अवघ्या १० मिनिटात त्यांनी सर्वशक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं..

संध्याकाळची वेळ. सर्वकाही शांततेत सुरू आहे असं वाटत असतानाच सेकंड क्लास डब्यातून कोणीतरी साखळी ओढली. काकोरी स्टेशन पासून मैल-दीड मैल लांब आलेली ‘8 Down ट्रेन’ जागेवरच थांबली. तेवढ्यात तीन क्रांतिकारक डब्यातून उतरले आणि काकोरी स्टेशनवर आमचं सामान राहील म्हणत पळत सुटले.

 ते तिघे म्हणजे अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिडी आणि शचिंद्रनाथ बक्षी. इतर डब्यातूनही सगळे क्रांतिकारक बाहेर पडले होते. ट्रेनच्या पुढच्या आणि मागच्या डब्याचे नियंत्रण आता त्यांच्या हातात आले.

समोर ठेवलेल्या चार तिजोऱ्या फोडायच्या कशा, हा प्रश्न सर्वांना पडला. जास्त वेळ जातोय हे पाहून बाजूला उभा असणाऱ्या ‘मन्मथनाथ गुप्त’ याच्या हातात बंदुक देऊन अशफाकउल्ला खान यांनी कुऱ्हाडीने तिजोरी फोडली. आतमधले सगळे पैसे घेऊन हे क्रांतिकारक घनदाट झाडीत गायब झाले.

अवघ्या 10 मिनिटात जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्याला जबरदस्त तडाखा या तरुणांनी दिला.. आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला.

खरेतर, सरकारी खजिना लुटायचा या गोष्टीला अशफाकउल्ला खान यांनी आधी नापसंती दर्शवली. त्यांच्या मते, ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या एका गोष्टीमुळे कोलमडून जाईल. आपला लढा संपुष्टात येईल. पण अशफाकसाहेबांचा त्यांच्या मित्रावर, त्यांचे कमांडर ‘पंडित रामप्रसाद बिस्मिल’ यांच्यावर प्रचंड विश्वास होता. नेता तोच, जो नेतृत्व तयार करतो. आणि रामप्रसाद बिस्मिलांनी क्रांतिकारकांची एक पिढीच घडवली.

त्या दहा जणांनी अवघ्या ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले होते. गाडीत 14 रायफलधारी आणि दोन इंग्रज अधिकारी असे 16 जण होते. तरी उत्तरादाखल एकही गोळी त्यांनी झाडली नाही. त्यांची तेवढी हिम्मत झाली नाही.

लखनऊला गाडी पोहोचल्यावर सर्वांचे तिकीट चेक करण्यात आले परंतू सेकंड क्लासमध्ये असणारे 3 क्रमांक (0900,0901 आणि 0902) लखनऊ स्टेशनवर तपासणीत आढळले नाहीत. हे तिन्ही तिकीट अशफाकउल्ला, राजेंद्रनाथ आणि बक्षी यांच्याकडे होते.

या संपूर्ण घटनेचा उलगडा होण्यास इंग्रजांना दोन दिवस लागले. रेल्वे रुळावर पडलेल्या काडतुसावरून लखनऊ पोलिसांनी आर.ए.हार्टनला कळवले, हीच काडतुसे बंगालच्या क्रांतिकारकांनी वापरली. तेव्हा कुठे ही गोष्ट क्रांतिकारकांनी केली या निष्कर्षावर पोलीस येऊन पोहोचले. 

रुळावर जे काडतुस मिळाले, त्यावर DWM K.K. 403 हे लिहीले होते. हे काडतुस Mauser C96 या बंदुकीस वापरत. त्यावेळेसचे सर्वात लोकप्रिय शस्त्र. आझादांचा लाडका ‘बमतुल बुखारा’ म्हणजे हीच C96..

जेव्हा क्रांतिकारकांनी ट्रेन थांबवली होती, तेव्हा बाजूच्या पटरीवरून ‘3 UP देहरा एक्सप्रेस’ गेली. ती थांबली असती तर कदाचित तो खजिना क्रांतीकारकांना घेता आला नसता.

रामप्रसाद बिस्मिल यांची जेव्हा चौकशी झाली, तेव्हा त्यांनी सांगितले की ही मोहीम तडीस नेण्यासाठी त्यांनी एका एअर गन आणि Deutsche & Waffen Munitionsfabriken (म्हणजेच DWM) कंपनीच्या ऑटोमॅटिक पिस्तूलवर बरेच दिवस सराव केला होता.

पोलिसांनी अगदी जीव आपटून मेहनत घेतली तरी त्यांना एका व्यक्तीला पकडण्यात अखेरपर्यंत यश आले नाही, ते म्हणजे महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद. ही घटना घडली तेव्हा त्यांचे वय केवळ 19-20 वर्षे होते. 

संपूर्ण प्रकरणात एकही जीवित हानी होणार नाही याकडे क्रांतिकारकांनी विशेष लक्ष दिले. प्रत्येक व्यक्तीच्या प्राणाचे मोल त्यांना माहीत होते. तरीही, एक ‘अहमद अली’ नावाचा युवक गडबडीत डब्यातून बाहेर आला आणि क्रांतिकारकांची गोळी त्याच्या मस्तकातून आरपार गेली. तेवढी एक गोष्ट सोडली तर एकाही इंग्रज अधिकाऱ्याला साधे खरचटले सुद्धा नव्हते.

तरीही तत्कालीन ‘इंडियन टेलिग्राफ’ वृत्तपत्राने ‘तीन लोकांचा मृत्यू – एक ब्रिटिश अधिकारी दगावला’ अशी बातमी देऊन अपप्रचार केला. 

सशस्त्र क्रांति करण्यासाठी शस्त्र हवीत. त्यासाठी पैसे लागतो. आता क्रांतिकारकांचे कार्य भूमिगत. उजळ माथ्याने ना कुणी त्यांना मदत करू शकत होते, ना मदतीसाठी काही प्रयत्न करता येत होते. पैसे तर हवेत.. आपल्याच लोकांचे पैसे लुटून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा सरकारच्या पैशावर शस्त्र विकत घेऊया आणि क्रांतीची बीजे भारतभर रोवूया याच उदात्त हेतूने क्रांतिकारकांनी हे कृत्य केले. यात यःकिंचितही स्वार्थ नव्हता. तरीही आपलेच लोक कितीतरी वर्ष काकोरीची घटना एक लूट याच दृष्टीने पाहत होते.

वास्तविक ही घटना ‘काकोरी लूट’ नव्हे तर ‘स्वातंत्र्य भारतासाठी केलेले उदात्त, धैर्यशील आणि प्रेरक कृत्य’ होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एक रोमांचकारी पर्व सादर करणाऱ्या ‘काकोरीवीरांना’ शतशः नमन..

  • केतन पुरी

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.