कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी असणाऱ्या गंगुबाईने थेट नेहरूंना प्रपोज केलेलं..
संजय लीला भन्सालीचा नवा सिनेमा येतोय. “गंगुबाई” आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असणाऱ्या या सिनेमाचा टिझर काल लॉन्च करण्यात आला. ३० जुलै रोजी हा पिक्चर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
पण महत्वाची गोष्ट म्हणजे गंगुबाई नावाचं हे सिनेमातलं कॅरेक्टर खरच वास्तव जगात होतं का? ही खरी गोष्ट आहे का?
तर भिडूंनो हो. मुंबईचा कामाठीपूरा म्हणजे रेड लाईट एरिया. या कामाठीपुऱ्याबद्दलच्या असंख्य गोष्टी चवीने आजही चघळल्या जातात. काही खऱ्या असतात तर काही खोट्या. पण इथल्या देहविक्रीच्या जगात एक गोष्ट म्हणजे शाश्वत आहे, ती म्हणजे प्रत्येक स्त्री च्या घरात असणारा गंगुबाईचा फोटो.
गंगुबाई ही कामाठीपुऱ्याची सम्राज्ञी होती. २०२० सालात देखील प्रत्येक घरात तिचा फोटो पुजला जातो. इतकच काय तर कामाठीपुऱ्याच्या एका कोपऱ्यात तिचा पुतळा देखील आहे. लोक त्या पुतळ्याची पूजा करतात.
कामाठीपुऱ्यात आजही अस्तित्व टिकवून ठेवणारी “गंगुबाई” कोण होती?
तिचं नाव गंगूबाई. सोनेरी काठाची पांढरीशुभ्र साडी. सोन्याची बटणं असणारा ब्लॉऊज. अंगाखांद्यावर सोन्याचे दागिने. तेही इतके की तिचा एक दात सोन्याचा होता. तिच्याकडे त्या काळात बेंटली कार होती. प्रचंड धनदौलत असणारी ती,
“कामाठिपुऱ्याची सम्राज्ञी होती”.
गुजरातमध्या काठियावाड मध्ये गंगा हरजीवनदास काठियावाडीचा जन्म झाला होता. ऐन तारुण्यात मुंबईला जायचं. सिनेमात काम करायचं अस स्वप्न तिनं पाहिलं होतं. त्याच वेळी त्यांच्या वडिलांकडे काम करणाऱ्या रमणिकलाल सोबत तिचे प्रेमसंबध सुरू झाले.
रमणिकलाल म्हणाला,
“ आपण लग्न करु मुंबईला जावू.”
ती पुढचा मागचा विचार न करता मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर रमणिकलालने तिची एका कुंटणखान्यात विक्री केली. आजवर हजारों मुलींसोबत होणारी फसवणुक गंगाच्या देखील आयुष्यात आली.
प्रतिष्ठीत घरातून आलेल्या गंगाने परितीचे दोर कापले. ती कामाठीपुऱ्यातच वेश्याव्यवसाय करु लागली.
मुंबईवर त्या काळात पठाण गॅंगची दहशत होती. करिम लाला या पठाण गॅंगचा अनभिषिक्त सम्राट होता. करिम लालाच्या गॅगंमधला एक पठाण गंगाकडे यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. हे अत्याचार अमानवीय होते. पण पठाण गॅंगच्या विरोधात कोण जाणार म्हणून सर्वजण शांत बसायचे.
एक दिवस पुन्हा तो पठाण गंगाकडे आला. त्यानं तिच्यावर इतके अत्याचार केली की गंगाला दहा दिवस हॉस्पीटलमध्ये ॲडमीट करावं लागलं.
त्या पठाणचा एकदाच काय तो निकाल लावायचा म्हणून तिनं बाहेर पडताच तडक करिम लालाचं घर गाठलं. करिम लाला घराजवळच्या रस्त्यावरच होता. तिनं करिम लालाची वाट अडवली. एक वेश्या आपली वाट अडवते म्हणल्यावर करिम लाला देखील चमकला. करिम लालाने तिला घरात येवून बोलायला सांगितल.
ती करिम लालाच्या घरात गेली. करिमला म्हणाली, एक पठाण माझ्यावर अत्याचार करतोय तुमच्या टोळीतला एक माणूस असा अन्याय करतोय आणि तुमचं त्याला पाठबळ आहे. त्याला संपवा मी आयुष्यभर तुमची रखेल बनून राहिल.
करीम लाला डॉन असला तरी चांगला माणूस होता. तो संतापला. म्हणाला,
“माझी बायको आहे पोरं आहेत”
आयुष्यभर पुरषांच रानटी रुप बघितलेली ती बावरली. लगेच करिमलाला तिनं भाऊ मानलं.
