मुख्यमंत्री एवढे विसरभोळे होते की मंत्रिमंडळातील मंत्र्याचे नाव देखील विसरले.

जर तुम्ही राजकारणात असाल तर गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळ्या घडामोडी डोक्यात फिट ठेवायला लागतेत. याच प्रकरण, त्याच बोलणं हे सगळं लक्षात ठेवण्याएवढी तरी शार्प मेमरी त्या नेत्याची असावी. या गोष्टीचा फायदा होतो तो दिर्घ कालीन राजकारणाला.

पण आज आम्ही तुम्हाला अशा एका नेत्याविषयी सांगणार आहे, ज्याला गल्ली टू दिल्ली सोडा पण मुख्यमंत्री असताना त्यांना स्वतःच्या मंत्रीमंडळातील मंत्री देखील लक्षात राहत नव्हते. आणि ते फक्त मुख्यमंत्री नव्हते, तर स्वातंत्र्यापुर्वी संविधान सभेचे सदस्य होते, आणि त्यानंतर नेहरुंच्या मंत्रीमंडळात देशाचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री देखील राहिले होते.

असे मध्यप्रदेशचे तिसरे मुख्यमंत्री, कैलाशनाथ काटजू.

गोष्ट सुरु होते १९३७ मध्ये. ब्रिटीश कालीन कायदेमंडळासाठी निवडणूका पार पडल्या. संपुर्ण देशात काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. सगळ्यात मोठे राज्य असलेल्या यूनाइटेड प्रोविंस (आजचे उत्तर प्रदेश) मध्ये गोविंद वल्लभ पंत यांचे सरकार बनणार हे फिक्स झाले. मंत्रिमंडळातील नाव अंतिम झाली.

पण कायदा मंत्री कोण होणार हे ठरत नव्हते. कारण होतं, ज्या व्यक्तीच्या नावावर विचार चालला होता तिच व्यक्ती मंत्रीपद स्विकारण्यासाठी तयार नव्हती. हे तेच कैलाशनाथ काटजू.

त्यांना कायदा मंत्री का करायचे होते तर देशातले नामी वकिल होते.

किती नामी होते ? असं समजा की तेव्हा एका कारची किंमत दोन ते तीन हजार रुपये होती. पण या वकील साहेबांची महिन्याची कमाई २५-३० हजार होती. त्यामुळे ते प्रॅक्टिस सोडण्यासाठी तयार नव्हते. पण त्यांना तयार करण्याची जबाबदारी दिली गेली डॉ. राजेंद्र प्रसाद यांना.

राजेंद्र बाबुंनी खूप जोर लावला. तास-तास चर्चा झाल्या. आणि अखेरीस वकील साहेब तयार झाले. पण जाताना राजेंद्र बाबुंना त्यांनी पुन्हा माघारी बोलावलं, आणि आपल्या बँकेच पासबुक त्यांच्या समोर ठेवले. त्यावेळी त्यांच्या खात्यात १३ लाख रुपये होते. डॉ. प्रसाद दंग झाले.

पण काटजू जेवढे श्रीमंत होते, त्याहून जास्त प्रामाणिक.

ते राजेंद्र प्रसादांना म्हणाले, हे मी यासाठी दाखवतोय, कारण उद्या मी मंत्रीपदावरुन बाजूला झाल्यानंतर लोकांनी म्हणायला नको, बघा मंत्री होते तेव्हा किती संपत्ती गोळा केली.

काटजूंची आणखी एक ओळख म्हणजे ते नेहरु परिवाराचे खूप जुने मित्र. मोतीलाल नेहरुंसोबत वकिली केली. त्यातुनच त्यांची आणि पंडित नेहरुंची ओळख झाली. नेहरुंपेक्षा ते दोन वर्ष मोठे असले तरी काहिसे समवयस्कच. त्यामुळे दोघांचे तसे चांगले जमले.

