धोनीनं रांचीच्या बाजारात ‘कडकनाथ’ विकायला सुरुवात केलीय….

काळा रंग, काळी चोच, काळी जीभ, काळं मांस आणि काळं रक्त… ही ओळख आहे कडकनाथ कोंबडीची! 

पण हा शब्द ऐकला कि आपल्याकडची लोक रागानं लाल पण होतेत आणि एका बाजूला गालात खुद्कन हसतेत सुद्धा. हसतेत कारण आता हा शब्द आपल्याकडे आता एक राजकीय उपहास म्हणून पण वापरतेत. फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये तर अक्षरशः धुरळा होतो या शब्दाचा. थोडक्यात काय तर गंमतीच्या पलीकडे या शब्दाकडे बघितलं जात नाही.

पण आता याच कडकनाथ कोंबड्यांना महेंद्रसिंग धोनीनं सिरीयस घेतलयं. होय. धोनीनं आता आपल्याकडच्या कडकनाथ कोंबड्या रांचीच्या बाजारात विकायला सुरूवात केलीय.

त्याचं झालयं असं की, निवृत्तीनंतर लॉकडाऊन दरम्यान महेंद्रसिंग धोनीनं आपलं बस्तान रांचीला हलवलं. तिथं गेल्यावर त्यानं आपल्या ४३ एकर शेती आणि पशुपालनात लक्ष घातलं. शेतात त्यानं अगदी स्ट्रॉबेरी पासून पेरूपर्यंत जे शक्य असलं त्या सगळ्या फळांची शेती केली. त्याचं इन्स्टावर पोस्ट पण टाकल्या.

त्यासोबतच धोनीनं डॉक्टर विश्वरंजन यांच्या मार्गदर्शनात आधी गायीपालन सुरु केलं. सोबतच ससा आणि कबुतर पण पाळली. पुढे नोव्हेंबर आणि त्यानंतरच्या महिन्यात कडकनाथ कोंबड्या पालनाला सुरुवात केली. त्या अगदी मध्यप्रदेशच्या झाबुआमधून मागवल्या होत्या. याच सगळ्या  पशुपालनासाठी धोनीला उत्कृष्ट पशुपालनाचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

धोनीनं जवळपास ७०० कोंबड्या धोनीनं पाळल्या आहेत. आता आजपासून त्याचं बाजारात विकायला येत आहेत…

आता जी शाकाहारी आहेत, ज्यांना कडकनाथ हा काय प्रकार आहे हे माहित नाही त्यांच्यासाठी अशी आहेत या कोंबडीची वैशिष्ट्ये. 

या कोंबडीच चिकन हे काहीस वेगळं असतं. याच्यात प्रोटीन प्रमाण पण जास्त असतं. सामान्य कोंबडीच्या तुलनेत १७-१८ टक्के तर कडकनाथ मध्ये २५ टक्के प्रोटीन आढळत. त्यांच्या दर पण ९०० ते १००० रुपये किलोपर्यंत असतोय.

कडकनाथच्या साधारण तीन प्रजाती मिळतात. यात जेट ब्लॅक, गोल्डन ब्लॅक आणि पेसिल्ड ब्लॅक. त्यांचं वजन देखील १.८ किलोपासून ते २ किलोपर्यंत असतं. तर सामान्य कोंबडीच १.२ ते १.४ या दरम्यान. 

मध्यप्रदेशच्या बस्तरमधील आदिवासी लोक याला जास्त प्रमाणात पळतेत. तिथं त्यांना पवित्र पण मानलं जातं. दिवाळीनंतर याला देवीच्या समोर बळी देऊन त्याच गाव जेवण घालण्याची प्रथा आहे. सोबतच हे आदिवासी लोक कडकनाथचे रक्त मानवाच्या जुनाट आजारांच्या उपचाररांसाठी पण वापरतात.

मध्यप्रदेशकडे आहे याचा जीआय टॅग.  

मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांच्या दरम्यान कडकनाथ वरुन अधिकारासाठी कायदेशीर लढाई चालू होती. पण २०१८ मध्ये ही लढाई मध्यप्रदेश जिंकला आणि आता त्यांच्याकडे भौगोलिक दृष्ट्या ओळखला जाणारा जीआयचा टॅग आहे.

मध्यप्रदेशच्या पश्चिम क्षेत्रातील झाबुआ जिल्ह्यामध्ये कडकनाथ मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यासाठी १९७८ मध्येच तत्कालीन राज्य सरकारनं पहिलं कोंबडी पालन केंद्र सुरु केलं होतं. टॅग मिळाल्यानंतर सरकारनं घोषणा केली की, कडकनाथ कोंबड्या तुम्ही घरी बसून देखील ऑर्डर करू शकता. त्यासाठी त्यांनी एक ऍप पण तयार केलं होतं.

महाराष्ट्रात मात्र कडकनाथ वरून मोठा वाद पाहायला मिळतो… 

दोन वर्षांपूर्वी कडकनाथ कोंबडीचे महत्त्व आणि मागणी भरपूर होती. त्यामुळे अनेक शेतकरी कडकनाथ कोंबडी पालनाकडे आकर्षित झाले. शेतकऱ्यांच्या या प्रतिसादाचा फायदा सांगलीच्या इस्मालपूरमधल्या एका ऍग्रो कंपनीनं घेतला.

कोंबडी पालनाची योजना या कंपनीनं सामान्य शेतकरी, गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. डबल उत्पन्नाच्या फायद्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पैसे गुंतवले. पण पुढे जाऊन ती कंपनीचं बोगस निघाली. तर याला अनके शेतकरी बळी पडले.

सुरवातीला कंपनीने स्वतःच्या खिशातून परतवावा दिला. नंतर गुंतवणुकीतून ही हेराफेरी सुरू करण्यात आली. पण ज्यावेळी गुंतवणूकदारांना परतावा न देऊ शकल्यानं राज्यातील अनेक कार्यालयांना टाळे ठोकून कंपनीचे संचालक फरार झाले.

गेल्या पाच वर्षात सातारा, सांगली कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांसह छत्तीसगडपर्यंत या कंपनीने अनेकांना गंडा घातला असल्याचं सांगण्यात आलं. तब्बल ८ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला. यातूनच कोल्हापुरातील एका तरुणानं मागच्या वर्षी आत्महत्या पण केल्याचं समोर आलं होतं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.