कैफ युवीला म्हणाला, “भाई हम भी यहां खेलने आये है !”

२००२ साली भारतीय क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्याला आली होती. भारत-श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात नॅटवेस्ट सिरीज खेळवली जात होती. मॅच फिक्सिंगमुळे मोडून पडलेल्या भारतीय क्रिकेटची कमान दादा गांगुलीकडे सोपवण्यात आली होती.

त्याने बड्या धेन्ड्यांची मक्तेदारी मोडून स्वतःची नवीन टीम उभी केली होती.

यात होते वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, कैफ, झहीर खान, आशिष नेहरा, अजित आगरकर यासारखे ताज्या दमाचे खेळाडू. पण सचिन,कुंबळे, द्रविड,लक्ष्मण अशा दिग्गज खेळाडूंचा देखील बलन्स होताच.

युवराज आणि कैफ या टीमचा चेहरा होते. त्यांचा मैदानातील वावर एनर्जीने भरलेला असायचा. या दोघांनी भारतीय फिल्डिंगचा स्तर एकदम वरच्या लेव्हलला नेऊन पोहचवला होता. या टीमच्या जोरावरच टीम गांगुलीने नटवेस्टची फायनल गाठली होती.

लॉर्डसवर होणाऱ्या फायनलमध्ये आपल्या समोर होता यजमान देश इंग्लंड.

इंग्लंडची टीम तेव्हा फोर्मात होती. भारतीय वंशाचा नासीर हुसेन त्यांचा कप्तान होता. फ्लिन्टॉफ, कॉलिंगवूड, ट्रेस्कॉथिक, मायकल वॉन असे बरेच दिग्गज खेळाडू संघात होते.

आजवरचा भारताचा रेकॉर्ड म्हणजे फायनलला जाऊन माती खाण्याचा होता. प्रेशर गेममध्ये नेमक आपण गंडायचो आणि त्यात सचिन आउट झाला तर मागून पत्त्याप्रमाणे अख्खी टीम कोसळायची.

इंग्लंडने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. ट्रेस्कॉथिक आणि हुसेन यांनी झळकवलेल्या शतकामुळे त्याचा ३२५ धावांचा डोंगर उभा राहिला. एवढा मोठा स्कोर आपण कधीच चेस केला नव्हता. भारतीय ड्रेसिंग रूममध्ये निराशेचं वातावरण पसरलं. पण गांगुली म्हणाला,

“Don’t panic. We will just start well, try not to lose any wicket and take it on later.”

आणि खरोखर दादा व विरूने चांगली सुरवात केली. गांगुली आउट झाला तोवर पहिल्या पंधरा ओव्हर मध्ये १०७ धावा स्कोरबोर्डवर लागल्या होत्या. पण तिथून टीमला गळती लागली. सेहवाग मग दिनेश मोंगिया मग द्रविड स्वस्तात आउट होत गेले.

भारताच्या १४६ धावा बोर्डवर होत्या आणि सचिन सुद्धा १४ धावा काढून आउट झाला.

संपूर्ण लॉर्डसवर एक भयाण शांतता पसरली. इंग्लंडचे समर्थक सुद्धा धक्यात होते. ही मॅच आता त्यांच्या खिशात होती.

टीम इंडिया तर्फे आता उरले होते युवी आणि कैफ हे दोघेही नवखे बॅट्समन. इतिहास रिपीट होत होता. कैफ मैदानात आला तेव्हा नासीर हुसेनने त्याला तेंडूलकरचा बस ड्रायव्हर आला म्हणून स्लेजिंग करायला सुरवात केली.कैफ वर प्रचंड मोठा ताण आला होता.

ओव्हरला ७ ते ८ धावांचा रनरेटची गरज होती.

पण युवीने आणि त्याने ठरवलं की शांतपणे खेळायचं. सुरवातीला सिंगल डबल करत स्कोरबोर्ड हलता ठेवू लागले. युवराज थोडासा आधी आला असल्यामुळे तो सेट झाला होता. तो अधून मधून एखाददुसरा शॉट मारत होता.

