पंजाबातील हिंदू शिखांमध्ये चाललेली आंदोलने सरसंघचालकांनी पंजाबात जाऊन शमवली होती

के एस सुदर्शन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २००० ते २००९ या काळात सरसंघचालक होते. सरसंघचालक होण्यापूर्वी त्यांनी संघाच्या महत्वाच्या विभागांचे प्रमुखपद भूषवले होते. आपल्या चौकस बुद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक महत्वाची आणि हिंसा घडवणारी आंदोलने थांबवली आणि शांततेच्या मार्गाने जाऊन ती तडीस नेली. त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया.

के एस सुदर्शन अर्थात कुप्पहली सीतारमय्या मूळचे तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेवर स्थित असलेल्या कुपहल्ली गावाचे रहिवासी होते. कन्नड परंपरेत सगळ्यात आधी गाव नंतर वडील आणि शेवटी स्वतःच नाव लावण्याची प्रथा आहे. एका कन्नड ब्राम्हण परिवारात के एस सुदर्शन यांचा १८ जून १९३१ रोजी जन्म झाला. सुरवातीच्या काळात ते चंद्रपुरातील जुबली हायस्कुल मध्ये शिकायला होते. 

वयाच्या केवळ ९ व्या वर्षी त्यांनी संघाच्या शाखेत भाग घेतला. वयाच्या २३ व्या वर्षी ते आरएसएसचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम बघू लागले. पूर्णकालीन प्रचार करणारे संघाच्या परंपरेनुसार लग्न करत नाही त्याप्रमाणे के एस सुदर्शन अविवाहित राहिले.

के एस सुदर्शन हे विविध भाषांचे जाणकार होते. भाषेवर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. अनेक विषयांवर ते बोलत असायचे. वाचन आणि निरीक्षण चांगलं असल्याने ते वक्तृत्वात सुद्धा कायम अग्रेसर राहिले. कुठल्याही समस्येच्या मुळाशी जाऊन तीच निराकरण करण्याची त्यांची वृत्ती होती. आलेल्या संकटांवर मात करण्याची त्यांची हातोटी होती. त्यांच्या वक्तृत्व आणि चौकस बुद्धीचा हा किस्सा-

पंजाबमधील खलिस्तानी समस्या असो किंवा आसाम प्रांतात बळजबरीने शिरकाव करणाऱ्यांविरुद्ध आंदोलन या दोन्ही समस्या त्यांनी आपल्या गहन अभ्यासाच्या आणि चिंतनाच्या जोरावर त्यांनी या समस्यांवर समाधान काढलं. हे काम करत असताना त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना चुकीच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलनाला एक वेगळं वळण दिलं गेलंय आणि त्यासाठी काम करू नका अशा सूचना दिल्या होत्या. आणि योग्य रीतीने जाणाऱ्या आंदोलनाच्या दिशेने संघाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय केले. 

पंजाब बद्दल त्यांचे विचार होते कि हिंदू आणि शिखांमध्ये काहीही अंतर नाही. प्रत्येक केशधारी हिंदू आहे आणि प्रत्येक हिंदू दहा गुरूंच्या आणि त्यांच्या आस्थेला मानतो या कारणाने तो शीख आहे. त्यांच्या या विचारांमुळे खलिस्तान आंदोलन ज्यावेळी टिपेला पोहचलं होतं ते अचानक शांत झालं आणि पंजाबमध्ये गृहयुद्ध झालं नाही कि अंतर्गत वाद उदभवले नाही.

हे आंदोलन भडकावणाऱ्या लोकांची मात्र साफ निराशा झाली. या आंदोलनामागे खूप मोठी हिंसा किंवा कट रचला गेला होता जो के एस सुदर्शन यांच्यामुळे उधळला गेला. के एस सुदर्शन चांगला वक्ता तर होतेच शिवाय ते उत्तम लेखकही होते. सतत प्रवासामुळे त्यांना लिहायला जास्त वेळ मिळायचा नाही तरीही ते त्यांचा महत्वाचा लेख आवर्जून वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापायचे.

दोहे, श्लोक आणि कवितांमधून उदाहरण देऊन ते सभा जिंकून घेत असत. के एस सुदर्शन यांना ज्या ज्या क्षेत्रात नेमण्यात आलं त्या त्या क्षेत्रात त्यांनी नवीन विचार आणि नवीन प्रयोग केले. १९६९ ते १९७१ च्या काळात ते अखिल भारतीय शारीरिक प्रमुख संघटनेचे प्रमुख होते. या काळात त्यांनी जुनी आणि प्राचीन शस्रांचे धडे अभ्यासक्रमात आणले. 

आणीबाणीच्या काळात त्यांनी बंदिवासात असताना बरच लेखन केलं आणि योगावर बरेच प्रयोग केले. पुढे त्यांनी प्रज्ञा प्रवाह नावाची एक वैचारिक संघटना तयार केली. तब्बल सहा दशक ते संघाचे प्रचारक होते. २००० मध्ये के एस सुदर्शन संघाचे सरसंघचालक झाले. २००९ मध्ये त्यांनी तब्येतीच्या कारणाने सरसंघचालक पदाचा राजीनामा दिला.

१५ सप्टेंबर २०१२ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कुशल संघटक आणि वैचारिक पातळीवर ग्रेट असे सरसंघचालक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.