कागलात धुण्याचा दगड सुद्धा कोणत्या गटाचा हे आधीच ठरलेलं असतं..

महाविकास आघाडीचे कर्दनकाळ आणि घोटाळे उघड करण्यास फेमस असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर एक नाव आलंय ते म्हणजे ग्राम विकास मंत्री हसन मियाँलाल मुश्रीफ.

मुश्रीफ कुटूंबीय हे शेल कंपन्या स्थापन करून घोटाळा करत आहे असं सोमय्या यांचं म्हणणं होत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्या काल महालक्ष्मी रेल्वेने कोल्हापूरला निघाले होते. इकडे कोल्हापूरकरांनी देखील त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. पायताण आंदोलनामार्फत,

“किरीट सोमय्या कोण रे ? पायताण हाणा दोन रे” अशा घोषणा देण्यात आल्या.

कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होणार अशी लक्षणे होती पण पोलिसांनी त्यांना कराडातच अडवलं.

तरीही सोमय्या यांनी तिथे पत्रकार परिषद घेऊन मुश्रिफांनी अण्णासाहेब नलावडे साखर कारखान्याच्या माध्यमातून १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचे आरोप केले. अजून मुश्रिफांचा पर्दाफाश करायचा बाकी आहे असंही त्यांनी सांगितलं.

सोमय्या यांनी यापूर्वी अनेक नेत्यांवर आरोप केला असला तरी यावेळचा राडा चांगलाच गाजतोय.  त्याला कारण ठरतंय सोमय्या यांनी केलेला कोल्हापूरच्या साखरेच्या राजकारणात शिरकाव. अंहं फक्त कोल्हापूर नाही कागलचं साखरेचं राजकारण.

अगदी सिनेमे बनावेत असं कागलच राजकारण अफाट आहे. इथे कित्येक गट आहेत, तट आहेत. रोज राजकीय गणिते बदलतात, आमदारकी खासदारकी असो कि ग्रामपंचायत जिल्हापरिषद प्रत्येक निवडणुका अगदी जीव तोडून लढवल्या जातात. नेत्यांची भांडणे अजूनही चालू असतात कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात.  

काय आहे हे कागलचे राजकारण.

तर दुधगंगेच्या खोऱ्याने सुपीक झालेलं उसपट्ट्यात मधोमध वसलेलं गाव म्हणजे कागल. इथली शेती सधन आहे त्याप्रमाणेच इथलं राजकारण देखील. सर्वाधिक साखर कारखाने असलेला हा कागल तालुका काही दशकापूर्वी पाण्याची कमतरता असलेला म्हणून ओळखला जात होता.

दूधगंगा -वेदगंगा या दोन नद्या असल्या तरी त्यामध्ये पावसाळा सोडला की पुरेसे पाणी नसायचे. खरिपावर अवलंबून असलेली शेती असे चित्र होते. मात्र काळम्मावाडी धरण झाल्यानंतर तालुक्याचा चेहरामोहरा बदलला. शेती बहरली. उसाची मोठय़ा प्रमाणात उपलब्धता झाल्याने नेत्यांनाही साखर कारखाने उभारण्याचे स्वप्न खुणावू लागले. त्यातून कागल तालुक्यात आताचे पाच साखर कारखाने सुरू झाले.

तालुक्यात राजकीय पायाभरणी भक्कम करायची असेल तर जिल्ह्य़ातील अन्य प्रमुख नेत्यांप्रमाणे साखर कारखानदारांना साखर कारखाना आपल्याकडे असला पाहिजे, हे सूत्र नेत्यांच्या मनात भरले.

त्यातून तालुक्यात सर्वप्रथम बिद्री साखर कारखाना सुरू झाला असला तरी त्यावर कागल पेक्षा राधानगरी भुदरगड तालुक्यातील नेतृत्व अधिक प्रभावी ठरले. त्यानंतर कागलचे संस्थानिक विक्रमसिंह घाटगे यांनी कागलच्या माळावर राजर्षी छत्रपती शाहू साखर कारखाना उभारला. या कारखान्यांने साखर कारखानदारीतील आदर्श मापदंड या कारखान्याने निर्माण केले. पुढे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी तालुक्यात हमीदवाडा येथे साखर कारखाना सुरु केला. कोल्हापुरात त्याकाळात सदाशिवराव मंडलिक यांचा मोठा दबदबा होता.

पण सदाशिवराव मंडलिक विरुध्द विक्रमसिंह घाटगे यांचा ही राजकीय संघर्ष दोन दशके चालू होता.

म्हणजे १९७२ मध्ये सदाशिवराव मंडलिक आमदार होते त्यांना पराभूत करून १९७८ आणि १९८० मध्ये राजघराण्यातील विक्रमसिंह घाटगे पहिलेच आमदार म्हणून निवडून आले. पुढे १९८५ ला राजे विक्रमसिंह पराभूत झाल्यानंतर त्यांनी संजय घाटगेंना बळ दिल पण सदाशिवराव मंडलिकांपुढं तेही पराभूत झाले. १९८५ पासून ते १९९९ पर्यंत मंडलिकांकडे विधानपरिषदेची कागलची एकहाती सत्ता होती.

