आजवरच्या राजकीय इतिहासात एकच खरा किंगमेकर होऊन गेला. त्याच नाव के.कामराज

भारतात सध्या गल्लीबोळात अनेक किंगमेकर तयार झालेले आढळतात. कोण कोणाला नगरसेवक बनवतो, कोण कोणाला मंत्री बनवतो तर कोण कोणाला पंतप्रधान. ज्याला कोणतंही पद मिळत नाही तो स्वतःला किंगमेकर घोषित करून राजकारणातलं महत्व इतरांना सांगताना दिसत असतो.

पण भारताच्या आजवरच्या राजकीय इतिहासात एकच खरा किंगमेकर होऊन गेला. त्याच नाव के.कामराज.

कामराज एक असे नेता होते ज्यांच्या नावाने काँग्रेसच्या गांधी- नेहरू परिवारातली अत्यंत जवळची लोकसुद्धा मूग गिळून बसायची. इंदिरा गांधीच्या काळात त्यांच्या पुढे बोलायची कोणात हिम्मत नव्हती.  कामराज यांना कॉंग्रेस संघटनेत सुधार फॉर्म्युल्याचे जनक मानले जात होते.

कदाचित सध्याची नवीन पिढी दक्षिण भारतीय असलेले दिग्गज नेते कामराज यांना विसरली असेल, परंतु सध्या देशभरात चालू असलेल्या मिड-डे-मिल आणि विनामूल्य शिक्षणाचा पाया कामराजांनी घातला. आजच्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी नेते ज्या प्रकारे हापापलेले असतात, त्यांनी कामराज यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी. ते संघटनेला मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे नेते होते.

तमिळनाडूचे तीन वेळा मुख्यमंत्री असलेले, गांधीवादी आणि स्वातंत्र्यसेनानी कामराज यांना पंडित नेहरूंनंतर राजकारणाचा दूसरा आणि स्वतंत्र भारताचा पहिला ‘किंगमेकर’ देखील म्हटलं जातं.

तामिळनाडू मधील मदुरैतल्या विरुधुनगर येथे 15 जुलै 1903 रोजी नादर जातीमध्ये त्यांचा कामराज यांचा जन्म झाला. कामराज तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले. खालच्या पातळीवरुन राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारे कामराज साठच्या दशकात कॉंग्रेसच्या संघटनेत सुधारणा करण्यासाठी ‘कामराज योजना’ सादर करण्यासाठी प्रसिद्ध झाले.

महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव असलेले कामराज वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी कॉंग्रेसमध्ये सामील झाले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही त्यांची सक्रिय भूमिका होती, ज्यामुळे त्यांना बर्‍याच वेळा तुरुंगात जावे लागले. तुरूंगात असतानाही नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. जॉर्ज जोसेफ यांच्या नेतृत्वात ‘व्हायकॉम’ सत्याग्रहाने कामराज राजकारणाकडे झुकत होते. हरिजनांना मंदिरांमधून वगळण्याविरूद्ध जॉर्ज जोसेफच्या नेतृत्वात 1920 च्या सत्याग्रहात कामराज सहभागी झाले होते.

मीड – डे – मील योजना चालवणारा मुख्यमंत्री

13 एप्रिल 1954 रोजी पहिल्यांदा इच्छा नसतानाही मद्रास प्रांताचे (आता तामिळनाडू) मुख्यमंत्री झाल्यानंतर कामराज यांनी प्रत्येक गावात प्रायमरी स्कूल, आणि प्रत्येक पंचायतीत हायस्कूल आणि 11 वी पर्यंत मोफत आणि अनिवार्य शिक्षणाची योजना लागू केलीकेली.

त्यांच्या नेतृत्वात, स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच मिड-डे मील योजना सुरू केली गेली, त्याचबरोबर मद्रासच्या शाळांमध्ये मोफत गणवेश योजना त्यावेळीच सुरू झाली. जेणेकरून, गरीब घटकांतील मुलांना एक वेळचे का होईना पण चांगले जेवण मिळेल, असा त्यांचा विश्वास होता.

