कानडी भाषिक करिअप्पा शिवसेनेच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवायला उतरले…

५ जून १९६६ रोजी शिवसेना नावाच्या वादळास सुरवात झाली. बाळ केशव ठाकरे या प्रबोधनकार ठाकरेंच्या लेकाने मराठी माणसाला आवाज मिळावा म्हणून शिवसेना हा पक्ष स्थापन केला होता. त्याकाळी तरुणाईमध्ये बेरोजगारीमुळे प्रचंड असंतोष पसरला होता. दक्षिणेतील येणारे यंडूगुंडू आपल्या हक्काच्या नोकऱ्या पळवत आहेत असं बाळासाहेबांनी पटवून दिलं.

मुंबईमधून हजारो तरुण त्यांच्या पाठीशी उभे राहू लागले. त्यांच्या सभांना, व्याख्यानांना गर्दी होऊ लागली. बाळासाहेब ठाकरे सोपं बोलतात पण थेट बोलतात, आणि हृदयाला हात घालणारं बोलतात हे अनेकांना आवडत होतं. यातूनचं शिवसेना आणि मराठी माणूस हे एक अतूट समीकरण तयार झाले.

पण याच शिवसेनेनं त्यावेळी एकदा दाक्षिणात्य उमेदवाराला थेट पाठिंबा दिला होता. त्यांचं नाव म्हणजे,

भारताचे पहिले फिल्ड मार्शल जनरल करिअप्पा

मूळचे कर्नाटकचे असलेले कोंडाडेरा मडप्पा करियअप्पा अर्थात के.एम करिअप्पा हे भारताचे पहिले फिल्ड मार्शल होते. १५ जानेवारी १९४९ रोजी सेना प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. याच कारणामुळे १५ जानेवारी हा सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. करिअप्पा राजपूत रेजिमेंटमधून होते. पुढे १९५३ मध्ये त्यांनी सैन्यातून निवृत्ती घेतली.

त्यानंतर त्याचवर्षी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना ऑस्ट्रेलियाचे राजदूत म्हणून तिकडे पाठवले. करिअप्पा यांनी ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंडमध्ये राजदूत म्हणून काम केलं. या काळात ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संबंध सुधारण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता.

१९५६ मध्ये परत आल्यानंतर त्यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी काम सुरु केलं. सोबतच १९६४ मध्ये त्यांनी Ex-Servicemen’s League देखील सुरु केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी वृत्तपत्रांमधून लिखाण सुरु केले. पण त्यांचं हे लिखाण बरेचदा वादग्रस्त ठरले होते. ते सैन्यातून आल्यामुळे त्यांच्या लिखाणावर हुकूमशाहीची छाप जाणवते अशी टीका व्हायची.

अशातच या टीकेला खतपाणी मिळाले ते १९६५ च्या मध्यावर. सगळी कायदा आणि सुव्यवथा रुळावर आणण्यासाठी आंध्रप्रदेशमध्ये कमीत कमी २ वर्ष तरी राष्ट्रपती राजवट असावी असं भाष्य केलं. त्यांच्या या दाव्यावर आंध्र प्रदेश विधानसभेत त्यांच्यावर विशेषाधिकार भंग प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता. सोबतच काँग्रेस कडून देखील त्यांच्यावर टिका करण्यात आली. 

काँग्रेसने करिअप्पा यांना या लेखांबद्दल धारेवर धरल्यावर त्यांनी स्वतः राजकारणात येऊन निवडणुकीत उतरायचं ठरवलं. त्यावेळी त्यांना मोठ्या संख्येनं सैन्यातून निवृत्त झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी पाठिंबा देऊ केला. यात लेफ़्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील-थोरात, एअर मार्शल रंजन दत्त, रेअर ऍडमिरल सदाशिव गणेश करमकर यांचा समावेश होता.

या सगळ्यांना वाटत होतं की,

जनरल करीअप्पा यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे भारतीय राजकारणातील जो एक हरवलेला घटक आहे तो कदाचित परत येईल.

करिअप्पा यांनी १९७१ च्या लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली. त्यांनी ईशान्य मुंबई हा मतदारसंघ निवडला. याच ठिकाणी अपक्ष म्हणून करीअप्पा यांनी अर्ज भरला. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करिअप्पा यांना आश्चर्यकारक रित्या पाठिंबा देऊ केला. इतकंच नाही तर त्यांची प्रचार मोहीमदेखील शिवसेनेच्या खांद्यावर घेतली.

दाक्षिणात्य लोकांवर टीका करणारे बाळासाहेब मुंबईत करिअप्पा यांचा प्रचार करतात यावरून बरंच खिजवलं गेलं. शिवसेना स्थापन झाली तेव्हा त्यांनी ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’चा नारा दिला असताना कानडी करिअप्पांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने जनसंघाच्या मंडळींना सेनेला डिवचण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे भिंतीवर घोषणा रंगली की,

‘मराठी माणसाच्या मारतात गप्पा, निवडून आणतात करिअप्पा’

१९७१ च्या त्या निवडणुकीत अशा घोषणा मुंबईत जागोजागी दिसू लागल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी या टीकांकडे दुर्लक्ष करत डोंबिवली वगैरे या भागात प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली. मिरवणुकी काढायला सुरुवात झाली.

करिअप्पा यांच्या याच मिरवणुकीत एक गडबड झाली होती. त्यामुळे तत्कालीन डीसीपी लोणे यांनी लाठीमार करून गडबड करणाऱ्यांना चोप दिला होता. तेव्हा कल्याणमध्ये चर्चा झाली होती की, लोणेसाहेब, मारायचे तर काठीला लोणी लावून तरी झोडायचे.

पुढे मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी या टीकांना आपल्या भाषणांमधून उत्तर द्यायला सुरुवात केली. करिअप्पा देशाचे लष्कर प्रमुख राहिले असल्यामुळे या सेनानीला आम्ही पाठिंबा देतोय असं बाळासाहेबांनी सांगितलं. पण याचा काहीच फायदा झाला नाही. करिअप्पा यांना या निवडणुकीत जोरदार पराभव पाहायला लागला. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मिळवावं लागलं.

त्यावेळी काँग्रेसच्या राजाराम गोपाल कुलकर्णी यांना २ लाख ८३ हजार मत मिळाली, तर भारतीय जनसंघाच्या मुकुंदराव सुंदरराव आगसकर यांना १ लाख ८ हजार मत मिळाली. तर जनरल करीअप्पा यांना ९० हजार ११० मत मिळाली. या पराभवानंतर मात्र करीअप्पा यांनी निवडणुकीपासून लांबचं राहणं पसंत केलं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.