कलमाडींनी दिलेल्या एका पार्टीनंतर शरद पवारांची पंतप्रधान पदाची दावेदारी फेल झाली…
वर्ष १९९१ भारतात सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होत होत्या. व्ही.पी.सिंग आणि चन्द्रशेखर यांच सरकार फेल गेलं होतं. सत्तेत परतण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. अशातच दुर्दैवाने एका प्रचसरभेवेळी काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांची लिट्टेच्या अतिरेक्यांनी हत्या घडवून आणली. संपर्ण देशाला धक्का बसला. मतदारांची सहानुभूती काँग्रेसच्या बाजूने वळाली.
काँग्रेसचा पंतप्रधान कोण याबद्दल उत्सुकता होती. जो अध्यक्षपदी निवडून येणार त्याच्याच गळ्यात पंतप्रधानपदाची जबाबदारी पडणार याबद्दल सगळ्यांना खात्री होती.
राजीव गांधी यांच्या आकस्मित मृत्यूनंतर कॉंग्रेसची जबाबादारी कोण घेवू शकेल याबाबत जोरदार चर्चा होतं होत्या. त्यांची पत्नी सोनिया गांधी यांनी मला राजकारणात रस नसल्याचं सांगितल्यानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याच्या बाहेर कॉंग्रेसची सुत्र जाण्याची चिन्हे दिसू लागली होती.
अशा वेळी काँग्रेसचे दिग्गज नेते पुढे आले. काँग्रेस अध्यक्ष पदावर सर्वात पहिला अधिकार सांगितला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी.
आजवर महाराष्ट्राला देशाचे पंतप्रधानपद कधीच मिळाले नव्हते. काँग्रेसमध्ये सर्वाधिक खासदार निवडून येणारं राज्य महाराष्ट्रच होतं त्यामुळे दिल्लीच्या राजकारणाची सूत्रे मजबूत मराठी नेत्याच्या हाती घेण्याची वेळ आली आहे असच सगळ्यांचं म्हणणं होतं. यापूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी मनाचा मोठेपणा दाखवून पंतप्रधानपद गमवाल होतं तस न करता व्यवस्थित नियोजन करून दिल्ली जिंकायची या प्रयत्नात शरद पवार होते.
त्यांच्या मोहिमेचं नेतृत्व करत होते पुण्याचे तरुण खासदार सुरेश कलमाडी.
कुशल क्रीडा संघटक, उत्कृष्ट इव्हेन्ट मॅनेजर,प्रसारमाध्यमांचा हुशार नियंत्रक, ढोर मेहनत घेणारा कार्यकर्ता आणि यशस्वी राजकीय नेता असे अनेक तुरे कलमाडींच्या शिरपेचातील फेट्यात होते. एकेकाळचा हा भारताचा लढाऊ पायलट शरद पवारांच्या मदतीने पुण्याचा कारभारी बनला होता. असं म्हणतात की कलमाडी पत्रकार मित्रांशी बोलताना म्हणाले होते,
“इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत जे यशवंतराव चव्हाणांना जमलं नव्हतं ते त्यांचा शिष्य आणि आमचा बारामतीचा नेता प्रत्यक्षात करून दाखवणार आहे.”
पवारांच्या नेतेपदाच्या लॉबीयिंगसाठी आणखी एक गट सक्रिय झाला होता. बोंबे क्लब नावाने ओळखला जाणारा हा गट होता मुंबईतल्या शक्तिशाली उद्योगपतींचा. यात बॉम्बे डायिंगचे नसली वाडिया आघाडीवर होते. शिवाय त्यांच्या सोबत अंबानी वगैरे आणखी काही उद्योगपतींचा समावेश होता. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे भारतात वाढत चाललेले वर्चस्व कमी व्हावे यासाठी हे सर्व उद्योजक प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदी आपल्या मर्जीतला नेता असावा अशी इच्छा होती.
काँग्रेसच्या खासदारांना वश करायचे असेल तर साधनसामुग्रीची चिंता करू नका असा संदेश त्यांनी पवारांना पोहचवला होता.
