दीड वर्ष क्राईम पेट्रोल बघून मगच बायकोचा खून केला, पण गडी दीड महिन्यातच घावला…

आपलं शहर सोडून तो डेहराडूनमध्ये आला. तिथं डीजे म्हणून काम करू लागला, काम करतानाच त्याला एक मुलगी भेटली. दिसायला अतिशय सुंदर, तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसायही होता. दोघं काही वर्ष एकत्र राहिले, एकमेकांचे विचार जुळतायत म्हणून लग्नही केलं. रोज कामासाठी एकत्र जायचे, एकत्र यायचे. सगळी अगदी गोष्टीच्या पुस्तकातली वाटावी अशी गोष्ट होती. मुलीचं नाव कामना आणि मुलाचं अशोक.

मग एक दिवस बातमी आली की, कामना आणि अशोकवर गोळीबार झाला. या गोळीबारात कामनाचा मृत्यू झाला, तर अशोकच्या पोटाला गोळी चाटून घेतली.

बातमी पोलिसांकडे गेली, त्यांनी तपासाला सुरुवात केली. फारसा अडथळा येणार नाही, असा पोलिसांचा अंदाज होता. कारण बायकोवर गोळीबार होताना तिचा नवराच तिथं उपस्थित होता, त्यामुळं संशयाची सुई कोणावर फिरवायची हे अशोकच्या जबाबातून स्पष्ट होणार होतं.

चौकशी दरम्यान अशोकनं आपल्या आत्याचा मुलगा अजय वर्मा यानंच कामना आणि आपल्यावर हल्ला केला असल्याचं पोलिसांना सांगितलं.

अशोकनं पोलिसांना दिलेली माहिती काहीशी अशी होती,

२०१४ मध्ये अशोक आणि कामनानं लग्न केलं. त्या दोघांचा संसार सुरू होता. त्याच दरम्यान २०१५ मध्ये अजय वर्मा त्याच्याकडे आसरा मागायला आला. झालेलं असं की, अजय व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यामुळं त्याला घरातून हाकलून देण्यात आलेलं. नशेच्या अंमलाखाली त्यानं एकाचा खून केला आणि त्याबदल्यात त्याला जेलची हवा खावी लागली. जामिनावर सुटल्यानंतर अजयला स्वतःच्या घरात घेण्यात आलं नाही.

त्यामुळं त्यानं डेहराडूनमधलं आपल्या भावाचं म्हणजेच अशोकचं घर गाठलं. अशोकनं अजयला आपल्या घरात रहायला जागा दिली. त्याला राजस्थानमध्ये नोकरी लाऊन दिली, त्यानंतरही अजयचं त्याच्या घरी येणं जाणं सुरू होतं. पण त्याच्या घरी येण्यानं कामना नाराज व्हायची, याचा अजयला राग यायचा.

याचाच बदल म्हणून त्यानं आपल्या दोन मित्रांसकट येऊन कामनावर गोळ्या झाडल्या, अशोकनं विरोध केला तेव्हा त्याच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्या.

पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आणि त्यांनी थेट अजयचं घर गाठलं

तेव्हा चौकशीत त्याच्या आई वडिलांनी सांगितलं की, आधी अजय घरी यायचा मात्र गेल्या वर्षभरापासून अजयनं घरी येणं बंद केलंय. आता आमचा त्याच्याशी काहीच संपर्क नाही. पोलिसांनी ही गोष्ट आधीही बऱ्याच गुन्हेगारांच्या आई-वडिलांकडून ऐकली होती, त्यामुळं त्यांनी यावर विश्वास ठेवला नाही.

त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे, आपल्या खबऱ्यांकडे चौकशी केली, मात्र त्यांनीही हीच माहिती दिली. घराकडं फिरकत नसल्यानं अजयचा शोध घ्यायचा कुठं हा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्याचं मोबाईल रेकॉर्ड चेक केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, मोबाईलही वर्षभरापासून बंदच आहे.

