सचिन आउट झाला म्हणून कैफच्या घरच्यांनी टीव्ही बंद केली पण पुढे इतिहास घडला.

गोष्ट आहे २००२ ची.

भारतीय टीम इंग्लंड दौऱ्यावर आली होती. अझरूद्दीन, जडेजा, मोंगिया यांनी दिलेल्या मॅच फिक्सिंगच्या धक्यातून अजून आपण सावरत होतो. नव्या खेळाडुंच आगमन होत होतं. सौरव गांगुलीच्या कप्तानीबद्दल अजून काही जणांना शंका होती. क्रिकेटसाठी हा स्थित्यंतराचा काळ.

वनडेची नेटवेस्ट सिरीज भारत श्रीलंका इंग्लंड अशी तिघांच्यात झाली. 

भारताच्या नव्या टीमने चांगलीच लढत दिली. सचिन आणि द्रविडने धावांचा पाऊस पाडला होताच पण त्यांच्या सोबत युवराज, कैफ, झहीर अशा तरुण प्लेअर्सनी सुद्धा आपली चमक दाखवली होती. आपण इंग्लंडसोबतच्या फायनल मध्ये पोहचलो. फायनल लॉर्डस वर होणार होती.

नासीर हुसेनने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. आपल्याविरुद्ध कायम चांगल खेळणाऱ्या ट्रेसकॉथिक आणि खुद्द स्वतः नासीर हुसेन या दोघांनीही ठोकलेल्या शतकामुळे त्यांनी ३२५ धावांचा डोंगर उभा केला होता. सगळ्या बॉलर्सची पिटाई झाली होती. नेहमी प्रमाणे फायनलला येऊन आपली हाराकिरी होणार अशीच स्थिती दिसत होती.

त्याकाळात ३२६ धावांचं टार्गेट चेस होणं अगदी अशक्य होतं. एरवी आपण मॅच तेव्हाच सोडली असती पण हि दादाची टीम होती.

सेहवाग आणि गांगुलीने जिद्दीने सुरवात केली. कधी नव्हे ते सेहवाग सावरून सावरून खेळत होता पण गांगुलीची बॅट धुवादार बरसत होती. विशेषतः फ्लिन्टॉफवर त्याचा डोळा होता.

कसला तरी हिशोब पूर्ण करायचा होता.

सेहवाग आणि गांगुली दोघांची १०० धावांची पार्टनरशिप झाली. गांगुलीने तो पर्यंत दहा फोर आणि एक सिक्स मारून साठ रन्स बनवल्या होत्या. या मारामारीमध्येच त्याची विकेट पडली. त्याच्या पाठोपाठ सेहवाग आणि मग दिनेश मोंगिया पण आउट झाले.

सचिन आणि द्रविड क्रीजवर होते. सचिनने या सिरीजमध्ये दोन शतक मारले होते. दोघेही फॉर्ममध्ये होते.

पण दुर्दैवाने द्रविडची भिंत फक्त पाच रनवरच कोसळली. आता शेवटची आशा तेंडूलकरवर होती. त्याने एक फोर मारून मॅच आपण कुठल्या दिशेला नेऊ शकतो हे दाखवलं. पण तेवढ्यात एश्ले जाईल्सला बाहेर जाऊन कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या नादात सचिनचा फटका हुकला आणि तो बोल्ड झाला.

अख्ख्या भारतातले टीव्ही फटाफट बंद झाले. सवयच होती त्याकाळात. सचिन आउट झाला की मॅच संपली. आता काय आपण जिंकत नाही म्हणत पब्लिक आपापल्या कामाला लागायचे,

आणि ते काही प्रमाणात खर देखील होतं. नव्वदच्या दशकात सचिनने एक हाती टीमला सावरून धरले होते. नंतर गांगुली द्रविड आल्यावर ही परिस्थिती बदलली पण त्या दिवशी ते दोघेही आउट झाले होते. समोर ३२६ धावांचा डोंगर उभा होता. त्यातल्या निम्म्यासुद्धा धावा झाल्या नव्हत्या आणि सगळे अनुभवी फलंदाज विकेट टाकून पव्हेलीयन मध्ये आले होते.

