या निवडणुकीने दाखवून दिलं भविष्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री ज्योतिरादित्य शिंदे असू शकतात.

ज्योतिरादित्य शिंदे! एकेकाळी कॉंग्रेसचा तडकता फडकता तरुण चेहरा. टीम राहुल गांधी मध्ये त्यांच नाव सगळ्यात आघाडीवर होतं. प्रचारात दोघे एकतर दिसायचे. अगदी लोकसभेत राहुल गांधी यांच्या शेजारी बसून त्यांना भाषणात मदत करताना देखील आपण पाहिलं.

फक्त राहुल गांधीच नाही तर प्रियंका गांधी जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराला उतरल्या तेव्हा सावलीसारखे ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्या पाठोपाठ होते.

दोन वर्षांपूर्वी जेव्हा मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रचारात प्रचंड  जोर लावला, १५ वर्षांच्या कारकीर्दीनंतर भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांना खाली खेचून कॉंग्रेसने विजयी पताकादेखील फडकवली. 

तेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया यांची साहजिकच अपेक्षा होती कि आपल्याला मुख्यमंत्री बनवण्यात येईल. पण तसे घडले नाही. कमलनाथ आणि दिग्विजय सिंग हे जुने विरोधक एकत्र आले आणि त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना मुख्यमंत्रीपदापासून लांब ठेवण्यात बाजी मारली.

ज्योतिरादित्य सिंधिया तेव्हा पासून कॉंग्रेस मध्ये नाराजच होते. लोकसभा निवडणुकीत त्यांचा अनपेक्षितपणे घरच्या मतदारसंघातून ते हरले. या पराभवामध्ये कमलनाथ यांचाच हात आहे हे त्यांच्या मनात बसलं होतं. तरीही  सिंधिया गप्प बसले.

मागच्या वर्षी जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका आल्या तेव्हा मात्र त्यांच्या संयमाचा बांध फुटला. दिग्विजय सिंह यांनी चापटरपणा करून सिंधिया यांच तिकीट कापलं, या अपमानामुळे भडकलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडली.

याची वाटच पाहत असलेल्या भाजपने पुरेपूर फायदा उठवला. ज्योतिरादित्य सिंधिया यांना पक्षात घेतल. सिंधिया हे एकटेच भाजपमध्ये गेले नाहीत तर कॉंग्रेसला मोठी खिंडार पाडून गेले. काँग्रेसचे २०-२२ आमदार सिंधिया यांच्या सोबत गेल्या मुळे कमलनाथ यांचे सरकार अनाथ झाले आणि जोरात आपटले.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या समर्थक आमदारांनी आपल्या आमदारकीची बाजीच लावली होती. पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तिथे पोटनिवडणूक लागली.

कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांना विश्वास होता कि या जागा कॉंग्रेस पुन्हा खेचून आणू शकेल. त्यांनी तशी तयारी देखील केली होती. भाजपच्या नाराजांना तिकिटे दिली. पण ज्योतिरादित्य शिंदे मात्र यंदा पूर्ण तयारीने उतरले होते. एक तर त्यांना भाजप नेतृत्वाला आपण काय करू शकतो हे दाखवून द्यायचं होतं पण बरोबरच आपल्या समर्थक आमदारांना त्यांनी दाखवलेला विश्वास सिद्ध करून दाखवायचा होता.

निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या आणखी ३ आमदारांनी पक्ष सोडला. कॉंग्रेस २ आणि भाजपच्या एका आमदाराच्या निधनाने आणखी ३ जागा रिक्त झाल्या होत्या. अशा एकूण २८ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीमुळे कमलनाथ पुन्हा येतील असा आशावाद दाखवत होते.

पण आत्ता पर्यंतचा निकाल पहिला तर कॉंग्रेसचा मध्यप्रदेशच्या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे.  ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक मोठ्या संख्येने निवडून येत आहेत. भाजपला त्यांनी आपलं महत्व दाखवून दिलं आहे. 

खरं तर त्यांच्या शिंदे घराण्याला भाजप जुने नाही. त्यांची आजी विजयाराजे या भाजपच्या स्थापनेत पुढे होत्या. त्यांचे वडील माधवराव देखील भाजपकडून निवडणूक जिंकले होते मात्र पुढे त्यांनी आईची नाराजी पत्करून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. जर त्यांचं अपघाती निधन झालं नसत तर ते कॉंग्रेसचे पंतप्रधान देखील बनले असते. त्यांची बहिण ज्योतिरादित्य यांची आत्त्या वसुंधराराजे या देखील राजस्थानच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत.

ज्योतिरादित्य यांची मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा आहे हे सगळ्यानाच माहिती आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या कारभाराला जनता कंटाळली होती हे देखील मागच्या निवडणुकीच्या पराभवानंतर स्पष्ट झालं होतं. ज्योतिरादित्य यांना पक्षात घेताना तसे काही आश्वासन दिले गेले नव्हते तरी त्यांना आज ना उद्या ते पद हवे आहे आणि ते त्याचा दावा देखील करतील. फक्त आजच्या विजयाने हि दावेदारी आणि भाजपमधील त्यांचे स्थान पक्के झाले हे नक्की.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.