कल्याणजी-आनंदजींची म्यूझिकल पार्टी म्हणजे त्याकाळचा टॅलेंट हंट रियालिटी शो होता..

हल्ली रियालिटी शोंची विविध चॅनल्सवर अगदी रेलचेल पाहायला मिळते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे या शोंचे शोकिन असतात आणि जो उठतो तो या शोंमध्ये जाण्यासाठी तडफडत असतो. त्याचं कारणही तसंच आहे म्हणा. एकदा का ब्रेक मिळाला की करियरला ब्रेक लागत नसतोय हे हल्लीच्या पोरांना अचूक माहितीये.

प्रत्येक कलाकार आयुष्यात एका योग्य संधीसाठी थांबलेला असतो, आणि ही योग्य संधी प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात येते. कोणी लहान वयातंच कॅमेरा समोर झळकतं तर कोणी वर्षानुवर्षं या संधीपासून वंचित रहातं.

त्यामानाने, फक्त रियालिटी शोच नाही तर सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमुळे सुद्धा हल्ली नाही म्हटलं तरी हे मिळणारं एक्सपोजर वाढलंय असं म्हणायला हरकत नाही. कलाकार एकदाका टीव्हीवर झळकला की जनतेचा होतो.

परंतु पूर्वीच्याकाळी टीव्हीवर मुळात झळकणंच फार दुर्मिळ असायचं. त्याकाळी आत्तासरखे भरमसाट रियालिटी शोही नसत. अर्थात, संधी वाढली की स्पर्धाही वाढतेच त्यामुळे आताची पिढी कष्ट करत नाही अशातला भाग नक्कीच नाही पण त्यावेळच्या कलाकारांचं स्ट्रगल काहीसं वेगळं असे.

परंतु भिडूनो, त्या काळच्या नवोदित कलाकारांसाठी आणि गायक गायिकांसाठी संगीत क्षेत्रातल्या एका जोडगोळीने अनेक संध्या उपलब्ध करून दिल्या, अनेक कलाकारांना पुढे आणलं आणि इंडस्ट्रीत कामंही दिलं.

या जोडीचं नाव म्हणजे, ज्येष्ठ संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी.

या जोडीने आपल्या संगीताच्या आधारावर अख्ख्या सिनेसृष्टीवर अनेक वर्ष राज्य केलं, अनेक चित्रपटांच संगीत केलं. सत्तरच्या दशकात कल्याणजी आनंदजींनी अनेक जबरदस्त गाणी चालबद्ध केली. डॉन, सरस्वतीचंद्र. बैराग, त्रिदेव, कुर्बानी, आणि सफर चित्रपटातील त्यांची गाणी विशेष गाजली.

कल्याणजींनी १९५९ साली सम्राट चंद्रगुप्त ह्या चित्रपटातील `चाहे पास हो` ह्या गाण्याला सर्वप्रथम चाल देऊन आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यावेळी निव्वळ संगीताच्या जोरावर हा चित्रपट गाजला.

पोस्ट बॉक्स ९९९ ह्या दुसऱ्या चित्रपटाला कल्याणजी ह्यांनी संगीत दिलं आणि नंतर त्यांच्या भावाने म्हणजेच आनंदजींनी त्यांची साथ द्यायला सुरुवात केली. सट्टा बाजार, मदारी, छलिया ह्या चित्रपटांतील या दोघांनी संगीतबद्ध केलेली गाणी तुफान गाजली. कल्याणजी आनंदजी यांनी मिळून टोटल २५० चित्रपटांना संगीत दिलं ज्यातल्या १७ चित्रपटांनी गोल्डन जुबली आणि ३९ चित्रपटांनी सिल्वर जुबली केली.

या दोन्ही भावंडांकडे संगीत तर होतंच परंतु सामाजिक बांधिलकी सुद्धा होती. दोघंही अतिशय समाजसेवी वृत्तीचे होते. त्यांनी देश-विदेशांत सामाजिक कार्यासाठी सुद्धा अनेक विनामूल्य कॉन्सर्ट केल्या. त्या दोघांची ही सामाजिक बांधिलकी नवोदित कलाकारांसाठी अधिक विशेष ठरली.

साधारण साठीच्या दशकात कल्याणजी आणि आनंदजींनी स्वतःची म्हणजेच ‘कल्याणजी आनंदजी म्युझिक पार्टी’ नावाची एक पार्टी काढली.

ह्या पार्टीमार्फत देशातल्या विविध खेड्यापड्यांत आणि शहरांमध्ये म्यूजिकल शोज पार पडत असंत.
या शोज मध्ये नवनवीन गायक गायिकांना गाण्याची आणि वादकांना वादनाची संधी उपलब्ध करून दिली जात असे. या पार्टीत कल्याणजी आणि आनंदजींना जर कोणी चांगला कलाकार आढळला तर त्याला ते मुंबईला घेऊन येत असत किंवा मुंबईला येऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन देत असत, मार्गदर्शन करत असत. नुसती आश्वासनं नाही तर खरोखर लागेल तशी मदत करत असत.

त्यामुळे या जोडीने फक्त संगीतंच नाही तर, ‘कल्याणजी आनंदजी म्यूजिकल पार्टी’च्या माध्यमातून सिनेसृष्टीला अनेक नवीन हिरे शोधून दिले.

कल्याणजी आनंदजी यांनी हिंदी सिनेसृष्टीला, अलका याग्निक, उदित नारायण, कुमार सानू, साधना सरगम, सुनिधी चौहान यांसारखे एकसोएक गायक मिळवून दिले. लक्ष्मीकांत प्यारेलाल हे स्वतंत्र संगीतकार म्हणून प्रसिद्ध होण्याच्या आधी कल्याणजी आनंदजी ह्यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम करत होते.

तसंच संगीत लेखनाच्या क्षेत्रांत कमल जलालबादि, आनंद बक्षी, गुलशन बावरा, अंजान, वर्मा मलिक इत्यादींना सुद्धा त्यांनीच मोठे ब्रेक दिले. इतकंच काय जॉनी लिव्हर सारख्या धारावीच्या झोपडपट्टीतल्या कॉमेडी आर्टिस्टला कल्याणजी आनंदजी यांनीच स्टॅन्ड अप कॉमेडीची संधी आपल्या म्युजिक पार्टीमधून दिली.

कल्याणजी आणि आनंदजींसारखी काही रत्न म्हणजे बॉलीवुडला मिळालेली देणगीच होती ह्यात काही शंका नाही.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.