पुण्याच्या कलमाडींनी कार्यकर्ते नेऊन हरियाणात मारुतीचा कारखाना बंद पाडला

आपलं संबंध राजकारण पुण्यात गाजवून देशपातळीवर मोठे होणारे कलमाडी दिल्लीत वजन असणाऱ्या महाराष्ट्राच्या फार कमी नेत्यांपैकी एक होते. २०१० च्या कॉमनवेल्थ स्पर्धेनंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पण २०१४ पर्यंत ते महाराष्ट्राचे दिल्लीमधील प्रमुख नेते म्हणूनच वावरत होते.

सध्या राजकारणातून विजनवासात गेले असले तरी सुरेश कलमाडी म्हणजे पुण्याचे धडाकेबाज कारभारी होते. सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशी त्यांची ओळख होती.

एक काळ असा होता सुरेश कलमाडी यांचा देशभरात दबदबा होता.

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडे मारुती ग्रँड व्हिटारा व जिप्सी या २४ लाखांच्या मोटारी’ एकेकाळी पुणेकरांच्या चर्चेचा विषय होता. पण मारुती गाडीशी सुरेश कलमाडी यांचा जुना संबंध आहे. आत्ता पुण्यात कलमाडी यांची जुनी ओळख राहिली नाही. नवी पिढीही त्यांच्या नावापासून अनभिज्ञ आहे.

पण एकेकाळी याच सुरेश कलमाडी यांनी दिल्लीपर्यंत आपलं नाव गाजवलं होतं. पक्षसाठी मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाड्ल्या होत्या. आपल्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी देशभर गाजलेली आंदोलने उभारली होती.

फक्त पुण्यातच नव्हे तर देशभर त्यांच्या नावाची चर्चा तेव्हापासूनच होती.

१९७७ सालापासून ते कोर्सच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले होते. भारतीय काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. वर्षभरातच त्यांनी आपल्या कामाने काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांची मने जिंकून घेतली. १९७८ साली त्यांना राज्याच्या युवक काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले. १९८० पर्यंत ते या पदावर कार्यरत होते.

१९७७ साली देशाचे राजकरण अचानक पालटले आणि जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्या वेळी देवराज अरस यांच्या नेतृत्वाखालील गटाची आणि इंदिरा गांधी यांची वैचारिक लढाई सुरु झाली. काँग्रेसमध्ये लवकरच फूट पडली.

देवराज अरस यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) नावाचा पक्ष स्थापन केला. यालाच भारतीय काँग्रेस (सेक्युलर)या नावानेही ओळखले जात असे. १९७८ साली या पक्षाची स्थापना झाली होती.

इंदिरा काँग्रेसमधील अनेक नेते भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षात गेले होते. देवराज अरस यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवा नेत्यांनी पक्ष सोडला आणि ते या नव्या पक्षात सहभागी झाले होते.

सुरुवातीच्या काळात या पक्षाला देवराज अरस यांच्या नावानेच ओळखले जाई. दिल्लीच्या राजकारणात या पक्षाला अरस काँग्रेस असेच नाव होते. देवराज अरस यांनी आपल्यासोबत घेतलेले बहुतेक सर्व नेते पुढे जाऊन मोठमोठे मंत्री झाले.

यांच्यामध्ये महाराष्ट्रातील दोन नावे होती – शरद पवार आणि सुरेश कलमाडी.

१९८६ सालापर्यँत हा पक्ष पवारांनी चालवला. पुढे त्यांनीच हा पक्ष मुख्य काँग्रेसमध्ये विलीन केला.

या पक्षाच्या युवा आघाडीची सर्व जबादारी सुरेश कलमाडी यांच्याकडे देण्यात आली होती. १९८१ ते १९८६ सालापर्यँतते या पक्षाशी जोडलेले होते. या काळात सदर पक्षाने अनेक आंदोलने उभारली होती. त्याचा प्रमुख उद्देश सरकारला अडचणीत आणणे असाच होता.

हरियाणात झालेल्या मारुती कारखाण्याचे आंदोलन असाच प्रकार होता. सुरेश कलमाडी यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले होते.

त्यांनी थेट हरियाणात जाऊन मारुतीचा कारखाना एकहाती बंद केला होता. 

मारुती कंपनीला स्वतःचा आणि राजकारणाचा स्वतंत्र इतिहास आहे. या कंपनीमुळे एकेकाळी इंदिरा गांधीही अडचणीत आल्या होत्या. मारुती कंपनी सुरू होण्याआधीपासून तिचं नाव घोटाळ्यात जोडलं गेलं होतं.

मारुतीला पॅसेंजर कार बनविण्याचा परवाना देण्यासाठी संजय गांधी यांना आर्थिक मदत देण्यात आल्याची चर्चा दिल्लीत दबक्या आवाजात होती. या घोटाळ्याशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचंही नाव जोडलं गेलं तेव्हा देशात खळबळ उडाली होती.

