इसिस – के तालिबानची शत्रू आहेच पण त्यांनी काबुल मध्ये बॉम्ब टाकण्यामागे खरं कारण वेगळं आहे

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरु असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरलं. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले.

मृतांमध्ये १३ अमेरिकी सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान, सुरुवातीपासून या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना असल्याची अशी भीती होती आणि आता इस्लामिक स्टेट – के या दहशतवादी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली आहे.

इस्लामिक स्टेट – के काय विषय आहे ? 

तर के हा खोरासन डिनोट करतो. आयसिसचा खोरासन हा गट अफगाणिस्तानच्या नांगरहर या प्रदेशातील आहे. या प्रदेशाला खोरासन प्रदेश असंही ओळखलं जातं. या प्रदेशात २०१२ साली काही जिहादींनी एका गटाची निर्मिती केली होती. २०१४ साली पश्चिम आशियात आयसिस म्हणजे इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाची स्थापना झाली आणि खोरासनचा हा गट त्यामध्ये सामिल झाला. आयसिसचे एकूण २० मॉडेल आहेत. त्यामध्ये सर्वात घातक मॉडेल म्हणून ISIS-K म्हणजे खोरासन गट ओळखला जातो.

सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणामध्ये आयसिसचा हा गट तालिबान्यांचा कट्टर शत्रू म्हणून ओळखला जातोय. 

खोरासन गटामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील युवकांची भरती केली जाते. ज्या युवकांनी तालिबानचा गट सोडलाय त्यांना या भरतीमध्ये प्राधान्य दिलं जातं. सध्या या गटामध्ये ३००० कडव्या युककांचा समावेश असून तालिबानसोबत त्यांचा कायम हिंसाचार सुरु असतो.

पण या कडव्यांनी हा हल्ला का घडवून आणला ? 

तर २०१७ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात आयएसआयएस खोरासन या दहशतवादी संघटनेच्या गुफेवर ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब’ अर्थात ‘सगळ्या बॉम्बची आई’ टाकून भयंकर विध्वंस घडवला होता. अणुबॉम्बनंतर सर्वात धोकादायक समजला जाणारा GBU-43/B मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (MOAB) केल्यानंतर अमेरिकेने IS संपल्याचा दावा केला होता. तेव्हा राष्ट्राध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांनी हा हल्ला घडवून आणला होता.

पण आता अमेरिकेच्या या दाव्याच्या विरूद्ध, चार वर्षांनंतर इसिसने काबूल विमानतळावर १३  सैनिकांची निर्घृण हत्या करून बदला घेतला आहे.

इसिसचा आत्मघाती बॉम्बर अब्दुल रहमान अल-लोगारी, तालिबानच्या कथित सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत काबूल विमानतळाच्या गेटजवळ पोहोचला. अमेरिकन आणि ब्रिटीश सैन्यापासून १०० मीटर अंतर गाठल्यानंतर त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात आतापर्यंत ८५ जण ठार झाले आहेत आणि १५०  हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तालिबानचा दावा आहे की त्यांनी अमेरिकेचे २८  सैनिक मारले आहेत.

या हल्ल्याची तीव्रता बघितल्यावरच लक्षात येते की,

२०११ नंतरच्या या हल्ल्यात अफगाणिस्तानात एकाच दिवसात सर्वाधिक अमेरिकन सैनिक मरण पावले आहेत. यापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये चिनूक हेलिकॉप्टरवर झालेल्या हल्ल्यात ३० जवान शहीद झाले होते.

या हल्ल्याचे इसिसने निवेदन जारी केले, यात ते म्हणतात की,

त्यांच्या आत्मघाती बॉम्बरने अमेरिका आणि अमेरिकन लष्कराला मदत करणाऱ्या ट्रांसलेटर आणि मित्रांना लक्ष्य केले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे संतप्त राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी घोषणा केली की

आम्ही क्षमा करणार नाही. आम्ही विसरणार नाही. आम्ही तुम्हाला शोधू, तुम्हाला ठार मारू आणि तुमच्या कृत्यांबद्दल तुम्हाला शिक्षा करू.

अफगाणिस्तानात तालिबान कमी होत की, काय आता इसिसने पण हल्ले चालू केलेत. येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानातली परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचं, राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.