स्टॅण्ड-अप काॅमेडीची सुरवात तर काळुबाळूने केली.

सांगलीतील कवलापूरमध्ये एका महिलेचे बाळंतपण घरीच सुरु होते. त्यावेळी गावाकडे फारशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसायची नाही, त्यामुळे गावातल्या एका वयोवृद्ध सुईनीकडूनच बायकांची बाळंतपणं व्हायची. सुईनबाईंनी बाळंतपण अगदी व्यवस्थित केले.

त्या महिलेला एक मुलगा झाला. सुईनबाई त्या महिलेची वार साफ करून उकिरड्यात पुरायला गेल्या. तेव्हा सुईनीला त्या वारेत हालचाल  जाणवली. आणि त्या महिलेच्या दुसऱ्या बाळाचे अस्तित्व उकिरड्यात लक्षात आले. या महिलेची ही राम लक्ष्मणाची जोडी म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत. काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ.

काळू म्हणजे लहू संभाजी खाडे तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे.  

तमाशाची परंपरा असणाऱ्या संभाजी आणि शेवंताबाईं कवलापूरकर या दाम्पत्यापोटी कवलापुर जि.सांगली येथे १६ मे १९३३ रोजी या दोघांचा जन्म झाला. काळू-बाळू सहा वर्षाचे  असताना वडीलांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. पुढे तमाशाचा फड कसा चालवायचा हा पेच निर्माण झाला. तमाशा बंद पडण्याच्या मार्गावर असताना गावातील लोकांच्या मार्गदर्शनामुळे शिवाने तमाशाचा बोर्ड उभा केला.

काळू-बाळू १५-१६ वर्षाचे  असताना वडिलांची अपूर्ण राहिलेली ईच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तमाशा सुरू करायचा असा निश्चय  केला. तमाशा म्हणजे काळू-बाळू असे समीकरण रूढ करून टाकले.

त्यांच्या पोलिस हवालदारांच्या भूमिकांनी रसिकांवर अशी मोहिनी घातली कि काळू-बाळू हीच त्यांची ओळख बनली.

पूर्वी तमाशाचा आत्मा म्हणजे सोंगाड्या सरदार आणि नाच्या. यांच्याशिवाय तमाशा पूर्णच होत नसे. तमाशात काम करणारी माणसं तर मिळाली पण नाच्या आणि नाचे काही मिळेना, तेव्हा बाळूने तमाशात नाचकाम करण्याचा निर्णय घेतला. कागलवाडी येथील शकुंतला या जोगतीणीची मुलगी नायकीण म्हणून मिळाली. शकुंतलेबरोबर काळू-बाळूचा तमाशा उभा राहिला.

सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ फक्कड यांनी लिहिलेला ‘प्रेमाची फाशी’  हा पहिला वग तमाशाच्या बोर्डावर सादर केला. बाबूराव पुणेकरांच्या जहरी प्याला या वगनाट्यातून खरं तर या जगाला त्यांची ओळख झाली. यानंतर राजा हरिश्चंद्र, राम नाही राज्यात आणि सोंगाड्या ही त्यांची वगनाट्य प्रेक्षकांचं अमाप प्रेम घेऊन गेली.

यात्रा आणि जत्रांचे काळू-बाळू हे विशेष आकर्षण असायचे. जहरी प्याला या वगनाट्यावरूनच त्यांना काळू-बाळू असं नाव पडलं.

काळू आणि बाळू जुळे असल्यामुळे अनेक विनोदाचे प्रसंग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडायचे. जसे की, चहा काळू पिऊन जायचे आणि पैसे बाळूला द्यावे लागायचे, तर कधी बाळू दाढी करून जायचे आणि पैसे काळू यांना द्यावे लागायचे.

या दोघांनीही आयुष्यात कधीच त्यांच्या समव्यावसायिकांशी स्पर्धा केली नाही. उलट त्यांना कार्यक्रमासाठी नेहमीच प्रोत्साहित केलं. एवढंच काय तर हॉस्पिटल, शाळा आणि स्मशानभूमी उभारण्यासाठी त्यांनी आपल्या वगनाट्याचे मोफत प्रयोग केले.

जवळजवळ १५ वगनाट्य काळू-बाळू तमाशा मंडळाने सादर केली . त्यात कोर्टात मला नेऊ नका, भाऊ भावाचा खुण कुणाचा, इंदिरा ही काय भानगड, भिल्लाची टोळी, प्रेमाची फाशी’,दगलबाज मित्र, सत्ता द्यावी सुनेच्या हाती, रक्तात रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम 302, तुझ्यासाठी वेडा झालो, शेराला भेटला सवाशेर, जिवंत हाडाचा शैतान, आणि  जहरी प्याला  इत्यादी सामाजिक, राजकीय घडामोंडीवर भाष्य  करणारी वगनाट्य सादर केली.

या जोडीने वगनाट्य प्रकाराला कलाक्षेत्रात एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कलाकारीची दाद म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कला महोत्सव हैदराबाद, आदिवासी लोककला परिषद भोपाळ, अखिल भारतीय नाट्यसंमेलन, कलागौरव पुरस्कार पुणे (२००५), लोकशाहिर भाऊ फक्कड स्मृती पुरस्कार सातारा, कलेचे शिलेदार पुरस्कार सांगली, आणि भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००), यासह तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार, शरद पवार मुख्यमंत्री असताना मिळालेला महाराष्ट्र गौरव पुरस्कार, या सगळ्या पुरस्कारांमुळे त्यांनी सादर केलेल्या कलेला राजमान्यता मिळाली.

वगनाट्य आणि तमाशातील विनोदाच्या माध्यमातून समाजाचं मनोरंजन करणाऱ्या या जोडीनं अनेकांच्या आयुष्यात हास्याचे बीज पेरले. कलाकार म्हणून रंगमंच जरूर त्यांनी गाजवला. त्यांना मानमरातब मिळाला, पण उतारवयात एका कलाकाराला जी प्रतिष्ठा मिळायला हवी, ती मात्र त्यांना मिळाली नाही, याचीच खंत त्यांच्या मनात शेवटपर्यंत राहिली.

काळू म्हणजेच लहू संभाजी खाडे यांचा ९ जुलै २०११ मध्ये तर बाळू म्हणजे अंकुश खाडे २०१४ मध्ये निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.