कलामांच्या या फोटो मागची स्टोरी वाचून अख्ख्या भारताची कॉलर ताठ होईल

दोन मुलं काही तरी काम करत आहेत. एक जरासा गोरटेला उंच आहे तो एक मशीन फिट करतोय तर दुसरा काळासावळा बुटका त्याला मदत करतोय.  हा फोटो बघितल्यावर तुम्हाला वाटेल की कोणी तरी दोन मजूर काही तरी करत आहेत.

यात काय विशेष? रोज आपण बांधकामाच्या ठिकाणी किंवा कारखान्यात पाहत असलेलं हे दृश्य तर आहे.

पण हे दृश्य साधं नाही. भारताच्या अंतराळ विज्ञानाला बदलून टाकणारा हा प्रयोग चालू होता.

या फोटोत जे दोघे आहेत ते भारताचे सर्वात मोठे सायंटिस्ट आहेत. एक आहेत आर. अरवामुदन आणि दुसरे डॉ.अब्दुल कलाम.  

गोष्ट आहे ५७ वर्षांपूर्वीची.

केरळच्या तिरुवनंतपुरम जवळ थुम्बा नावाचं एक छोटस मच्छिमार लोकांचं खेडेगाव आहे. तिथे विक्रम साराभाई आणि होमी जहांगीर भाभा या दूरदृष्टीच्या वैज्ञानिकांनी भारताचं पहिलं रॉकेट लॉन्चिंग स्टेशन उभं करायचा घाट घातला होता. त्याची पूर्वतयारी म्हणून भारतातून काही तरुण संशोधक अमेरिकेच्या नासाला गेले होते.

१९६३ साली अमेरिकेतच अरवामुदन आणि अब्दुल कलाम यांची पहिली भेट झाली.

दक्षिण भारतातून आलेले हे दोघे लवकरच मित्र बनले. रॉकेट लॉन्च करण्यासाठी लागणारे बेसिक ट्रेनिंग नासामध्ये झालेलं. पण नासाचे अनेक सायटींस्ट भारतीय अंतराळ प्रोग्रॅमबद्दल मनात अढी राखून होते. त्यांनी कलाम आणि इतर संशोधकांना व्यवस्थित माहिती दिलीच नाही.

अरवामुदन तेव्हाची एक आठवण सांगतात की, अब्दुल कलामांना एक डमी रॉकेट काऊंट डाऊन झिरो झाल्यावर उडवायचं होतं. पण त्यांना काही केल्या ते बरोबर झिरो झाल्यावर उडवता येत नव्हतं. कित्येकवेळा प्रयत्न करून अखेर शेवटी त्यांनी ते जमवलंच.

तेव्हा बघून कोणालाही वाटलं नसत कि हा व्यक्ती पुढे जाऊन देशाचा मिसाईल मॅन होणार आहे.

चुकत पडत धडपडत भारतीय संशोधक शिकत होते.

अखेर नासा मधील ट्रेनिंग संपलं व हि सगळी मंडळी थुंबाला आली. अमेरिकेनेच दिलेलं एक छोटं रॉकेट तिथून लॉन्च होणार होते. पण या खेडेगावात कसलीच सुविधा नव्हती.

कुठे नासामधील मोठे मोठे अंतराळ संशोधन केंद्रे आणि कुठे साधे ऑफिस देखील नसलेलं भारतीय अतंराळ केंद्र थुंबा.

विक्रम साराभाई यांनी ऑफिस बनवण्यासाठी जागा शोधून काढली. ती होती एक जुनं चर्च.

