LIC मध्ये क्लार्क ते ५०० कोटींची बेहिशोबी संपत्ती बाळगणारा कल्की भगवान!
आपल्याकडे बुवा बाबांची कमी नाही. कारण आपण भारतीय श्रद्धाळू लोक. त्यामुळे आपल्याकडे बुवा बाबांची फौजच आहे. प्रत्येकांना आपल्या पद्धतीने महाराज वाटून घेतलेले आहेत आणि त्यांची मनोभावी सेवा केली जातेय. त्यातले काही बाबा लोकांना ज्ञानाचे धडे देतात. कोणी मंत्र म्हणून अंगातले भूत दूर करतात तर कोणी अंगारा, भस्म, औषधे देऊन रोग बरे करतात.
त्यामुळे आपल्यातल्या काही श्रद्धाळू लोकांचा या बुवा बाबांवर लई विश्वास. याच विश्वासाचा आणि श्रद्धेचा फायदा आत्तापर्यंत अनेक बुवा बांबानी उचललेला आहे.
सध्या अशाच एका स्वंयघोषीत बाबाच्या आश्रमावर आयकर विभागाने म्हणजेच इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तेव्हा या बाबाकडे तब्बल 500 कोटींपेक्षा जास्त रूपयांची बेहेशोबी संपत्ती सापडली. या बाबाचं नाव आहे. कल्की भगवान.
कोण आहेत कल्की भगवान?
कल्की भगवान याचे संपुर्ण नाव विजय कुमार नायडू. सध्या ते 70 वर्षाचे असून स्वत:ला भगवान विष्णूचा दहावा अवतार मानतात. त्यांचे आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू तसंच देश विदेशात सुद्धा आश्रम आहेत.
क्लार्कचे कल्की भगवान महाराज कसे झाले?
विजय कुमार नायडू हे एलआयसीमध्ये क्लर्क होते. पगार पाणी व्यवस्थित मिऴत होेतं. मात्र त्यांनी 1990 साली आपली नोकरी अचानक सोडली. आध्यात्माचा मार्ग स्विकारण्याचं ठरवलं. सुरूवातीला जीवाश्रम नावाची संस्था काढली. या संस्थेच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञान देण्यास सुरूवात केली. प्रसन्न अशी मुद्रा, हिंदी आणि इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व यामुळे लोक कल्की भगवान यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. त्यानंतर त्यांनी
स्वत:ला भगवान विष्णूचा दहावा अवतार असल्याचं सांगायला सुरूवात केली.
लोकांना त्याच्य़ावर विश्वास बसला हळूहळू कल्की भगवानांची ख्याती सगळीकडं पसरायला सुरूवात झाली. छोटया भक्तांपासून ते व्यापारी वर्ग, सेलिब्रीटी, राजकारणी हे कल्की भगवान यांचे भक्त झाले. त्याच्या भक्तीरसात तल्लीन होऊ लागले.
त्यानंतर त्यांनी दर्शनासाठी पैसे घ्यायला सुरूवात केली. 5 हजार ते 25 हजारापर्यंत दर्शनासाठी भक्त रक्कम मोजू लागले. तरीही महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगाच रांगा लागत होत्या. कल्की भगवान यांच्या पत्नी पद्मावतीला सुद्धा भक्त देवी म्हणून पुजायला लागले. देवी पद्मावती आणि कल्की भगवान यांचा मुलगा कृष्णा यांनी आश्रमांची देखभाल करायला सुरूवात केली.
कल्की भगवान यांचा आता चांगला जम बसला होता. सगळीकडे ख्याती पसरली होती. परराज्यातही भक्त झाले होते. आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकमध्येही कल्की महाराजांचे आश्रम उभारले गेले. या दरम्यान कल्की भगवानांनी कर्नाटकमध्ये एका विद्यापीठाचीही स्थापनाही केली.
आध्यात्माच्या मार्गावर चालत असतांना त्यांनी रियल इस्टेटमध्ये पाऊल ठेवलं आणि देश विदेशात सुद्धा आपलं साम्राज्य पसरवलं. विदेशातही कल्की भगवानाचे अनेक भक्त तयारे झाले. त्यांना आपल्या संस्थेद्वारे आध्यात्मिक ट्रेनींग देण्याच्या नावाखाली बक्कळ असा पैसा उकऴायला सुरूवात केली. याच ट्रेनिंगच्य़ा नावाखाली कल्की भगवान यांनी अनेक कोटी रूपयांची संपत्ती जमवली.
नेमकं आयकर विभागानं छापा का टाकला?
कल्की भगवान यांनी रियल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला होता. तसंच आपल्या संस्थेच्या नावाने त्य़ांनी अनेक ठिकाणी जमीनी हडपल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. विद्यापिठाबरोबर त्यांनी अनेक शाळा काढल्या होत्या. विदेशी भक्तांना आध्यात्मिक ट्रेनिगच्या नावाखाली ते ंमोठ्या प्रमाणावर पैसा उकळत होते. ही सगळी बेहिशोबी संपत्ती कल्की भगवानांनी लपवली होती. त्यामुळे आयकर विभागाच्या 300 अधिकाऱ्यांनी 5 दिवस कल्की भगवानाच्या जवळपास 40 आश्रमांवर छापा टाकला.
आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये काय सापडलं.
पाच दिवस टाकलेल्या या छाप्य़ामध्ये आयकर विभागाला 18 कोटी रूपयाचे अमेरिकन डाॅलर, 26 कोटी रूपयांचं 88 किलो सोनं, 1271 कँरेटचा 5 कोटीचा हीरा, 44 कोटींच्या कँश नोटा. 409 कोटीचे व्यवहार केलेले कागदपत्रे मिळाले आहेत. तसंच कल्की भगवानच्या अनेक कंपन्या चीन, अमेरिका, सिंगापूर आणि यूएईमध्ये कार्यरत असल्याचं उघड झालं आहे.
हे ही वाच भिडू.
- रामदेव बाबा तर फक्त पोस्टर बॉय आहेत, पतंजलीचे ९८ % शेअर्स बाळकृष्णांकडे आहेत.
- हे आहेत गुगल, फेसबुक, अॅप्पलच्या मालकांचे अध्यात्मिक गुरू.
- रामदेव बाबा सुद्धा ज्यांचं नाव ब्रँड म्हणून वापरतात असे पतंजली मुनी नेमके कोण होते?