गाडगीळांनी रुसून राजीनामा दिला, पंतप्रधानांनी आयडिया करून त्यांना परत आणलं.

नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ. पुण्याचा अनभिषिक्त सम्राट. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, लेखक व प्रभावी वक्ते. दिल्लीच्या राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण करणे ज्या मोजक्या मराठी नेत्यांना जमलं होतं त्यात सगळ्यात पहिलं नाव येतं ते काकासाहेब गाडगीळांचं.

जन्म राजस्थानमधील मल्हारगढ येथे झाला. शिक्षण पुणे, बडोदे आणि मुंबई येथे झालं. बी. ए. नंतर एल्‌एल्‌.बी. पूर्ण केली आणि पुण्यात वकिली सुरु केली. टिळकांच्या आणि गांधीजींच्या प्रभावामुळे जी पिढी स्वातंत्र्यलढ्यात आली यात काकासाहेब गाडगीळांचा समावेश होता.

१९२० साली राजकारणात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे अनेक पदांवर व अनेक पातळ्यांवर कार्य केले. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारगृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.

टिळकांच्या नंतर पुण्यातील अनेक कार्यकर्ते काँग्रेस सोडून जात होते तेव्हा गाडगीळांनी पुण्यात पक्ष फक्त जगवलं नाही तर तो तळागाळात पोहचवला. पुण्यातील काँग्रेस भवन त्यांच्या पत्नीने घाण ठेवलेल्या दागिन्यांच्या पैशातून उभे राहिले आहे.

पुणे जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणीस पदापासून ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष , काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सभासद, संसदेत काँग्रेसचे पक्षप्रतोद आणि सरचिटणीस म्हणूनही त्यांनी कार्य केलं.

स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील उत्तुंग नेता म्हणून त्यांना जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं .

खरं पाहायला गेलं तर काँग्रेसमध्ये त्या काळात दोन सुप्त गट होते. एक गट पटेलांना मानणारा तर दुसरा नेहरूंना मानणारा. नेहरू प्रचंड लोकप्रिय असले तरी सरदार पटेलांची संघटनेवर जबरदस्त पकड होती. गांधीजींच्या इच्छेखातर नेहरूंना पंतप्रधान बनवण्यात आलं.

नेहरूंच्या मंत्रिमंडळात भारताचे पहिले सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा मंत्री म्हणून काकासाहेब गाडगीळ यांनी जबाबदारी स्वीकारली.

पटेलांच्या प्रभावामुळे भारतातील सर्वात पॉवरफुल मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश केला जायचा. सरकारी समित्यांवरही त्यांनी काम केल होतं. वेतन-आयोग, वेतन-भत्ता आयोग , संस्थानांच्या अर्थविषयक प्रश्नांचा विचार करणारी समिती त्यांच्याच नेतृत्वाखाली आकारास आली होती.

केंद्रीय मंत्री असताना गाडगीळांनी अनेक धरण-योजना तातडीने कार्यवाहीत आणण्यात पुढाकार घेतला. सोमनाथाच्या ऐतिहासिक मंदिराचा पुनरुद्धार करण्यात त्यांचाच पुढाकार होता. औद्योगिक उत्पादन खात्याचे मंत्री असतानाही अनेक कारखाने सुरू करण्यास त्यांनी हातभार लावला. अत्यंत कार्यक्षम व तडफदार मंत्री म्हणून ते प्रसिद्ध होते.

कोयना, भाक्रा नांगल धरणांपासून ते पुण्याच्या हिंदुस्थान अँटी बायोटिक्स, एनडीएसारख्या संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

एक सडेतोड आणि निर्भीड विचारवंत म्हणून ते ओळखळे जात. काँग्रसपक्षीय ध्येयधोरणाचेही ते मार्मिक व निःस्पृह टीकाकार होते. अगदी पंतप्रधानांवर घणाघाती टीका करण्यास देखील ते मागे पुढे पाहायचे नाहीत.

असाच त्यांच्या सडेतोडपणाचा किस्सा त्यांचे चिरंजीव विठ्ठलराव गाडगीळ यांनी एके ठिकाणी सांगितला आहे.

एकदा एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत काकासाहेब गाडगीळ आणि पंतप्रधान नेहरूंचं कुठल्यातरी विषयावरून चांगलंच वाजलं. गाडगीळ जी सूचना सांगत होते ती नेहरूंना पटत नव्हती. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. चिडलेल्या गाडगीळांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामाच दिला. तिथून तडक ते आपल्या घरी निघून आले.

गाडगीळांनी हि प्रतिक्रिया येईल याची नेहरूंना अपेक्षा नव्हती. त्यांची समजूत काढण्यासाठी कोणाला तरी पाठवण्यात आले. काकासाहेबांनी मात्र कोणालाच दाद दिली नाही. ते आपल्या राजीनाम्यावर ठाम होते.

अखेर पंडित नेहरू स्वतः त्यांच्या घरी आले. पंतप्रधान स्वतः आपल्या घरी आले आहेत म्हटल्यावर काकासाहेबांना त्यांचं स्वागत करणे क्रमप्राप्त होतं.

शिष्टाचाराप्रमाणे त्यांनी चहा मागवला. नेहरूंनी खडा टाकला,

“जर तुम्ही राजीनामा मागे घेत असाल तरच मी चहा घेईन.”

काकासाहेब तरीही तयार होईनात. नेहरूंच्या लक्षात आलं कि स्वारी अजूनही गुश्श्यात आहे. त्यांनी त्यांना बरंच समजावून सांगितलं. दोघांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात एकत्र सात आठवर्षे तुरुंगात काढली होती.

त्याकाळच्या मैत्रीची आठवण करून देत नेहरू गाडगीळांना राजीनामा मागे घ्या म्हणून विनवत होते.

गाडगीळांचा स्वभाव मानी होता. ते काही केल्या राजीनामा परत घेण्यास नकार देत होते. पण नेहरू देखील जिद्दी होते, त्यांनी काकासाहेबांचा राजीनामा सोबत आणला होता. अखेर गाडगीळ त्यांना म्हणाले,

“तुम्ही पंतप्रधान आहात, राजीनाम्याचं काय करायचं याचे सर्वाधिकार तुमच्याकडे आहेत.”

नेहरूंनी तेव्हा आयडिया केली. जवळच लहानगे विठ्ठलराव गाडगीळ खेळत होते. नेहरूंनी त्यांना बोलावलं,

“विठ्ठल इधर आओ.”

त्यांनी विठ्ठ्लरावांना काकासाहेबांचा राजीनामा दिला आणि फाडून टाकण्यास सांगितलं. विठ्ठलरावांनी खरोखर तो राजीनामा फाडून टाकला. दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालं. आपल्या सहज एका मित्रत्वाच्या कृतीने नेहरूंनी गाडगीळांचा रुसवा काढला आणि पेचप्रसंग सोडवला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.