सगळ्याच वैतागलेल्या भारतीयांप्रमाणे आणखी एक कुटुंब देखील होतं ज्यांनी सचिन आउट झाल्यावर शिव्या घालत टीव्ही बंद केली होती. ते होते मोहम्मद कैफचे घरवाले.

कैफचे वडील देखील एकेकाळी क्रिकेट खेळले होते. त्यांना लक्षात आल इथून पुढे आपण काही मॅच जिंकत नाही. त्यांचा मुलगा अजून खेळणार होता तरी त्यांनी मॅच बघायचं सोडून सरळ पिक्चर बघायला जायचं ठरवलं.

पिक्चर निवडला तो ही शाहरुखचा देवदास.

भारताच्या हरण्याचा गम विसरायचं म्हणून अख्खी कैफ फॅमिली घराला कुलूप लावून थियेटर मध्ये देवदास बघायला गेली. इकडे मॅचमध्ये मात्र भलताच ट्विस्ट आला. युवराज आणि कैफ या तरुण फुर्तिल्या जोडीने पीचवर नांगर टाकला. सुरवातीला सावध खेळल्यावर दोघांनीही हळूहळू मोठे शॉट मारायला सुरवात केली. अजून मॅच संपली नाही म्हणत लोकांनी परत मॅचच चनल लावल.

युवी आणि कैफने मॅच ओढून आणली होती. दुर्दैवाने युवी ६९ धावावर आउट झाला. आपल्याला वाटल आता तर संपली मॅच. त्याच्यापुढे सगळे बॉलर्सच होते. अजून पन्नास साठ धावा काढायच्या होत्या.

पण कैफने जिद्द सोडली नाही. हरभजनला घेऊन लढत राहिला. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटची विकेट हातात असताना झहीरने धडपडत दोन धावा काढल्या आणि आपलं अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं.

भारताने इंग्लंडमध्ये वनडे सिरीज जिंकली होती. भारताचा कप्तान गांगुली लॉर्डसच्या पांढरपेशा बाल्कनीमध्ये शर्ट काढून हवेत हलवत होता. मागच्याच वर्षी फ्लिन्टॉफने वानखेडेमध्ये सिरीज जिंकल्यावर शर्ट काढून केलेल्या बिभित्स प्रकाराला त्याच्याच भाषेत दिलेलं उत्तर होतं ते.

गांगुलीचा बदला कैफने पूर्ण केला होता. सगळा देश नाचत होता. कैफला मॅन ऑफ द मॅच ही देण्यात आलं.

मोहम्मद कैफच्या आयुष्यातला सोन्याचा क्षण. त्याच्या अलाहबादमधल्या घराबाहेर गर्दी झाली. फोनची घंटी वाजत होती. लोक त्याच्या घरच्यांचं अभिनंदन करायसाठी गोळा झाले होते. पण त्यांच्या दाराला मोठ्ठ कुलूप होतं. पब्लिकला वाटलं की गर्दीला टाळण्यासाठी मुद्दाम बाहेर कुलूप लावून आत बसले असतील काही जण दर तोडून आत जायचं म्हणत होते. तेव्हड्यात शेजाऱ्यांनी सांगितलं ते पिक्चर बघायला गेले आहेत.

सगळी वरात थियेटरला आली. देवदास थांबवण्यात आला. तेव्हा त्याच्या घरच्यांना कळाल आपला पोरगा स्टार झाला आहे. त्यांना अगदी डोक्यावर उचलून पब्लिकने घरी आणलं. त्या दिवशी अलाहबाद मध्ये दुसरी दिवाळी साजरी झाली होती. काही दिवसांनी कैफ आला तेव्हा त्याची अख्ख्या अलाहबादमधून जंगी मिरवणूक काढण्यात आली.

हीच ती नॅटवेस्ट सिरीज जिच्या विजयामुळे भारतीय क्रिकेटच भाग्य बदललं. आपणसुद्धा आक्रमक आहोत हे गांगुलीच्या पठ्ठ्यानी दाखवून दिल होतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.