही सोलापुरी साधेपणा आणि राऊडीपणा तसाच आहे.
कितीही मोठा झाला तरी मराठी माणूस आपल्या मातीला विसरत नाही हे शांतीनाथ सूळ उर्फ जस्ट सुल यांनी दाखवून दिलंय.
हे ही वाच भिडू.
- जगभरातल्या सेलिब्रिटींनी हिरो आलोमचा आदर्श घ्यावा
- काय पण म्हणा रंजना अशोक सराफला कॉमेडीत जडच जायची.
- दामाजी पंतांचे दुष्काळी मंगळवेढा जगभरात ज्वारीचं कोठार म्हणून फेमस झालंय
- हार्मोनियमवाला अब्बा सुषमा स्वराज आणि मुशर्रफ दोघांचा लाडका होता