आता आरोपीचा शोध घेण्याची दिशा बदलणं पोलिसांना भाग होतं

त्यांनी रडार फिरवला अशोककडे. कारण तो सांगत होता की, अजय आणि त्याच्या दोन मित्रांनी आमच्यावर हल्ला केला. मग या हल्ल्यात अशोक सहीसलामत कसा राहिला ? हा प्रश्न होताच. पोलिसांनी त्याचे कॉल रेकॉर्ड चेक करायला घेतले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, अजय आणि त्याच्यात कित्येक महिन्यांपासून बोलणं झालं नव्हतं. पण दोन नंबर असे होते, ज्यांना तो वारंवार फोन करायचा.

हे दोघं कोण होते ?

या दोघांची नावं होती दीपक आणि गौरव. अशोकनं चौकशीत सांगितलं की, हे दोघं माझे जवळचे मित्र आहेत, त्यामुळं कायम संपर्कात असायचे. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली, तेव्हा या दोघांनीही हेच उत्तर दिलं.

पोलिसांनी पुन्हा कॉल रेकॉर्ड चेक केले, तेव्हा त्यांचा संशय बळावला. कारण एकमेकांचे खास मित्र असूनही, या दोघांनी कामना आणि अशोकवर झालेल्या गोळीबारानंतर अशोकला फोन केला नाही आणि भेटायलाही आले नाहीत.

त्यापेक्षा मोठा धक्का हा होता की, ज्यादिवशी कामनाचा खून झाला त्यादिवशी मात्र यांच्यात आणि अशोकमध्ये बोलणं झालं होतं.

पोलिसी हिसका दाखवल्यावर मात्र, या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली

कामनाला अजयनं नाही, तर स्वतः अशोकनंच मारलं होतं आणि आपल्यावर संशय येऊ नये म्हणून मित्रांकडून स्वतःवर गोळ्याही झाडून घेतल्या होत्या. झालं असं होतं की, अशोक आणि कामनाच्या लग्नाची पहिली काही वर्ष सुखात गेली. त्यानंतर कामनाचं कुणाशीतरी अफेअर असल्याचा संशय अशोकला आला.

हा संशय त्याच्या डोक्यात इतका भिनला की त्यानं थेट बायकोचा खून करायचंच ठरवलं. पण ही गोष्ट इतकी सहज होणारी नव्हती. प्लॅनिंग करण्यासाठी त्यानं क्राईम सिरियल्स बघण्याचा झपाटा लावला.

त्यातून त्याला एक स्कीम कळाली की, मेलेल्या माणसावरच खुनाचा आरोप टाकला की पोलिसांना शोधणं अवघड जाईल, त्यात तो माणूस आधीच क्रिमिनल रेकॉर्ड असलेला असेल, तर आपण सहीसलामत सुटूही.

अजयच्या नावावर आधीच खुनाची नोंद होती, त्यामुळं त्यानं त्याचा वापर करायचा ठरवलं. अशोकनं अजयला आपल्या घरी ठेऊन घेतलं, त्याचा विश्वास मिळवला. मग त्याला राजस्थानमध्ये जॉबला लावण्याचं आमिष दाखवलं. एक दिवस त्याला भरपूर दारू पाजून, गाडीनं राजस्थानला नेलं आणि गळा दाबून त्याचा खून केला.

अजयचा मृतदेह पोलिसांना सापडला मात्र त्याची ओळख न पटल्यानं, पोलिसांनी तपास थांबवला. बरं हे सगळं घडलं २०१८ मध्ये. त्यानंतरचे १० महिने अशोकनं कोणतीच हालचाल केली नाही. मग अजय लोकांच्या विस्मृतीतून गेल्यावर त्यानं कामनाचा खून घडवून आणला आणि आरोप ढकलला अजयवर.

तब्बल दीड वर्ष प्लॅनिंग केल्यानंतर, सिरियल्स बघितल्यानंतर आणि स्वतःच्याच आत्तेभावाचा खून घडवून तो पचवल्यानंतरही अशोक पोलिसांना सापडलाच. तो स्वतःला कितीही हुशार समजत असला, तरी पोलिस त्याच्यापेक्षा हुशार ठरले आणि कॉल रेकॉर्डच्या जोरावर त्यांनी आरोपींचा शोध लावलाच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.