सेंट मेरी मॅगडिलीन या चर्चच्या बिशप कडे परवानगी मागायला विक्रम साराभाई व तरुण अब्दुल कलाम गेले होते. त्यावेळी बिशप रे.पीटर बर्नार्ड परेरा यांनी उद्या सांगतो असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी रविवार होता. प्रार्थना करायला जमलेल्या गावकऱ्यांना बिशपनी हे मिशन नेमकं काय आहे, याचा देशाच्या प्रगतीसाठी किती महत्व आहे हे सांगितलं. सगळं झाल्यावर त्यांनी गावकर्यांना विचारलं,

“जर अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीही माणसाचे जीवन समृद्ध करण्यासाठीच काम करत असतील तर आपले घर डॉ.विक्रम साराभाई यांच्या वैज्ञानिक कार्यासाठी द्यायचे का ?”

त्यावेळी एका सुरात सर्वांनी “आमीन” म्हणत परवानगी दिली. मासेमार आणि स्थानिकांना रोजगाराचे वचन देण्यात आले. अशा पद्धतीने थुंबाजवळील ६०० एकरांच्या परिसरात असणाऱ्या एका चर्चमध्ये भारतीय स्पेस प्रोग्रॅमचे कार्यालय सुरु झाले. बिशपच्या घरात व गोठ्यात वर्कशॉप, लॅबोरेटरीज बनवण्यात आल्या.

मगाशी वर आपण पाहिलेला फोटो हा थुम्बा मधला बिशपच्या घरातला आहे.

कोणतेही मोठे वर्कफोर्स उपलब्ध नसताना अरवामुदन, अब्दुल कलाम व इतर अनेक संशोधकानी नारळाच्या झावळ्यांमध्ये हे रॉकेट लॉन्च स्टेशन उभे केले. 

अरवामुदन आणि कलाम यांची दोस्ती गाढ बनली. पुढे राष्ट्रपती बनल्यावरही या दोघांची जिवाभावाची मैत्री अशीच टिकली. दोघे एकत्र फिरत, एकत्र राहात. थुंबामध्ये हे महान सायटींस्ट अगदी सायकलवरून फिरत असत. कलामांना सायकल येत नसल्यामुळे अरवामुदन त्यांना आपल्या सायकलवर डबल सीट बसवून रॉकेट बनवण्याच्या कामावर घेऊन जात.

2 1

इतकंच काय थुंबा येथून लॉन्च झालेलं अमेरिकेचं नाईक अपाचे हा उपग्रह देखील सायकलच्या कॅरियरवर ठेऊन थुंबाच्या रॉकेट लॉन्च स्टेशनवर आणण्यात आला. कोणत्याही चुंबकीय लहरी पासून वाचवण्यासाठी भारताकडे दुसरी टेक्नॉलॉजी नव्हती.

२१ नोव्हेम्बर १९६३ रोजी नाइके अपाचे यशस्वी रित्या उडाले.

दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्याने रॉकेटचे निरीक्षण आणि रॉकेटच्या धुराच्या साहाय्याने त्याचे ट्रॅकिंग करण्यात आले होते. विक्रम साराभाई यांनी पंतप्रधानांना तार पाठवली,

Gee whiz wonderful rocket show.

या प्रयोगाच्या यशामुळे भारतासाठी अनेक दरवाजे उघडले. कमीतकमी साधने उपलब्ध असूनही भारताचे वैज्ञानिक कोणताही अंतराळ प्रोग्रॅम यशस्वी करू शकतात याचा आत्मविश्वास देशाला आला. भारतासारखा गरीब देश आपली अंतराळात छाप उठवू शकतो याची दखल जगाला घ्यायला लागली.

नेहरूंनी होमी भाभा आणि विक्रम साराभाई याना घेऊन सुरु केलेला स्पेस प्रोग्रॅम हा पैशांची उधळपट्टी नाही हे विरोधकांना देखील पटले. भावी इसरोची पायाभरणी येथे झाली.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे अब्दुल कलाम सारखे संशोधक इथे घडले. पुढे घडलेले अनेक विक्रमांची, भारताच्या चंद्रयान, मंगलयान या क्रांतिकारी स्पेस मिशनची नांदी या सायकलवरून वाहून नेलेल्या रॉकेटमुळे झाली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.