जिथं मीनाकुमारीने स्वतःला दारूत संपवल तो कमालीस्तान स्टुडियो प्रीती झिंटाला मिळणार होता.

खरं नाव सय्यद अमीर हैदर नक्वी. मुळचा उत्तर प्रदेशच्या अमरोही गावचा. घरची परिस्थिती उत्तम. हा सर्वात शेंडेफळ. दिसायला देखणा. पण घरच्यांशी भांडून लाहोरला आलेला.

काही तरी करून दाखवल्याशिवाय गावात परत पाऊल टाकणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती.

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. लाहोर मध्ये एक छोटी फिल्मइंडस्ट्री होती. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सय्यदला लिखाणाची आवड होती. त्याने लाहोरमध्ये बनणाऱ्या सिनेमासाठी लेखन करून द्यायला सुरवात करून दिली. यातूनच त्याची ओळख सुपरस्टार गायक कुंदनलाल सैगल यांच्याशी करून दिली. त्यांनी त्याला मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न करायचा सल्ला दिला. सोहराब मोदींची अपॉइन्टमेंट घेऊन दिली.

मिनर्व्हा सिनेटोनच्या ऑफिसमध्ये घुसणाऱ्या अस्ताव्यस्त कपड्यातल्या सतरा अठरा वर्षाच्या सय्यदला तिथल्या वॉचमनने अडवल. जेव्हा त्यानं आपण लेखक असल्याचं सांगितल तेव्हा तो वॉचमन हसू लागला आणि म्हणाला,

“लगते तो नही.”

सय्यद म्हणाला,

“मै लगने की नही सुनने की चीझ हुं.”

वॉचमन थक्क झाला. त्याने त्याला आत सोडलं. आत मिनर्व्हाचे मालक निर्माते दिग्दर्शक सोहराब मोदी बसले होते. त्यांनीही या कोवळ्या लेखका कडे बघून आश्चर्याने म्हटल, “लगते नही हो.”

सय्यद त्यांना देखील ठामपणे म्हणाला,”सहाब मै लगने की नही सुनने की चीझ हुं”

मोदी म्हणाले तो फिर सुनाओ कुछ. पण आता आली पंचाईत. गडबडीमध्ये सय्यद आपल्या फायलीमध्ये फक्त कोरी पानेच घेऊन आला होता. पण आत्मविश्वास इतका की त्याने त्या कोऱ्या पानाकडे पाहून कथा सांगायला सुरुवात केली.

काही वेळ गेल्यावर अचानक सोहराब मोदींनी त्याला थांबवलं. आणि तिथून उठून निघून गेले. सय्यदला काही कळेना, काय झालं ते. काही क्षणानंतर त्याला टाईपरायटरचा आवाज ऐकू आला. सोहराबजी परत आले ते चेक घेऊनच. ते वारंवार फक्त एकच गोष्ट म्हणत होते,

‘‘तुम कमाल की चीज हो. मी आजवर इतक्या कथा ऐकल्या; पण आज मला तुझं ऐकताना अक्षरश: चित्रपट पाहिल्यासारखं वाटलं. तुम कमाल की चीज हो। “

मोदींनी सय्यदला तीन हजार रुपयाचा चेक देऊन दोन चित्रपटाच लेखन करण्याचा करार केला होता.

त्यानी त्याला अनेक वेळा कमाल कमाल अस म्हंटल यावरून सय्यदने स्वतःच चित्रपटातील लिखाणाच टोपण नाव कमाल अस ठेवल आणि आडनाव गावावरून आमरोही केलं.

कमाल आमरोहीची शपथ पूर्ण झाली होती. त्याच्या गावाला त्याच्या नावाने ओळखल जाऊ लागल होतं.

जगप्रसिद्ध मुघल ए आझम या सिनेमाचे डायलॉग कमाल अमरोहीनीच लिहिले होते. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर मिळालं होतं. त्याने मिनर्व्हा साठी अनेक सिनेमे लिहिले. पुढे स्वतः दिग्दर्शनात उतरला. पहिलाच सिनेमा होता महल. याच सिनेमामुळं मधुबाला, लता मंगेशकर यांना स्टारडम मिळवून दिलं.

पुढच्या काही वर्षात कमाल अमरोही  हे फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात मोठ नाव बनलं. 

त्यांनी महल फिल्म्स नावाची प्रोडक्शन कंपनी सुरु केली. एवढच नाही तर १९५८ साली मुंबईच्या जोगेश्वरी येथे कामालिस्तान नावाचा प्रचंड मोठा स्टुडीओ उभा केला. हा त्या काळाचा सर्वात आधुनिक स्टुडीओ होता. हिंदी सिनेमातील रेल्वेस्टेशनवरील सगळे सीन इथेच चित्रित झाले आहेत.

