बाबरीची शेवटची वीट पडल्यावरच कल्याणसिंग यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावर सही केली

काल बाबरी प्रकरणातील निकाल देखील लागला. लखनौ कोर्टाने ही मशीद पडण्यामागे कोणताही प्लॅन नव्हता असे सांगत प्रमुख आरोपी असलेल्या लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना निर्दोष सोडलं.

संपूर्ण देशभरात भाजप कार्यकर्त्यांनी हा निकाल ऐकून जल्लोष केला.

गाजियाबादच्या यशोदा रुग्णालयात कोरोनामुळे ऍडमिट असणाऱ्या एका ८८ वर्षांच्या नेत्यानेदेखील टीव्हीवर हा निकाल बघून संपूर्ण दवाखान्यात मिठाई वाटून तिथल्या स्टाफचं तोंड गोड केलं.

बाबरी मशीद पाडण्यामध्ये यांची भूमिका सुद्धा अडवाणी, मुरलीमनोहर जोशी यांच्या इतकीच महत्वाची होते.

ते आहेत कल्याणसिंग.

आज भाजपवालेदेखील ज्यांना विसरून गेले आहेत असे रामजन्मभूमी आंदोलनाचे हिरो उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह

उत्तरप्रदेशच्या अलिगढ मध्ये जन्मलेले कल्याणसिंह हे जनसंघच्या काळापासूनचे भाजपचे जुने शिलेदार.

जेव्हा अडवाणी यांच्या रथ यात्रेने संपूर्ण देश खळबळून उठला तेव्हा रामजन्मभूमी उत्तरप्रदेश मध्ये सरकार होतं मुलायमसिंग यांचं. रथयात्रा रोखण्याची सिंहगर्जना करणाऱ्या मुलायम यांनी कारसेवकांवर गोळीबार केला.

मुलायमसिंग यांच्याशी सामना करण्यासाठी भाजपने कल्याणसिंग यांना पुढे केलं. कल्याणसिंग आपल्या तिखट वक्तृत्वासाठी फेमस होते. अटलजींच्या खालोखाल त्यांची भाषणे फेमस होती.

त्यांनी उत्तरप्रदेशमध्ये मुलायम यांच्या विरुद्ध धुरळा उडवून दिला. पुढच्या एका वर्षातच भाजपला युपीमध्ये सत्तेत आणायचं काम कल्याणसिंग यांनी केलं.

जून १९९१ साली कल्याणसिंग यूपीचे मुख्यमंत्री बनले.

या विशाल राज्याचे ते पहिले भाजप मुख्यमंत्री. कल्याणसिंग यांनी जनतेची नस बरोबर ओळखली होती. अस म्हणतात की

मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राम मंदिर उभारण्याची शपथ घेऊन टाकली होती.

त्यांच्या काळात विश्वहिंदूपरिषदेच्या लोकांनी बाबरी मशिदीच्या विवादित जागेत १० फूट जाडीचे सिमेंट काँक्रीट फाउंडेशन उभा केले. हा राममंदिराचा पाया समजन्यात आला. पण कल्याणसिंग यांनी हे भजन कीर्तन करण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे असे सांगून त्या घटनेला पाठीशी घातलं.

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागी कारसेवा होणार होती.

त्यापूर्वी कल्याणसिंग यांनी सुप्रीम कोर्टात अॅफिडेव्हीट लिहून दिलं की

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत बाबरी मशिदीला काहीही होऊ देणार नाही.

उत्तरप्रदेशचे तेव्हाचे मुख्य सचिव योगेंद्र नारायण यांनी कल्याणसिंग यांचा त्या दिवशीचा दिनक्रम एकेठिकाणी लिहून ठेवला आहे.

सकाळपासून करसेवक जथ्याने बाबरीमशिदीच्या दिशेने निघाले होते. त्यादिवशी मुख्यमंत्री कल्याणसिंग आपल्या ऑफिसमध्ये लालजी टंडन आणि ओमप्रकाश यांच्या सोबत दुपारचे लंच करत होते. समोर टीव्ही सुरू होता.

थोड्याच वेळात टीव्हीवर दिसलं की काही कारसेवक बाबरी मशिदीच्या घुमटावर चढले आहेत. पहिली कुदळ चालवली गेली आणि उत्तरप्रदेशचे डिजिपी एस.एम.त्रिपाठी अगदी धावत पळत मुख्यमंत्री निवासमध्ये आले.

डिजिपीनी त्यांना तातडीने भेट मागितली पण त्यांना मुख्यमंत्र्यांनी जेवण होई पर्यंत वाट बघण्यास सांगण्यात आले.

जेवण झाल्यावर कल्याणसिंग यांनी पोलिसप्रमुखांना बोलावून घेतले.

सुप्रीम कोर्टाला बाबरी मशिदीचे रक्षण करण्याचे वचन दिलेले कल्याणसिंग यांच्या चेहऱ्यावर तणाव तर होताच पण तिथे कोणतीही गडबड दिसत नव्हती. डिजिपी यांनी त्यांच्याजवळ बाबरी मशिदीला वाचवण्यासाठी पोलिसांना फायरिंग अनुमती द्या अशी मागणी केली.

तेव्हा कल्याणसिंग म्हणाले,

फायरिंग में कितने लोग मरेंगे?

डिजिपीनी सांगितलं की प्रचंड गर्दी आहे कित्येक कारसेवक मरु शकतात. तेव्हा झटक्यात कल्याणसिंग म्हणाले,

आंसू गैस या लाठीचार्ज जैसे उपाय कर सकते हैं. लेकिन मैं फायरिंग की अनुमति नहीं दूंगा. लाइये, यह बात मैं कागज पर भी लिखकर दे दूं कि आपने गोली चलाने की अनुमति मांगी लेकिन मैंने नहीं दी.

मुख्यमंत्र्यांचा आदेश घेऊन डिजीपी परत गेले. कल्याणसिंग दिवसभर टीव्हीवर बाबरी मशीद पतनाची घटना पाहत राहिले.

जेव्हा बाबरी मशिदीची शेवटची वीट पडली तेव्हा त्यांनी आपल्या पीए कडे रायटिंग पॅड मागवला व तिथेच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा लिहून दिला. त्यावेळी ते म्हणाले,

ये सरकार राम मंदिर के नाम पर बनी थी और उसका मकसद पूरा हुआ. ऐसे में सरकार राममंदिर के नाम पर कुर्बान.

कल्याणसिंग बाबरी मशिद वाचवून आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची वाचवू शकले असते मात्र कारसेवकांचे रक्त सांडू नये म्हणून त्यांनी खुर्चीवर लाथ मारली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.