तेव्हाच्या राजकारणात मंडलिक घाटगे रायव्हलरी प्रचंड फेमस झाली होती. 

त्याकाळात कागल गावच्या नदीपात्रातील धुणी धुण्याचे दगडही गटानुसार ठरले होते. मंडलिक गटाला मानणाऱ्या घरातील महिला नदीवरील घाटगे गटाच्या दगडावर धुणी धुवायच्या नाहीत. एवढेच नव्हे तर विद्यालयातील आठवी-नववीची मुलेही मंडलिक-घाटगे गटानुसारच वर्गात बसायची. इतका हा टोकाचा संघर्ष होता. 

यावेळी मंडलिकांनी विक्रमसिंह घाटगेंना शह देण्यासाठी कागल तालुक्यात कार्यकर्त्यांना बळ दयायला सुरुवात केली. यातलेच एक हसन मुश्रीफ होते. हसन मुश्रीफ यांचे ते गुरु म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ही ते परिचित आहेत. कुठं गेलं तरी राम लक्ष्मणाचा जोडा म्हणून सदशिवराव मंडलिक आणि मुश्रीफांना ओळखलं जायचं. तर दुसरीकडे विक्रमसिंह घाटगे गटाकडून संजय घाटगेंना बळ देण्यात येत होत.

पण नंतर हसन मुश्रीफ यांनी वेगळ होऊन मंडलिकांपुढे आव्हान उभे केले आणि कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला.

कागल तालुक्याच्या वर्चस्ववादाच्या राजकारणातून दिवंगत मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात ९ डिसेंबर २००६ रोजी संघर्षाची ठिणगी पडली. त्यातून तालुक्यासह जिल्ह्याचे राजकारणच पूर्णपणे बदलले. हमिदवाडा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून या दोन नेत्यांमधील संघर्ष वाढतच गेला. आणि त्यातूनच मुश्रीफांनी बेलेवाडी काळम्मा येथे सरसेनापती संताजी घोरपडे हा खासगी कारखाना सुरू केला.

त्यानंतर या गुरू शिष्यात जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरून २००७ साली तीव्र मतभेद झाले. त्यानंतर झालेल्या २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या पराभवासाठी मंडलिक गटाने मोठी ताकद लावली. २००९ च्या विधानसभेला तर सदाशिवराव मंडलिकांचे चिरंजीव संजय मंडलिक उभे राहिले. पण मंडलिकांबरोबर आधीच हाडवैर असलेल्या राजे विक्रमसिंह घाटगे यांनी तटस्थ भूमिका घेतल्यानं मुश्रिफांचा विजय सुकर झाला.

२०१४ च्या निवडणुकीत अगदी काठावर मुश्रीफ पास झाले. या दोन्ही निवडणुकीत मंडलिक व संजयबाबा गट विरोधात होते. पण राजे गट सोबत असल्याने मुश्रीफ यांच्यासमोर फारशी अडचण राहिली नाही.

पुढं २०१९ च्या निवडणुकीत मात्र मुश्रीफांना संजयबाबा यांच्यासह गेल्या दोन निवडणुकीत बरोबर असलेल्या राजे गटाशी सामना करावा लागला. अशा परिस्थितीत तालुक्‍यातील एक गट आपल्यासोबत असावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मंडलिक कारखान्याच्या निवडणुकीत ही संधी मुश्रीफ यांना मिळाली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत दुधगंगेच्या पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. 

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे पक्षापासून दुरावलेले आहेत. त्यांच्या विजयासाठी हाडाची काडे करूनही ते आपल्याला दाद देत नाहीत, हा राग मुश्रीफ यांना होताच. म्हणून त्यांच्याविरोधात पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार हे संजय मंडलिक असावेत, अशीही खेळी त्यांच्याकडून खेळली गेली.

पुढे मुश्रीफ यांनी कारखाना निवडणुकीत सर्वांत अगोदर त्यांना पाठिंबा दिला. यामागे संजय घाटगे यांना शह देऊन लोकसभेत मंडलिक यांना उभे करून विधानसभेत त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळवण्याची खेळी होती. पुढे निवडणूक झाली या सामन्यात मुश्रीफांनी संजय मंडलिकांना मदत केली. आणि मंडलिक निवडून आले.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मुश्रीफ ही विजयी झाले. आत्ताच झालेल्या गोकुळच्या निम्मिताने विरोधात असणारे संजय बाबा घाटगे जे मागच्या पाच विधानसभा मुश्रीफांच्या विरोधात होते ते ही जवळ आले. अशाप्रकारे इतक्या किचकट असणाऱ्या कागलच्या राजकारणात सोमय्या किस खेत की मुली असंच म्हणावं लागेल.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.