याच काळात त्यांच्या आयुष्यात एका स्वप्नसुंदरीच आगमन झाल होतं. मीनाकुमारी तीच नावं.

या दोघांनी गुप्तपणे लग्न देखील केलं होतं. दोघ एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे.एकत्र राहायचे. दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न म्हणजे पाकीजा हा सिनेमा. दुर्दैवाने हा सिनेमा बनण्यासाठी तेरा वर्षे लागली. या दरम्यानच्या काळात दोघांच्याही आयुष्यात अनेक चढउतार आले.

दोघेही हळूहळू एकमेकांपासून दूर गेले. अमरोहीच्या आठवणीत मीनाकुमारीने स्वतःला दारूमध्ये बुडवलं.

कमाल अमरोही यांनी आपलं आयुष्य ओतून बनवलेला पाकीझा रिलीज झाल्या झाल्या मोठा फ्लॉप ठरला. हे दुःख कमी की काय काहीच दिवसात मिनाकुमारींच आजारपणातून निधन झालं. पाकीजा सिनेमाच्या निर्मात्यामध्ये कुलवंतसिंह नावाचे एक प्रोड्युसर होते. ते एके ठिकाणी आपल्या आठवणी मध्ये सांगतात.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या आठवडय़ात मीनाजींचं निधन झालं. ‘मराठा मंदिर’मधला दुसरा खेळ आम्ही मध्येच थांबवला आणि त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं. त्या दिवशीचे खेळ आम्ही रद्द केले आणि रसिकांनी पैसे घेऊन जावे असंही सांगितलं. परंतु कोणीही पैसे परत मागितले नाहीत.

दुसऱ्या दिवसापासून मात्र हा चित्रपट धो-धो चालू लागला. काही दिवसांनी कमालजी म्हणाले,

 ‘‘मीना पाक रूह थी। कुलवंत, तुझ्यावर तिचा जीव होता. तिनं तिला आवडणाऱ्या माणसाचं कधीही नुकसान केलं नाही. मग तुझं कसं नुकसान होऊ देईल ती? बघ, स्वर्गातूनही ती तुझ्यावर मायेचा वर्षांव करतेय!’’

१९८३ साली रिलीज झालेला रझिया सुलतान हा कमाल अमरोही यांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमाने अपेक्षित यश मिळवल नाही. त्याच्या निर्मितीमध्ये देखील सात वर्षे वाया गेली. पुढे त्यांनी कमालीस्तान स्टुडीओच्या व्यवस्थापनातच लक्ष घातल.

पाकीझा, रझिया सुलतान या कमाल अमरोहींच्या सिनेमाबरोबरच अमर अकबर अॅन्थनी, कालिया, खलनायक, कोयला इतकच काय काही वर्षापूर्वी आलेला दबंग २ या सिनेमाच ही शुटींग तिथच झाल आहे.

कमाल अमरोहीच्या मृत्यूनंतर हा स्टुडियो त्यांच्या मुलांनी सांभाळला. 

काही वर्षांपूर्वी मात्र या स्टुडियोवरून एक विचित्र वाद समोर आला होता. झाल अस होतं की सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हीला कमाल अमरोही यांच्या मुलाने दत्तक घेतलं आहे आणि तिच्या नावे कामालीस्तान स्टुडियो केला आहे अशी चर्चा मिडियामध्ये सुरु झाली. यावरून वाद सुरु झाले. शानदार अमरोही याचं आणि प्रीतीच नात काय याबद्दल विषय चवीने चघळला गेला.

शानदार आमरोही तर सरळ म्हणायचे की

“प्रीतीशी माझी मुलगीच आहे आणि माझ्या नंतर स्टुडियोची जबाबदारी माझ्या मुलीने उचलणे यात गैर काय आहे? “

अखेर अनेक कोर्टकचेर्या सुरु झाल्यावर प्रीती झिंटाने स्पष्ट केल की तिला कोणीही दत्तक घेतलेलं नाही, किंवा कामालीस्तानची कोणीतीही प्रोपर्टी तिच्या नावे केली गेलेली नाही. शानदार आमरोही यांच्याबद्दल तिच्या मनात आदर आहे आणि ते देखील तिला मुली प्रमाणे प्रेम करतात, मात्र त्यांच्या भावासोबतच्या वादात पैशांची मदत सोडून तिचा काही त्यांच्याशी काही संबंध नाही.

यानंतर या वादावर पडदा पडला गेला. 

मागच्याच वर्षी अमरोही कुटुंबीयांनी कमालीस्तानला काही बिल्डर्स ना विकून टाकले आहे. हिंदी सिनेमाच्या सुवर्णक्षणाची आठवण सांगणाऱ्या स्टुडीओ पैकी हा शेवटचा. जिथे एकेकाळी मीनाकुमारी-कमाल अमरोही यांचा पाकीजा घडला तिथे आता रेसिडेन्शियल सोसायटी उभ्या राहतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.