खऱ्या सापाला एकवेळ लोक कमी भीतील पण पत्रिकेतला कालसर्प लय टेन्शन देतो

आत्ता पर्यंत मला बऱ्याच भिडूंनी प्रश्न विचारले कि बाबा रे तू साप कसे काय पकडायला लागलास ?

सुरुवातीला तर या प्रश्नाचं उत्तर मी खूप प्रामाणिकपणे द्यायचो आणि त्याबदल्यात मला काही वेळा खवट असे रिप्लाय मिळायचे. पण एका नात्यातल्या खव्वाट म्हाताऱ्याने असला काही प्रश्न विचारला म्हणून सांगता माझ्या फ्युजाच उडल्या. त्याच्या घरी गेल्यावर मला पत्रिका हातात दिली आणि म्हणाला,

माझ्या नातवाला कालसर्प योग आहे तुला यातलं काय कळत का ? तुझा सापांवरचा अभ्यास जास्त आहे म्हणून विचारलं ?

असलं डोकं फिरलं म्हणून सांगता ना राव… असो कसं सांगणार.

मग मी ज्योतिषी बनायचं ठरवलं. रोजच्या रोज दैनिकात येणार राशिभविष्य वाचणं सुरू केलं. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास सुरू केला. आता तुम्ही विचाराल मी ज्योतिष बनायचं का ठरवलं ?

कारण मला असं वाटलं जस त्या म्हताऱ्या आजोबांना कालसर्प योगाचा प्रश्न पडला असणार तसा बोल भिडूच्या वाचकांना पण पडला असणार. कारण कसाय ना खऱ्या सापाला एकवेळ लोक कमी भीतील पण पत्रिकेतला कालसर्प योग लोकांना लै म्हणजे लै घाबरवतो.

आणि बोल भिडू नेहमी खरखंर सांगत, म्हणून मी ज्योतिष बनलोय.

तर शनीची साडेसाडी, कालसर्प, मूळ नक्षत्र या गोष्टी हिंदू धर्मातील लोकांच्या पोटात खड्डा आणतात. काहीजण त्याला कडाडून विरोध करतात. केवळ हा पोटं भरण्याचा धंदा असल्याचीही टीकाही ज्योतिषांवर केली जाते. मात्र काही ज्योतिषांनीच या गोष्टी थोतांड असल्याचे कबुल केल होत.

एकदा शिर्डीत ज्योतिषांच संमेलन भरलं होत. त्यावेळी त्या संमेलनाचे अध्यक्ष होते बृहन्‌ महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार

ते म्हंटले होते की,

कालसर्पयोग हा शब्द कुठल्याही ग्रंथात नाही. लोकांना भीती दाखवून त्यांची लूट करण्यासाठीच या शब्दाचा वापर केला जातो. साडेसाती असल्याचे सांगून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे आकारले जातात. मात्र, साडेसाती हा प्रकारच अस्तित्वात नसून हे एक शनीचे भ्रमण आहे. कुणाच्याही पत्रिकेत मंगळ नसतो. नक्षत्र शांती करण्याचा सल्ला देऊनही पैसे उकळले जातात. मात्र, नक्षत्राला आपण देव मानतो, त्यामुळे या देवाची पूजा करायला हवी. शांती करणे ही संकल्पनाच चुकीची आहे. वास्तुदोष ही सुद्धा अशीच चुकीची संकल्पना आहे. ग्रहांचे सजीवांवर परिणाम होतात, निर्जीव वस्तूंवर नाही.