करिम लालानं तिला शब्द दिला,
“आजपासून तुझ्यावर कोणीच अत्याचार करणार नाही.तू करिम लालाची बहिण आहेस.”
पुढच्या वेळेस ठरल्याप्रमाणं पठाण तिच्या खोलीवर आला. पठाणने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरवात केली. ठरल्याप्रमाणं करिम लाला ला निरोप पोहचला. करिम लाला लागलीच दोन चार पठाणांना घेवून गंगाच्या खोलीवर गेला. त्या पठाणाला करिम लालाने चांगलाच मारला.
करिम लाला बाहेर आला, आणि जोरात ओरडला,
“गंगा माझी बहिण आहे तिच्यावर कोणी अत्याचार केला तर खबरदार”.
त्या दिवसापासून गंगाचे दिवस पालटले. गंगाकडे सर्व कामाठीपुऱ्यातल्या बायका त्यांचे प्रश्न घेवून येवू लागल्या. गंगा देखील त्या दूर करु लागली.
एक दिवस, गंगाने आझाद मैदानावरुन भाषण केलं. कुठल्यातरी मोठ्या सभेत तिला “घरवाली” बायकांच्या समस्या मांडण्यासाठी बोलवलं होतं. ती त्या सभेत म्हणाली,
“मी एक घरवाली आहे, घर तोडण्याच काम मी करत नाही. तुमच्यापैकी अनेकांना वेश्या म्हणजे स्त्रीजातीला कलंक आहे अस वाटतं, पण आम्हा वेश्यामुळेच हजारो स्त्रीयांच पावित्र अबाधित राहतं”
गंगाची आत्ता गंगूबाई झाली होती. तिचं भाषण दूसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापलं गेलं. लोक तिच्याकडे आदराने पाहू लागले. आत्ता ती कामाठिपुऱ्याची सम्राज्ञी झाली होती.
नेहरूसोबतच भेट आणि नेहरूंना प्रपोज…
१९६० चा सुमाराची ही गोष्ट.
कामाठिपुरातल्या वेश्यावस्तीजवळ असणाऱ्या शाळेचा प्रश्न चिघळला होता. जवळच शाळा असल्यानं लहान मुलांवर वाईट संस्कार होतात म्हणून वेश्यावस्तीचं स्थलांतर करावं म्हणून आंदोलन करण्यात येवू लागलं. याच आंदोलनान जोर पकडला व तो मुद्दा राजकारणाचा होवून बसला.
गंगूबाईने कोणत्याही परिस्थितीत वेश्यावस्ती स्थलांतर होणार नाही अशी भूमिका घेतली. याच प्रकरणातून तिला नेहरुना भेटण्याची संधी मिळाली.
नेहरुसोबतच्या भेटीचा हा किस्सा आजही अनेक पत्रकारांकडून सांगितला जातो. तिने नेहरूसमोर आग्रहाने वेश्यावस्ती स्थलांतर न करण्याबाबत भूमिका माडंली.
तिची समज पाहून नेहरू तिला म्हणाले,
“ तू इतकी हूशार आहेस. तूला चांगला नवरा किंवा नोकरी मिळाली असती. अस असतानाही तू हा व्यवसाय करतेस. यातून बाहेर पड लग्न कर”
यावर गंगूबाईने नेहरूपुढे प्रस्ताव ठेवला. ती म्हणाली,
“तुम्ही मला मिसेस नेहरू बनवायला तयार असाल तर मी हा धंदा सोडून द्यायला तयार आहे”.
तिचे हे बोल ऐकून नेहरूनी रागातच तिची कानउघाडणी करण्यास सुरवात केली तेव्हा ती नेहरुंना थांबवत म्हणाली, “उपदेश करणं सोप्प आहे पण आचरणात आणणं अवघड आहे” हेच तुम्हाला दाखवून द्यायचं होतं.
गंगूबाई पुढे हजारों महिलांचा आवाज बनली होती. काळाच्या ओघात वृद्धापकाळानं तिचं निधन झालं. त्यानंतर जवळजवळ प्रत्येक घरात तिचे फोटो लावण्यात आले. तिचा छोटासा अर्धपुतळा देखील बांधण्यात आला.
हे ही वाचा –
- गोष्ट, वाजपेयी आणि नेहरूंच्या नात्याची !
- नेहरूंच्याही आधी सरदार पटेलांनी फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला होता..?
- दुर्गा जिने नेहरूंना प्रवेश नाकारला होता!!!