पुढे जावून वकील म्हणून त्यांनी आझाद हिंद सेनेचा खटला लाल किल्ल्यात जाऊन लढवला. उत्तरप्रदेशचे कायदामंत्री म्हणून काम पाहिले. तरी देखील जेव्हा संविधान सभेच्या निवडणूका झाल्या तेव्हा ते यूनाइटेड प्रोविंस मधून पराभूत झाले.

त्यावेळी नेहरुंनी मध्य प्रांतातुन निवडून आलेले सीताराम जाजू यांना राजीनामा द्यायला लावला आणि तिथून काटजूंना निवडून आणले.

त्यापुर्वी काटजू जरी मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये जन्मले असले तरी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य उत्तरप्रदेश आणि दिल्लीमध्ये घालवले होते. त्यामुळे इथल्या राजकाणापासून ते काहीसे लांबच होते.

पुढे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्या लोकसभेच्या निवडणूका होईपर्यंत ते पश्चिम बंगाल आणि ओडिसाचे गव्हर्नर होते.

१९५१-५२ मध्ये लोकसभेच्या निवडणूका लागल्यानंतर राजीनामा देवून मंदासौर मधून खासदार म्हणून निवडून गेले. आणि स्वतंत्र भारतात नेहरुंच्या मंत्रीमंडळात गृह, रक्षा आणि कायदे मंत्री देखील झाले.

१९५७ साली मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री रविशंकर शुक्ल यांना शपथ घेवून दोनच महिने झाले होते. आणि अशातच अचानक त्यांचे निधन झाले. यानंतर मध्यप्रदेश कॉंग्रेसच्या गटबाजीने डोके वर काढले, त्यामुळे नेहरुंना आपल्या विश्वासातील माणूस तिथे हवा होता. त्यावेळी काटजू केंद्रीय मंत्रीमंडळात संरक्षण मंत्री होते.

अशावेळी नेहरुंनी तखतमल जैन, सेठ गोविंद दास आणि भगवंत राव मंडलोई यांच्या नाव आघाडीवर असताना फुली मारुन त्यांची मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी १९५७ साली निवड केली.

काटजू आपल्या विसरभोळेपणासाठी विशेष प्रसिद्ध होते.

मुख्यमंत्री असताना एकदा ते एका सभेसाठी म्हणून छत्तरपूरला गेले होते. तिथे सरकारमधील एक मंत्री दशरथ जैन एका प्रतिनिधी मंडळाला घेवून सर्किट हाऊसमध्ये भेटण्यासाठी गेले. दशरथ यांनी मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींची ओळख करुन दिली. आणि त्यानंतर शेवटला मुख्यमंत्र्यांनी ओळख करुन देणाऱ्या आपल्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याला विचारले.

आप कौन है ?

जैन यांना आधी दोन मिनीट वाटले मुख्यमंत्री मस्करी करत असतील पण नंतर पुन्हा प्रश्न आला. दशरथ यांनी उत्तर दिले.

अरे साहब मै तो दशरथ जैन ।

यावर काटजू म्हणाले, अरे एक दशरथ जैन तो हमारे मंत्रिमंडलमे भी है।

जी, मै वही हूँ ।

म्हणजे एका विद्यमान मुख्यमंत्र्याला स्वतः निवडलेल्या स्वतःच्या मंत्र्याचा नावावरून चेहरा आठवू नये अशी परिस्थीती होती ! त्यांचा हा विसरभोळेपणा नेमका कधी सुरु झाला हे जरी सांगता येत नसले तरी त्यांच्या या किस्स्याने मात्र राजकारणात त्यांना विसरभोळे मुख्यमंत्री म्हणून कायमची ओळख मिळाली.

पुढे याच कैलाशनाथ काटजूंची मुले शिवनाथ, ब्रह्मनाथ अलाहाबाद न्यायालयात तर नातू मार्कंडेय काटजू सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते तसेच त्यांची नात आणि न्यू यॉर्क विद्यापीठाच्या प्राध्यापिका तिलोत्तमा मुखर्जी ह्या शशी थरूर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.