त्यांच्या पाठिंब्यामुळे सुरेश कलमाडी यांनी दिल्लीत मोठमोठ्या नेत्यांसाठी जंगी पार्ट्या देण्यास सुरवात केली.फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उंची वाईन आणि उत्तम खाद्यपदार्थांनी सजलेल्या पार्टीत काँग्रेस नेत्यांची सरबराई करण्यात आली. शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठीच या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे हे ओपन सिक्रेट होते.
पण काँग्रेस पक्षात पवारांच्या बद्दल एक नेहमी संशयाचे वातावरण होते. त्यांनी यापूर्वी एकदा पक्ष सोडला होता. त्यांचं राजकारण नेहमी बेभरवशाचं राहील आहे असं बोललं जात होत. हाच संदेश अर्जुनसिंग व इतर नेत्यांनी १० जनपथ म्हणजेच सोनिया गांधींपर्यंत नेऊन पोहचवला होता.
सोनिया गांधींनी जरी राजकारणात येण्यास नकार दिला असला तर गांधी घराण्याला मानणाऱ्या गटात त्यांच्या मताला मोठं वजन होतं. पवार वयाने तरुण असल्यामुळे मोठ्या कालावधीसाठी ते पंतप्रधानपदावर राहतील आणि गांधी घराण्याचे महत्व कमी करून टाकतील अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली.
म्हणूनच सोनिया गांधींनी वयोवृद्ध असणाऱ्या व राजकारणातून संन्यास घेण्याच्या मार्गावर असलेल्या नरसिंह राव यांना पाठिंबा दिला.
नरसिंह राव यांच्या पाठीशी दक्षिण भारतातल्या खासदारांनी मोठं बळ उभं केलं. इकडे सुरेश कलमाडी देत असलेल्या पार्ट्यांमुळे काँग्रेसमध्ये पवार गट बदनाम होऊ लागला. त्यांच्या पार्टीला उपस्थित राहील तर आपल्यावर १० जनपथच्या अवकृपेची छाया पडेल असं देखील अनेकांना वाटू लागलं.
त्यामुळे कलमाडींच्या पार्टीत फक्त महाराष्ट्र, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब येथील ४८ खासदार उपस्थित राहिले. पवारांना हा मोठा धक्का मानला गेला. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शक्यता धूसर होऊ लागल्या. अशातच गांधी घराण्याचे सल्लागार असलेल्या राम प्रधान यांची शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. तिथे बॉंबे क्लबचे उद्योगपती देखील उपस्थित होते.
प्रधान यांनी पवारांच्या शयनकक्षात खाजगी भेट घेतली व एक निरोप दिला. त्यांच्या एका निरोपानंतर सगळी चक्रे फिरली आणि पवारांनी आपला काँग्रेस अध्यक्षपदाचा व पंतप्रधानपदाचा दावा मागे घेतला.
पीव्ही नरसिंह राव यांनी पवार याना माझ्या नंतर काँग्रेसचे पुढचे नेते तुम्हीच असाल असं त्यांना समजावलं आणि आपल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री पद दिल. पवार देखील राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन देशाच्या राजकारणात आले. आज ना उद्या पंतप्रधान पद आपल्या वाट्याला येईल अशीच त्यांची अपेक्षा होती. मात्र ते घडले नाही.
शरद पवार म्हणतात,
“माझ्या उमेदवारीसाठी सुरेश कलमाडी यांनी पुढाकार घेतला, इतर राज्यातील खासदारांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न केले हे खरं मात्र त्यांनी हि मोहीम मोठ्या उथळपणे राबवली हे देखील तितकंच खरं.”
मात्र त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं बक्षीस म्हणून पवारांनी कलमाडी यांना केंद्रात अल्पकाळासाठी रेल्वे राज्य मंत्री पद दिलं. पण पुढे महत्वाकांशा वाढलेल्या कलमाडी यांचं पवारांशी फाटत गेलं आणि दोघांचे मार्गे वेगवेगळे झाले.
हे ही वाच भिडू.
- शरद पवारांना पंतप्रधान करण्याच्या तयारीला लागलेला राष्ट्रमंच काय आहे ?
- जेव्हा विलासरावांच्या एका चुकीनं पवारांचं पंतप्रधानपद हुकलं !!!
- शरद पवार पंतप्रधान होवू शकतात का ? वाचा काय असतील यामागची कारणे.
- या भेटीचा एकच अर्थ; किंगमेकर तिसऱ्या आघाडीच्या तयारीला लागलेत.