या कंपनीचे राष्ट्रीयीकरण कारण्यात्त अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट कारखानाताब्यात घेण्याचं ठरवलं.

सुरेश कलमाडी यांच्याकडे पुण्यातील युवक काँग्रेसची जबाबदारी होती. त्यावेळी ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. या पदाची जाबाबदारीच अशी असते की राष्ट्रीय मुद्द्यांवर जास्त त्वेषानं व्यक्त व्हावं लागतं. प्रकरण इंदिरा गांधींच्या अंगावर बेतू लागताच देशाचे लक्ष याकडे वळाले.

युवक काँग्रेसदेखील सचेत झाली. सुरेश कलमाडी याना अशा आंदोलनाची चांगलीच कल्पना होती.

जेव्हा मोरारजी देसाई पुण्यात आले तेव्हा सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले होते.

त्यावेळी मोरारजी देसाई यांच्यावर सुरेश कलमाडी यांनी चप्पल फेकुन मारली होती. 

हा कारखाना सुशिक्षित बेकारांच्या ताब्यात द्यावा आणि तिथे १००० प्लॉट्स पाडून लघुउद्योग सुरु करावेत अशी युवक काँग्रेसची मागणी होती.

यासाठी सुरेश कलमाडी यांनी जोरदार तयारी सुरु केली. त्यांनी कार्यकर्त्यांना जमवले. निदर्शकांना सोबत घेतले. पुण्यातून थेट कारखाना गाठायचा आणि तिथे आंदोलन उभारायचे अशी त्यांची कल्पना होती.

त्यासाठी त्यांनी आदल्या दिवशीच सर्व त्यारे केली. काँग्रेसचे झेंडे, फलक घेऊन ठेवले. इमारतीच्या भिंती रंगवण्यासाठी सगळी साधने बरोबर घेतली.

यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. मारुती कारखाना हा गुरुग्राम येथे वसलेला आहे. त्यामुळे वाटेत अनेक जागी टोलनाके होते.त्यामुळे बसमधील कार्यकर्त्यांच्या मनात धाकधूक होती.   वाटेत एकदा त्यांची बसही बंद पडली होती. पण सगळ्या अडचणींवर मात करत कार्यकर्ते बसने गुरूग्राम येथे जाऊन पोहोचले.

दुपारी बारा वाजता तेथे पोचून कलमाडी थेट कारखान्यात घुसले. सुरक्षा रक्षकांची संख्या फार कमी असल्याने त्यांना आत जाण्यात कोणतीही अडचण आली नाही.

तेव्हा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि कारखान्याला टाळे लावून टाकले. काही कार्यकर्त्यांनी कारखान्यावर चढत तिथे काँग्रेसचा झेंडा फडकावला. अनेक लोक गेटसमोर उभे राहून त्यांनी आत जाण्याची वाट अडवून धरली.

उपस्थितांच्या जबाबानुसार केवळ दहा मिनिटांमध्येच देशभर गाजलेला हा कारखाना सुरेश कलमाडी आणि त्यांच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतला.

काही कार्यकर्त्यांनी लगोलग कारखान्यावरव संरक्षक भिंतीवर घोषणा लिहिल्या.

दुसऱ्या दिवशी या घटनेला माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली. अनेक महत्त्वाच्या पेपरांमध्ये ही बातमी छापून आली. सुरेश कलमाडी यांच्या कारकिर्दीत हे आंदोलन महत्त्वाचे ठरले.

यथावकाश हा कारखाना राष्ट्रीयीकरण करण्याच्या प्रक्रियेत आला. १९८२ साली मारुती उद्योगसमूहाची आणि जपानमधील सुझुकी उद्योगाची गाठ जुळली. या दोन्ही कंपन्यांनी आपले उत्पादन मिळून करण्याचा निर्णय घेतला.

अशा प्रकारे ही कंपनी मारुती सुझुकी म्हणून प्रसिद्ध झाली. आजकाल ज्या गाड्यांवर सुझुकीचा लोगो असतो ती हीच कंपनी होय. सुरुवातीच्या काळात फक्त गाड्या आयात करून विकणाऱ्या मारुतीने नंतरच्या काळात सोबत गाड्या बनवायलाही सुरुवात केली. याचे श्रेय इंदिरा गांधींना दिले जाते.

महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार अशोक जैन यांनी या आंदोलनाचा किस्सा सांगताना पोलीस न आल्याने झालेली गडबड आपल्या लेखनात मांडली होती. त्यांच्या मते कार्यकर्त्याना आपल्याला मोठा विरोध होईल आणि पोलीस पकडून नेतील असे वाटत होते. पण असे काहीच घडले नाही.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.