आता त्यांनी कालसर्प योग हा कुठल्याही ग्रंथात नाही असं सांगितलय. हे वाचल्यावर मी शोधमोहीम सुरू केली. त्यावर मला सापडलं की,

मानससागरी नावाच्या ग्रंथात मानससागर नावाच्या एका विद्वानाने आरिष्ट योगाची मीमांसा करताना सर्वात पहिल्यांदा राहू आणि अन्य पापग्रह आणि साप चावल्यान होणारी विषबाधा यासंदर्भात विश्लेषण केल्याच आढळतं. शतमंजरी राजयोग या ग्रंथात नाग योगाच फळ अत्यंत अशुभ मानण्यात आलं आहे. जातकपारिजात, उत्तरकालमित्र, बृहतजातक पराशरी तसेच सारावली या ग्रंथात सर्पयोगाचं वर्णन आढळते. मात्र तोपर्यंत कालसर्प योगाचा उल्लेख आणि अस्तित्व कुठेच दिसत नाही.

१९५४ -५५ साली सर्वप्रथम इंदुमती पंडित या विद्वान विदुषीने मानवी युग या मासिकात कालसर्पयोग असा पहिला उल्लेख केला होता. परंतु हा उल्लेख मेदिनीय ज्योतिष राष्ट्रीय फलादेश यासंदर्भात होता. त्यानंतर प्रसिद्ध ज्योतिर्विद अजंता जैन यांनी सर्वप्रथम कालसर्पयोगावर भाकीत आणि भाष्य करायला सुरुवात केली. त्यानंतर कालसर्पयोगावर विशेष अभ्यास संशोधन फलित भाकित वर्तवणं सुरू झालं. आणि या योगावर बरीच साधक-बाधक चर्चा सुरू झाली.

या कालसर्प योगाची गोष्ट पण आहे.

एकदा देव-दानवांनी समुद्रमंथन करायचं ठरवलं. मंदार पर्वताची रवी केली आणि वासुकी सर्पाचा दोरखंड केला. एका बाजूला देव तर दुसऱ्या बाजूला दानव अशी समुद्रमंथनाची तयारी सुरू झाली. देव आणि दानव दोन्ही बाजूने दोरखंड ओढत होते आणि समुद्राचे घुसळणे सुरू होते. समुद्रमंथनातून विविध वस्तू वर येत होत्या.

१४ रत्न, कामधेनू, कल्पवृक्ष, घोडा, हलाहल विष, अमृत, ऐरावत हत्ती, या साऱ्या गोष्टी समुद्रमंथनातून आल्या. या समुद्रातून अमृताचा कलश आला. अमृत सेवन करून अमर कोण होणार यासाठी देव आणि दानवांमध्ये भांडण सुरु झालं. विष्णूने मग कपटाने मोहिनी रूप घेऊन अमृताच वाटप फक्त देवांना करण्याचा घाट घातला. मोहिनी अत्यंत सुंदर स्त्री आणि आकर्षक आणि मोहक होती. तिच्या सुंदर रूपावर दानव ही हरकले.

मोहिनी देवांना अमृत वाटप करत असताना हे कपट राहू आणि केतू या दानवांच्या लक्षात आलं. देवाचं रूप घेऊन ते देवांच्या पंक्तीत जाऊन बसले. राहू-केतूच कपट चंद्र-सूर्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी मोहिनी रुपी विष्णूला खुणावलं. विष्णूने सुदर्शन चक्र सोडून राहू केतू ला ठार मारायचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत राहुच्या मुखात अमृत गेल्याने राहूच मुख अमर झालं. तर ते अमृत केतूच्या पोटात गेल्याने त्याच धड अमर झालं. त्यामुळे राहुला शीर पण धड शरीर नाही तर केतूला धड आहे पण शरीर नाही अशी अवस्था झाली. चंद्र सूर्य यांनी मोहिनी रुपी विष्णूला खुणावलं म्हणून राहू केतूला राग आला. त्यामुळे जिथं चंद्र सूर्य असतात तिथं हे पंक्तीला जाऊन बसतात आणि मग कालसर्प तयार होतो.

टीप – आता कालसर्प थोतांड आहे हे मी पुराव्यानिशी सिद्ध केलंय. माझ्या मनाचं काहीच नाही. आणि हो बोल भिडू अशा गोष्टींना खतपाणी घालत नाही.   

 

Leave A Reply

Your email address will not be published.