भारताच्या सिनेमा इतिहासात पहिली अभिनेत्री हि मराठी होती…

आता या घडीला बॉलिवूड म्हणा किंवा साऊथ म्हणा किती अभिनेत्र्या आपण बघितल्या. म्हणजे भारतात हिरोईनची कमी होती कि काय आपल्या सलमान भाईने विदेशातून हिरोईन आणून त्यांना भारतात लाँच केलं. अनेक मातब्बर अभिनेत्र्या जुन्या काळात होऊन गेल्या आताही आहेतच. पण इतक्या मोठ्या चित्रपट सृष्टीत पहिली हिरोईन हि मराठी होती.

भारताच्या सिनेमा इतिहासातली पहिली अभिनेत्री म्हणजे कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई रघुनाथ गोखले या आहेत.

आज आपण चित्रपटांमध्ये जास्तीत जास्त स्त्री हि मध्यवर्ती भूमिकेत बघतोय, पुरुषप्रधान चित्रपटांचं वलय मोडीत काढत सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्र्यांनी आपले स्थान अजूनच भक्कम केले आहे. पण याची सुरवात महाराष्ट्रातून झाली होती. कमलाबाई कामत यांनी याचा पाया घातला. आज त्यांचा हा आगळावेगळा जीवनप्रवास जाणून घेऊ .

स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळात नाटक, चित्रपट यामध्ये स्त्रीचा संबंध काहीही नसायचा. उलट स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हे कमीपणाचं लक्षण मानलं जायचं आणि स्त्रियांना या क्षेत्रात जाण्यापासून अडवलं जायचं. भारतात चित्रपट यायच्या अगोदर संगीत नाटकांची गाडी जोरात होती. मनोरंजनाचं सर्वोत्तम साधन म्हणून नाटकाला मोठी मागणी होती.

संगीत नाटकांमध्ये स्त्री पात्रं उभं करताना मोठ्या अडचणी यायच्या, स्त्रियांची उणीव नाटकात भासू द्यायची नसल्याने पुरुष मंडळीच स्त्रियांच्या भूमिका साकारायचे. १९१३ साली चित्रपट युगाचा जन्म झाला होता. चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी या युगाची सुरवात मोठ्या दणक्यात केली. राजा हरिश्चंद्र हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता.

दादासाहेब फाळके यांनी मूकपट आणि बोलपट या दोन्ही प्रकारांवर काम करायचं ठरवलं. दादासाहेबांनी एक अट घातली कि आपल्या सिनेमामध्ये स्त्रीची भूमिका हि स्त्रीच करणार इतर कोणीही नाही. त्यावेळी त्यांना कमला कामत या लहानग्या मुलीचं नाव सुचवलं.

मोहिनी भस्मासुर या मूकपटात मोहिनी म्हणून दादासाहेब फाळकेंनी कमला कामत याना निवडलं. या निवडीने त्या क्षणी भारतातील पहिली अभिनेत्री म्हणून त्यांचं नाव इतिहासात कोरल गेलं.

या चित्रपटातील कामाने कमला कामत यांची प्रचंड तारीफ झाली. सगळीडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणूनही त्यांचा गौरव झाला. पण सुरवातीच्या काळात त्यांचं जीवन हे संघर्षाने भरलेलं होतं.

६ सप्टेंबर १९०१ रोजी कमलाबाई कामत यांचा जन्म झाला. कमलाबाईंचे वडील हे कीर्तनकार आणि प्राध्यापक होते. त्यांच्या आई दुर्गाबाई कामत या सतार वाजवायच्या. घरात कलाप्रेमी वातावरण असल्यामुळे साहजिकच त्यांना याची गोडी लागत गेली. घरच्या परिस्थितीमुळे ते जत्रा यात्रांमध्ये काम करू लागल्या. याच माध्यमातून कमलाबाईंनी संवाद, संगीत आणि अभिनय शिकण्याचा प्रयत्न केला.

पुढे अगदी कमी वयातच त्यांचं लग्न रघुनाथराव गोखले यांच्याशी झालं. रघुनाथराव यांची स्वतःची नाटक कंपनी होती आणि तालेवार घराण्यातून ते आले होते. २० व्या शतकाच्या सुरवातीला चित्रपटांचा काळ सुरु झाला मात्र तोवर नाटक तेजीतच चालत असे. संगीत नाटकांसाठी प्रसिद्ध असलेली किर्लोस्कर कंपनी बंद पडली आणि कमलाबाईंचे पती रघुनाथराव यांनी चित्ताकर्षक नावाची नाटक कंपनी सुरु केली.

गद्य नाटकांमधूनही कमलाबाईंनी अनेक भूमिका साकारल्या. पुढे मात्र त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. वयाच्या २५ व्या वर्षी रघुनाथराव गोखले यांचे निधन झाले. कमलाबाईंना तीन अपत्ये होती लालजी, चंद्रकांत आणि सूर्यकांत. या बिकट परिस्थितीत कमलाबाई वेगवेगळ्या नाटक कंपन्यांकडून नाटकात काम करू लागल्या आणि नेटाने संसार करू लागल्या.

चित्रपटांमध्ये काम करताना त्यांनी आजवर चालत आलेल्या परंपरेच्या प्रवाहाविरुद्ध काम केलं. पुरुषांच्या भूमिकासुद्धा त्या त्याच ताकदीने करू लागल्या. हे त्याकाळी धाडसाचं मानलं जाणार काम त्यांनी केलं. त्यांच्या भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.

कमलाबाईंनी प्रबोधनकार ठाकरे, विश्राम बेडेकर, मामा वरेरकर अशा दिग्ग्ज लेखकांच्या नाटकात भूमिका केल्या. २०० हुन अधिक नाटकं, मूकपट आणि ३५ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. इतक्या प्रदीर्घ काळात त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं.

४० वर्ष त्यांनी चित्रपट सृष्टीची सेवा केली. या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना वयाच्या ७० व्या वर्षी दिलीप कुमारांच्या हस्ते गौरविण्यात आले. आजच्या घडीचे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या त्या आजी आहेत. १८ मे १९९७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने आणि अष्टपैलू कामगिरीने त्यांनी सिने जगतात आपलं नाव उमटवलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.