१९९८ च्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पाडून अपक्ष कलमाडी खासदार झाले

आजही पुण्याच्या काँग्रेस भवनात गेल्यात तर एक घोषणा तुमच्या कानावर नक्की पडेल.

सबसे बडा खिलाडी सुरेश भाई कलमाडी.

भारतीय वायू सेनेत असणारे सुरेश कलमाडी ७० च्या दशकात काँग्रेस मध्ये आले. इतर सगळ्या नेत्यांना बाजूला सारत सुरेश कलमाडी पुणे काँग्रेसचे प्रमुख बनले होते. १९९१ नंतर पुण्यातील काँग्रेसवर त्यांच्या वरदहस्त राहिला. 

पुढील लोकसभा निवडणुकीत आपल्याला पुण्यातून तिकीट मिळणार नाही अशी भीती व्यक्त करत कलमाडींनी १९९७ मध्ये काँग्रेस सोडली. १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पराभव झाला. कधी काळी शरद पवार यांच्या जवळील समजले जाणारे सुरेश कलमाडी यांनी मात्र आपला पराभव शरद पवारांमुळे झाल्याचा आरोप केला. 

यानंतर सुरेश कलमाडी यांनी त्याच वर्षी होणारे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढविणार असल्याचे घोषीत केले

१९९५ मधील आमदारांच्या संख्याबळानुसार काँग्रेसचे २, शिवसेना-भाजप युतीचे ३ उमेदवार निवडून येऊ शकत होते. एकजागेसाठी या दोन्ही पक्षाला मते कमी पडणार होती. त्यामुळे अधिकृत उमेदवार देण्यात आला नव्हता. ही निवडणूक ६ जागांसाठी घेण्यात येणार होती. काँग्रेसने या निवडणुकीची सगळी जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवली होती.  

त्यावेळी विधानसभेत काँग्रेसचे ८० आमदार, शिवसेनेचे ७३, भाजपचे ६५, जनता दलाचे ११ आमदार होते. तर अपक्ष आमदारांची संख्या कमी अधिक नाही तर ४५ एवढी होती. आणि त्यांचा मोठा गट होता. हे सगळे युतीला पाठींबा दिलेले मात्र पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे असल्याचे सांगितले जातं. उमेदवार निवडून येण्यासाठी ४१ मतांचा कोटा होता. 

काँग्रेसकडून नजमा हेपतुल्लाह, राम प्रधान, शिवसेनेनेकडून सतीश प्रितीश नंदी, भाजपकडून प्रमोद महाजन आणि अपक्ष म्हणून विजय दर्डा आणि सुरेश कलमाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

विधानसभेतील ४५ आमदार हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते. त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेऊन शरद पवार यांनी अपक्ष उमेदवार विजय दर्डा यांना पाठिंबा जाहीर केला होता. काँग्रेस आमदारांची संख्या ८० असल्याने त्यांचे २ उमेदवार आरामात निवडून यायला पाहिजे होते. त्यानुसारच सगळी फिल्डिंग लावण्यात आली होती. 

सुरेश कलमाडी यांनी निवडणुकीच्या दोन दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेऊन,

 मी जिंकणार की नाही हे माहित नाही पण राम प्रधान यांचा पराभव होईल नक्की असे भाकीत वर्तविले होते. 

राज्यसभेची निवडणूक एकसंक्रमण पद्धतीने होते म्हणजेच प्रत्येक आमदाराला जितके उमेदवार आहेत तितकी मते देता येतात. त्या-त्या उमेदवाराच्या नावापुढे पसंतीचा क्रमांक लिहावा लागतो. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची ४१ मते लागणार होती. 

युतीचे उमेदवार प्रमोद महाजन यांना पहिल्या फेरीत ४१ मतांचा आकडा पार केला. त्यांना पहिल्या पसंतीची ४९ मते मिळाली. 

तर काँग्रेसचा पाठिंबा असणारे विजय दर्डा यांना पहिल्या पसंतीची एकूण ४५ मते मिळाली. सर्वाधिक आमदार असणाऱ्या काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येणे सोपे असतांना मात्र काँग्रेस मधील १२ आमदार, अपक्ष ४४ आमदार आणि शिवसेनेच्या आमदारांनी क्रोस व्होटिंग केल्याने कलमाडी विजय झाले. 

सेनेच्या तर प्रितीश नंदी आणि सतीश प्रधान यांना पहिल्या पसंतीची ३८ मते मिळाली. दुसऱ्या आणि पाचव्या फेरीत ते निवडून आले. नजमा हेपतुल्लाह आणि राम प्रधान यांना शेवटपर्यंत लढावे लागले. शेवटी राम प्रधान यांचा १ मताने पराभव झाला. एका मताने पराभव करत काँग्रेसच्या अधिकृत उमेदरवाराला पाडून सुरेश कलमाडी राज्यसभेत पोहचले होते. 

राज्यसभा निवडणूक ही पक्षांतर विरोधी कायद्यात येत नाही, त्यामुळे क्रॉस व्होटिंग करूनही त्या आमदारांवर कारवाई करता आली नाही. सुरेश कलमाडी यांनी हे सर्व अपक्ष आमदार फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये ठेवल्याचे सांगितलं होते.

राम प्रधान हे राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या जवळचे समजले जात.महायकमांडच्या जवळचा उमेदवार पडल्याचा ठपका शरद पवार यांच्यावर ठेवण्यात आला. यामुळे पराभवामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात दरी वाढण्यास हे देखील कारण ठरल्याचं सांगितलं जातं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.