आजही नवरात्र उत्सवामध्ये उगवत्या सूर्याची किरणे थेट या देवीच्या चरणावर पडतात

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा |

प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा ||

राकट, रांगडा आणि कणखर असलेल्या या महाराष्ट्र देशाची खरी ओळख लपली आहे ती इथल्या स्थापत्य कलेत. इथ असणारे विविध मंदिर,लेणी,शिल्प हे महाराष्ट्राच्या स्थापत्य कलेचे साक्ष पटवून देणारे आहेत. महाराष्ट्र आणि इथे बहरलेली स्थापत्य कला आणि त्यांच्या विविध नमुन्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात आपल्याला या स्थापत्य कलेचे विविध टप्पे बघायला मिळतात.

अश्याच एका स्थापत्य कलेचा अद्भूत कलाविष्कार असलेल्या कागदंबा देवीच्या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत.

उस्मानाबाद व बीड जिल्ह्याच्या सीमेवर मांजरा नदीच्या काठावर वसलेले, वाशी शहरापासून १२ किमी अंतरावर असलेले पारा गाव. या गावाच्या पूर्वेला ३ किमी अंतरावर साधारणतः ४०० वर्षापूर्वीचे स्थापत्य कलेचा अदभूत नमुना असलेले हेमांडपंथी दगडाचे कागदंबा देवीचे मंदिर आहे. या मंदिराला पाऱ्याच्या आईचे मंदीर म्हणून ओळखले जाते.

हे मंदीर ४०० वर्षे जुने असुन हे मंदिर फक्त ६ दगडी खांबावर उभारलेले आहे.

ह्या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड एकाच आकाराचे आहेत. परंतु ह्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजुला एक छोटासा दगड लावण्यात आलेला आहे. तो दगड सहजासहजी डोळ्यास दिसुन येत नाही.

या दगडा बद्दल अशी अख्यायिका आहे की, मांजरा नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बीड जिल्ह्यातील नांदूर घाट येथून उस्मानाबाद जिल्हयातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बार्शी या ठिकाणी व्यापारी, शेतकरी आपला शेतीमाल याच मार्गाने घेऊन जात जायचे. पण हा भाग नदीकाठचा घनदाट जंगलाचा असल्याने या ठिकाणी लुटमरीच्या घटना मोठया प्रमाणावर घडायच्या. या घटना रोखण्यासाठी व वाटसरूंची ओळख पटविण्यासाठी या मंदिराला वापरण्यात आलेल्या या लहान दगडाची खूण विचारली जाऊ लागली. या दगडावरूनच रहिवासी असल्याबद्दलची ओळख पटविण्यात येत होती.

या मंदिरात अष्टभुजा स्वरूपाची देवीची मुर्ती आहे. 

असे म्हणतात की, हा संपूर्ण भाग नदीकाठचा व दंडकारण्याचा होता. या ठिकाणी कागासुर नावाच्या एका दैत्याचा वावर होता. तो दैत्य लोकांना खूप त्रास देत. या त्रासामुळे येथील लोकांनी देवीची उपासना केली. देवीकडे यातून मुक्ती मागितली.

देवीने भक्तांच्या या हाकेला धावत अष्टभुजा रूप धारण केले व या ठिकाणी असलेल्या कागासुराचा वध केला. त्यावरून या देवीला कागदंबा हे नाव पडले गेले. मंदिरात असलेल्या अष्टभुजा देवीच्या पायाखाली कागासुराचे मुडंके आपल्याल पाहायला मिळते.

या मंदिराचे अजुन एक वैशिष्टय म्हणजे नवरात्र उत्सवामध्ये विशिष्ट तीन दिवस उगवत्या सूर्याची किरणे थेट या देवीच्या चरणावर पडतात. तसेच मंदिर निर्मितीपासून प्रवेशद्वाराच्या समोर एक जिवंत पाण्याचा साठा आहे. जो दुष्काळातही आटत नाही. याच साठ्यातून आसपासच्या गावातील लोकांची पाण्याची सोय होत आहे.

नवरात्र पौर्णिमा तसेच वैशाखी पौर्णिमेला या देवीची जत्रा भरते. या देवीला मुस्लिम भाविक सुद्धा मोठया प्रमाणात मानतात. इतिहास आणि स्थापत्य कलेचा अनोखा संगम आपल्याला या कागदंबा देवीच्या मंदिरात पाहायला मिळतो.

  • कपिल जाधव

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.