युट्युब येण्याआधी ओगलेंच रेसिपी बुक नव्या नवरीला तारणहार ठरायचं…

खाण्याचे शौकीन तर आपण सगळेच असतो. तिखट, झणझणीत भाज्या आणि जिभेवर चव रेंगाळून ठेवतील असे गोड पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतात. पण ते बनवायचं म्हंटलं की, बरेचदा हात वर केले जातात.

एकतर येत नाही ही मोठी अडचण, त्यात बनवायचं म्हंटलं की, काय किती घ्यायचं आणि घेतलं तर बनवायचं कसं आणि बनवलं तर चांगलं लागलं का, असे पाचीचे पन्नास प्रश्न पडतात.

आता आज काल तर काय यूट्यूब जमाना आहे, गुगल बाबाला सांगायचं की, रेसीपीचे हजारो व्हिडिओ एका मिनिटात आपल्या समोर येतात. पण आपण काही वर्षे मागं गेलो तर कसलं यूट्यूब आणि कसल्या रेसिपी. त्यात नवीन लग्न झालं असलं तर मोठी पंचायत.

पण अशा काळात कमळाबाई ओगले यांच्या रेसीपी बूकनं जादू केली, अशी जादू जी चार भिंतीच्या स्वयंपाक घरातून जगभरात पोहोचली. हे रेसीपी बूक म्हणजे रुचिरा. प्रत्येक नवीन सासुरवाशीणीला आपल्या माहेरून आलेलं हमखास गिफ्ट, पाककलेचे जणू दुसरे नाव.

दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला. सांगलीतल्या क्रांतीकारकांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंडल इथल्या त्या रहिवासी. गोदूबाई अनंत दांडेकर असं त्यांचं माहेरचे नाव. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात फक्त चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला.

शिक्षणात जरी हात बसला नाही तरी स्वयंपाकात मात्र, त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हतं. कमलाबाईंच्या याचं पाककलेला सर्व कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या रेसीपीचं पुस्तक छापण्याची कल्पना डोक्यात आली.

कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘रुचिरा’हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित यांच्या स्त्री सखी प्रकाशनाचं हे पहिलचं पुस्तक असल्याचं समजतं.

असे म्हंटले जाते की, मुकुंदराव किर्लोस्कर यांना वाटले होते की, पुस्तकाचा खप होणार नाही आणि ते आपल्या अंगावर पडून जाईल, ज्यामुळे आपण तोट्यात जाऊ. यावर किर्लोस्करांनी कमलाबाई आणि त्यांचे पती कृष्णाजी ओगले यांना स्पष्ट केले की, पुस्तक विकले नाही तर आमच्या प्रकाशन संस्थेला 10,000 रुपये द्यावे लागतील. यावर कमलाबाईंनी सहमती दर्शवली. पण सुदैवाने पैसे देण्याची कधीच वेळ आली नाही.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवशीचं 2100 प्रती विकल्या गेल्या. पुढे या पुस्तकाच्या खपासाठी एक ऑफर ठेवली गेली. प्री-प्रिंट ऑर्डरसाठी 15 रुपयांच्या पुस्तकावर 3 रुपयांची सूट जाहीर केली. ज्यानंतर पहिल्या 10,000 प्रती लवकर विकल्या गेल्या आणि त्यांना पून्हा पुस्तक प्रिंटींगसाठी पाठवावे लागले.

आणि अशा प्रकारे पुस्तकाला लोकप्रियता मिळत गेली पुस्तकांचा खप होत गेला आणि पुस्तकं पुन्हा पुन्हा प्रिंटिंगसाठी पाठवावी लागली. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली.

केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर, अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले.

त्यांनी पृथ्वीची ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला ! तोही तितकाच स्वादिष्ट.

या रुचिराची खासीयत म्हणजे पदार्थांच्या साहित्याचे प्रमाण तोळे-मासे ग्रॅम्समध्ये न देता आपल्या स्वयंपाकघरत असलल्या वाटी चमच्याच्या घरगुती मोजमापात दिलेले आहे. तेही सविस्तर कृती सकट. महत्त्वाचे म्हणजे स्वत: कमलाबाईं ह्याचं वाट्या चमच्यांचे घरगुती प्रमाण वापरून प्रत्येक पदार्थ करून पाहिलेला आहे.

या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत.

रूचिराच्या या पहिल्याचं यशानंतर फास्ट फूड पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या पूस्तकाचा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोहोचले. नवीन लग्न झालेल्या स्वयंपाक शिकणाऱ्या किंवा एखाद्या मराठी घरात केला जाणारा पदार्थ सहज करता यावा म्हणून हे पुस्तक घरात ठेवलं जाई.

रुचिरात बघून कोणताही पदार्थ करायला घेतला म्हणजे 100 % चांगलाचं होणार ! दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर दोन लाख सुनांची एकच आई ‘असं नाव कमलाबाईंना दिलं गेलं.

या पुस्तकात वेगवेगळ्या रेसीपी सोबतचं इतर संबंधित विषयांचे योग्य वर्गीकरण करून पुस्तकाचे भाग पाडले आहेत. तसेच पदार्थाची सजावट, मुलांना गंमत वाटेल असे पदार्थ, महाराष्ट्राबाहेरील पदार्थ, पानसुपारी विडे, संसारोपयोगी आणि व्यावहारिक उपयुक्त सूचना या महत्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण बाबींबद्दल मार्गदर्शन केले आहे. तसेच काही चूक झाल्यास काय करावे यासंबंधी सविस्तर टिप्स सुद्धा दिल्या आहेत.

तसेच ‘स्वयंपाकाला सुरवात करण्यापूर्वी’ असा स्वतंत्र भाग घालून अत्यंत उपयोगी अशी वेगवेगळे पाक, मसाले, पनीर, आधुनिक साधनांची माहिती दिलेली आहे.

फक्त महिलाचं नाही तर पुरूषांच्याही मदतीला सदैव तत्पर असलेला स्वयंपाकघरातला इष्ट मित्र म्हणणे रुचिरा.

दरम्यान, 20 एप्रिल 1999 रोजी मा.कमलाबाई ओगले यांचं पुण्यात निधन झाले.

आज, ५० वर्षांनंतरही हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या काळात अनेक रेसिपीची पुस्तक आली आणि फेमसही झाली. त्यात डिजिटलच्या या जमान्यात ऑनलाईन रेसिपी देखील उपलब्ध होतात.  पण कमलाबाई ओगले यांच्या ‘रुचिरा’ला आजही कोणी टक्कर देऊ शकलं नाही.

हे ही  वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.