हळूहळू दोघांची पार्टनरशिप बिल्ड झाली. युवराजने तर एकदा फ्लिन्टॉफ सलग तीन चौकार ठोकले. मॅच भारताच्या दिशेने झुकू लागली होती. युवी चांगलाच बहरात आला होता. फ्लिन्टॉफच्या शेवटच्या बॉलवर त्याने २ धावा काढल्या.

आता भारताला ७२ बॉलमध्ये ९१ रन्स लागणार होते. 

अलेक्स ट्युडर बॉलिंगला आला. कैफ स्ट्राईकवर होता. इकडे ड्रेसिंग रूमच्या गॅलरीत बसलेला कप्तान गांगुलीला त्याच्याकडे बघून इशारे करत होता. कैफने त्याच्याकडे पाहिलं. गांगुली त्याला म्हणत होता की,

“एक रन काढून युवीला स्ट्राईक दे.”

युवी फॉर्ममध्ये आला होता.

आता मॅच जिंकण्यासाठी एक एक बॉल महत्वाचा होता. जेवढ्या फास्ट रनरेट वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करने आवश्यक होतं. कैफने पहिला बॉल डॉट घालवला.दादाचा पारा चढला. त्याने परत कैफ कडे बघून १ बोट दाखवत जोरात इशारा केला.

कैफने यावेळी चक्क त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पुढचा बॉल टाकण्यासाठी आग ओकणाऱ्या वेगाने टयूडर धावत आला. कैफने बॅट फिरवली. चक्क सिक्स गेला. अख्खं स्टेडियम उठून नाचत होतं. कैफ युवी जवळ गेला आणि आपल्या खास युपी टोनमध्ये म्हणाला,

“भाई हम भी खेलने आये है. “

युवी हसला. तिकडे गांगुली पण शांत झाला. या दोन्ही खेळाडूंना आता काहीही सांगण्याची आवश्यकता नाही हे त्याला कळाल. दोघांनीही आता इंग्लंडच्या बॉलर्सना नाचवायला सुरवात केली होती.

प्रत्येक ओव्हरला एखाददुसरी बाउन्ड्री मारत आठच्या रनरेटने स्कोर चेस सुरु केला. पुढे तर युवराज आउट झाला तरी कैफने जिद्द हरली नाही. सुरवातीला हरभजन मग झहीर खानला घेऊन शेवटपर्यंत लढा दिला.

पन्नासाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला झहीर खानने जोराचा फटका दिला आणि चीत्त्यासारखा पळत कैफने दोन धावा काढल्या.

भारताने मॅच जिंकली होती. समोर फ्लिन्टॉफच होता. यानेच एकेकाळी वानखेडेवर शर्ट काढून विजयोत्सव साजरा केला होता.

त्याला उत्तर देण्यासाठी दादाने लॉर्डसवर शर्ट घुमवला.

चिकाटीमुळे भारताने हा अविश्वसनीय विजय मिळवला होता. एकमेकाच्या अंगावर पडून खेळाडूंनी आजवरच सर्वात मोठ सेलिब्रेशन केलं.

कैफला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार मिळाला.

त्याच मुळगाव आलाहबादला जेव्हा तो परत आला तेव्हा उघड्या जीपवर त्याची मिरवणूक काढली गेली. कैफ म्हणतो त्यावेळी मला खरोखर बच्चन झाल्या सारख वाटलं. या पूर्वी त्यागावात एवढी मोठी क्रेझ फक्त सुपरस्टार अमिताभ बच्चनचीच होती.

या मॅचचे असंख्य किस्से आहेत, अनेक कथा दंतकथा आहेत. हा  भारतीय क्रिकेटमधला मैलाचा दगड. या इंग्लंड सिरीजनंतर क्रिकेटमध्ये भारताची खऱ्या अर्थाने दादागिरी सुरु झाली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.