शंभूराजांच्या सुटकेसाठी लढणाऱ्या ज्योत्याजी केसरकरांच्या नावाने सातारच्या गादीने अख्खी पेठ वसवली

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास. शिवछत्रपतीसारख्या सिंहाचा हा छावा. त्यांच्या पराभवासाठी खुद्द औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात उतरला. मुघलांचे मोठ मोठे सरदार याच उद्देश्याने जंग जंग पछाडत होते. एवढेच नाही तर इंग्रज, पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी, म्हैसूर असे सगळे बलाढ्य शत्रू स्वराज्यावर डूख धरून होते

या साऱ्यांशी संभाजी महाराजानी एकाच वेळी झुंज दिली. त्यांचा पराभव केला. पण शंभूराजांचा घात केला तो स्वकीयांनी.

संगमेश्वर येथे त्यांच्यावर दगाफटका झाला. फितुरांच्या मदतीने मुघल सरदार मुकर्र्बखानाने मोठ्या सैन्यासह हल्ला केला. मराठ्यांचे संख्याबळ कमी पडले. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत.

सेनापती म्हाळोजी घोरपडे व अनेक वीर या प्रसंगी धारातिर्थी पडले. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

विद्युत वेगाने त्यांना औरंगजेबाकडे नेण्यासाठी बहादूरगडाच्या दिशेने मुकर्र्ब खान निघाला. 

अनेक जणांना प्रश्न पडतो की संगमेश्वर ते बहादूरगड या जवळपास साडे तीनशे किलोमीटरच्या अंतरात महाराजांना वाचवण्यासाठी कोणीच पुढ आलं नव्हतं का?

तर याच उत्तर आहे अनेकांनी यासाठी प्रयत्न केले होते.

यात सर्वात पहिला हल्ला केला होता ज्योत्याजी केसरकर यांनी.

ज्योत्याजी केसरकर संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते. महाराजांच्या प्रत्येक स्वारी शिकारीच्या प्रसंगी ते सोबत असायचे. मात्र संगमेश्वरच्या बैठकीत ते हजर नव्हते. जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी पडली तेव्हा ते पेटून उठले. कोणत्याही आज्ञेची वाट पहात बसले नाहीत. स्वराज्याचा पोशिंदा मुघलांच्या ताब्यात गेला आहे आणि त्याला आपल्याला सोडवून आणायचं आहे हेच त्यांच्या डोक्यात होतं.

त्यांनी काही धनगर मुलांची तुकडी त्यांनी तयार केली.

मुकर्र्बखान मोठी तयारी करून आला होता. त्याचा हा हल्ला अचानक झाला नव्हता तर त्याने या कारवाईची आखणी व त्यानंतर बहादूरगडाला जायचं नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केल होतं. पण तरीही बत्तीस शिराळा जवळ अचानक झालेल्या हल्ल्याने तो थोडासा गोंधळला.

उणे-पुरे शंभर मावळे घेऊन जोत्याजी मोघलांवर तुटून पडले होते.

आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे समोर येईल त्याला कापत सुटले होते. सगळ्यात आघाडीवर असलेल्या ज्योत्याजीना  हजारोंच्या गर्दीत साखळदंडानी बांधले गेलेले स्वराज्याचे छत्रपती दिसत होते.

जीवाच्या आकांताने हे मावळे लढत होते मात्र त्यांचं बळ तोकड पडलं.

मुघलांचा संख्याबळाचा जोर मोठा होता. दुर्दैवाने सगळे मावळे धारातिर्थी पडले. रक्ताने न्हाऊन निघालेले ज्योत्याजी केसरकर सुद्धा त्या शिराळ्याच्या जंगलात जमिनीवर जखमी होऊन कोसळले.

संभाजी महाराजांना सोडवण्यात ते अपयशी ठरले. असाच शेवटचा प्रयत्न संभाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक रायाप्पा महार यांनी देखील केला होता. मात्र त्यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी ठार केलं.

क्रूर औरंगजेब बादशाहने संभाजी महाराजांचे हाल हाल केले.

त्यांचे डोळे काढले, कातडी सोलून काढली, त्यांची धिंड काढली. मात्र शेवटपर्यंत शंभू राजांनी आपला स्वभिमान सोडला नाही. अखेर त्यांच्या व कवी कलशाचा शिरच्छेद करण्यात आला व शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापुर वढू येथे फेकून देण्यात आले.

मराठी सत्तेसाठी हा मोठा धक्का होता. महाराणी येसूबाई यांच्या नेतृत्वाखाली राजधानी रायगडावर नेटाने लढा देण्यात आला. मात्र पुन्हा एकदा स्वकीयांच्या गद्दारीमुळे मुघलांना अजिंक्य अशा रायगडावर विजय मिळवता आला.

राजाराम महाराज सुखरूपपणे पन्हाळा व तिथून दक्षिणेत जिंजीला निघून गेले. मात्र येसूबाई राणीसाहेब आणि युवराज शाहू महाराज मुघलांच्या तावडीत अडकले.

संभाजी महाराजांशी क्रूरपणे वागणाऱ्या औरंगजेबाने शाहू महाराजाना त्रास दिला नाही. पंचवीस वर्ष तो महाराष्ट्रात राहून मराठ्यांना संपवण्यासाठी तडफडत राहिला मात्र संताजी धनाजी अशा सरदारांनी ताराराणी बाईसाहेबांनी लढा चालू ठेवला.

मराठ्यांच्या चिवटपणामुळे अखेर औरंगजेब बादशाह मराठी मातीत गाडला गेला.

युवराज शाहू महाराजांची सुटका झाली. त्यांनी महाराष्ट्रात परत येऊन छत्रपतीपदावर हक्क सांगितला. करवीरपाठोपाठ सातारा येथे स्वराज्याची स्वतंत्र गादी निर्माण झाली.

शाहूराजांना औरंगजेबाने नासधूस केलेलं स्वराज्य परत उभा करण्याच आव्हान समोर होतं. अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यामध्ये सर्वप्रथम होते संभाजी महाराजांचे निष्ठावंत सेवक ज्योत्याजी केसरकर.

औरंगजेबाच्या कैदेत असतानाही शाहू महाराज व येसूबाईराणीसाहेब यांच्या विश्वासात तेच होते.कैदेत असतानाच शाहूरायांच लग्न जुळवण्यात देखील त्यांनीच पुढाकार घेतला होता.

सातारच्या दरबारात ज्योत्याजीनां प्रमुख सल्लागारांमध्ये स्थान दिल.

शाहू महाराजांनी त्यांना सरदेशमुखी दिली, १८ कारखान्याचा अधिकार दिला. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून सातारा शहरात केसरकर पेठही वसवली.

आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुनाळ या छोट्याश्या गावात संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या जोत्याजी केसरकरांची समाधी आपल्यास पाहायला मिळते.

हे ही वाच भिडू.