करण जोहरच्या मैत्रीसाठी काजोलनं मणीरत्नमचा ‘दिल से’ नाकारला होता…

आयुष्यामध्ये प्रत्येकाने काही ना काही स्वप्न पाहिलेले असतात. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याचे प्रयत्न देखील चालू असतात आणि ज्यावेळी खरोखरच ते स्वप्न आपल्या पुढ्यात येते त्यावेळी त्याचा स्वीकार करताना आपण आपली जबाबदारी विसरतो का? असाच काहीसा प्रश्न अभिनेत्री काजोलला पडला होता. हा किस्सा यासाठी महत्त्वाचा आहे की शेवटी तुमची कमिटमेंट महत्त्वाची असते. मित्राला दिलेला शब्द महत्त्वाचा असतो.

हा किस्सा आहे अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्या मैत्रीचा. करण जोहर ज्यावेळी पहिल्यांदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आला, त्या वेळी त्याचा पहिला सिनेमा होता ‘कुछ कुछ होता है’. या चित्रपटाची नायिका होती काजोल. करण जोहरने या सिनेमात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना देखील घेतले होते.

करण जोहर आपल्या पहिल्याच चित्रपट दिग्दर्शनासाठी खूप उत्साहाने काम करत होता.

त्यावेळी त्याची काजोल सोबत चांगली मैत्री देखील झाली होती. ते दोघे एकमेकांशी आपले ड्रीम प्रोजेक्ट बद्दल कायम बोलत असत. काजोल करण ला नेहमी सांगायची ,”मला मणीरत्नम या दिग्दर्शकासोबत आयुष्यात एकदा तरी काम करायचे आहे. त्याचे चित्रपट मला प्रचंड आवडतात. तो दिवस माझ्यासाठी सोनियाचा असेल ज्या दिवशी मणीरत्नम च्या चित्रपटात मला काम करायची संधी मिळेल.

करण जोहर तिला नेहमी सांगायचा ,”तुला नक्की मणीरत्नम च्या सिनेमात काम करायची संधी मिळेल!” दोघे मिळून मणीरत्नमचे चित्रपट लॅपटॉप वर पाहत असत आणि त्यातील डायरेक्शनल व्ह्यूज बद्दल चर्चा देखील करत असत. इन शॉर्ट काजोल मणीरत्नम ची प्रचंड फॅन होती आणि त्याच्या चित्रपटात काम करण्याची तिला प्रचंड इच्छा होती!

एक दिवस काजोल घरी असताना तिच्या घरचा फोन वाजला आणि पलीकडून आवाज आला,

“हॅलो.. मणीरत्नम हियर..”

काजोलला आधी खूप आश्चर्य वाटले आणि नंतर तिला वाटले करण जोहर तिची फिरकी घेतोय. ती तात्काळ म्हणाली,” शट अप करण!” तिला वाटले करण जोहर तिची गंमत करत आहे आणि मुद्दाम मणीरत्नम च्या नावाने तिला फोन करत आहे. म्हणून तिने फोन ठेवून दिला. कारण मणीरत्नम चा फोन येण्याची सुतराम शक्यता तिला वाटत नव्हती.

परंतू थोड्या वेळाने तिला शाहरुख खानचा फोन आला आणि त्याने सांगितले ,”आत्ता तू शट अप करण म्हणून जो फोन ठेवून दिला होतास तो खरोखरच मणीरत्नम यांचा होता ते आपल्या दोघांना घेऊन एक चित्रपट करणार आहेत तू ताबडतोब त्यांना फोन कर.”

आता तिला वाटले करण आणि शाहरुख दोघे मिळून तिची फिरकी घेत आहेत. त्यावर काजोल शाहरुखला म्हणाली, ”तुम्ही दोघांनी मिळून आज माझी खेचायची ठरवले आहे का? मणीरत्नम मला कशाला फोन करेल?” असे म्हणून तिने फोन ठेवून दिला.

दुसऱ्या दिवशी शाहरुख खान ने काजोलला सांगितले, ”तू वेडी झालीस का ? तू मणीरत्नमला का फोन केला नाहीस?” त्यावर ती म्हणाली, ”तुम्ही दोघांनी मिळून मला उल्लू बनवायचे ठरवले आहे.” त्यावर शाहरुख म्हणाला, “तसे काही नाही मणीरत्नम खरोखरच त्याच्या आगामी ‘दिल से’ या चित्रपटांमध्ये आपल्या दोघांना घेऊन चित्रपट बनवणार आहे.”

आता थक्क होण्याची पाळी काजोलची होती.

कारण दोन दिवस ती ज्याला ‘मजाक’ समजत होती ती खरी घटना होती. ती मणीरत्नम ला भेटली. सॉरी म्हणाली. मणीरत्नम ने तिला ‘दिल से’ या चित्रपटाची ऑफर दिली! त्या दिवशी संध्याकाळी तिने शाहरुख खान ला फोन करून सांगितले ,”मणीरत्नम खरोखरच आपल्या दोघांना घेऊन सिनेमा बनवणार आहे.

पण माझ्या पुढच्या सहा महिन्यातल्या सर्व डेट्स मी करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटासाठी दिलेल्या आहेत.” त्यावर शाहरुख खान म्हणाला ,”मी करण जोहरशी बोलून घेतो.” दुसऱ्या दिवशी करण जोहरने काजोलला सांगितले,” माझ्या सर्व डेट्स मधून मी तुला मुक्त करत आहे.

तू मणीरत्नम च्या चित्रपटात नक्की काम कर. कारण तुझ्यासाठी त्याच्या सिनेमात काम करणे हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.” त्यावर काजोल म्हणाली ,”ते सर्व ठीक आहे करण. पण आपल्या चित्रपटाचे काय?” त्यावर करण म्हणाला,” आपला चित्रपट काय, त्यानंतरही पूर्ण होईल पण तुलाही संधी पुन्हा मिळणार नाही.

माझा प्रोजेक्ट मी पोस्टपोन करायला किंवा कॅन्सल करायला देखील तयार आहे.” करण जोहरचे बोलणे ऐकून काजोल सद्गतीत झाली आणि ती करण जोहर ला म्हणाली,” करण, मला मणीरत्नम च्या चित्रपटात काम करायचे आहे पण अशा पद्धतीने नाही.

“तुझा ड्रीम प्रोजेक्ट रद्द करून मला माझे स्वप्न पूर्ण करायचे नाही. त्यामुळे मी मणीरत्नम नकार कळवत आहे.”

करण जोहर आणि शाहरुख खाने तिला हर तऱ्हेने समजून सांगितले परंतु काजोल म्हणाली,” मी करणला कमिटमेंट दिलेली आहे त्याचा देखील हा पहिला सिनेमा आहे. त्याचा देखील हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे मी हाच सिनेमा करेल.”

काजोलने मैत्रीला जागत तिने मणीरत्नम ला नकार कळवला!

मणीरत्नम ने नंतर शाहरुख खानच्या सोबत मनीषा कोइराला ला या चित्रपटासाठी कास्ट केले आणि ‘दिल से’ या चित्रपटात काजोलच्या जागी मनीषाची एन्ट्री झाली. पुढे काजोल आणि करण जोहर यांचा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट पूर्ण झाला. हिट झाला.

करण जोहर एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या समोर आला. त्यानंतर काजोल ने त्याच्या अनेक चित्रपटात भूमिका केल्या पण या सर्व गडबडीमध्ये तिच्या हातून मणीरत्नम च्या सिनेमातून काम करण्याची संधी हुकली ती हुकलीच!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.