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू त्यांचे कौतुक करत असत. नेहरू एकदा म्हणाले होते की, मद्रास हे भारतातील सर्वोत्तम प्रशासित राज्य आहे. यामागे कामराज यांचे काम होते. तामिळनाडूच्या खेड्यात शेतात सिंचन आणि वीजपुरवठा या संदर्भात त्यांच्याकडे विक्रमी काम आहे, ज्यामुळे नेहरूंना त्यांची खात्री पटली. पंडित नेहरू कामराजांवर खूप विश्वास ठेवायचे.

त्यामूळेच जेव्हा काँग्रेसच्या संघटनेची पकड कमकुवत होते चालली होती, तेव्हा नेहरूंनी ही बातमी कामराज यांच्या कानावर घातली. त्यांनी नेहरूंना एक योजना दिली, ज्याला ‘कामराज प्लॅन’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी नेहरूंना सुचवले की मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी सरकारमधील पदांवरून राजीनामा द्यावा आणि कॉंग्रेसची पकज घट्ट करण्यासाठी आपला सगळा जोर लावावा.

या योजनेनुसार कामराज यांनी स्वत: 2 ऑक्टोबर, 1963 रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि लाल बहादूर शास्त्री, बिजू पटनायक, जगजीवन राम, मोरारजी देसाई आणि एस.के. पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांना राजीनामा द्यावा लागला. या योजनेंतर्गत सुमारे अर्धा डझन केंद्रीय मंत्री आणि समान संख्येच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. ही योजना ‘कामराज प्लॅन’ या नावाने प्रसिद्ध झाली.

भारतीय राजकारणात असे मानले जाते की या योजनेमुळे ते केंद्रात इतके बळकट झाले की जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनविण्यात त्यांची भूमिका किंगमेकरची होती. यानंतर ते तीन वेळा कॉंग्रेसचे अध्यक्षही होते.

भारतीय राजकारणात सत्तेशी जोडलेले राहण्यासाठी सिद्धांतांशी तडजोड करणारी अनेक उदाहरणे सापडतील. परंतु आपल्या पक्षाच्या कमकुवत मुळांच्या मजबुतीसाठी कामराज यांनी केवळ सत्ताच सोडली नाही तर नि: स्वार्थ राजकारणाची दृष्टीदेखील सादर केली. किंगमेकर कामराज यांनी कॉंग्रेसला एक नवीन दिशा दिली होती, जरी पक्षाने अजूनही शिकायला हरकत नाही.

नेहरू नंतर कोण?

1964 मध्ये पंडित नेहरूंच्या निधनानंतर जेव्हा पंतप्रधानपदासाठी दोन दावेदारांमध्ये संघर्ष सुरू झाला, तेव्हा पंतप्रधान निवडण्याचा संपूर्ण भार कामराजांच्या खांद्यावर पडला, त्यानंतर त्यांनी शास्त्री यांना पाठिंबा दिला.

जानेवारी 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाले. मोरारजी देसाई यांनी एकमत मान्य करण्यास नकार दिला, यावेळी ते मतदानाबाबत ठाम होते. सिंडिकेटने कामराज यांचे नाव पुढे केले, परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. पश्चिम बंगालचे नेता अतुल्य घोष यांना सांगितले की, त्यांना हिंदी व इंग्रजी नीट माहित नाही, त्यांनी या देशाचा पंतप्रधान होऊ नये.

कामराज यांनी पंतप्रधान पदासाठी इंदिराजींचे समर्थन केले आणि एकूण 355 खासदारांच्या पाठिंब्याने ते पंतप्रधान झाले. भारताचे दोन पंतप्रधान बनविण्यात कामराजची मुख्य भूमिका होती, ज्यामुळे त्यांना किंगमेकर म्हटले जाते.

‘किंगमेकर’ कसा कमकुवत झाला?

1967 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बर्‍याच राज्यात पराभव पत्करावा लागला आणि लोकसभेत त्यांना फक्त 285 जागा मिळाल्या. कामाराज यांना तामिळनाडूतील विरुनगरमधील आपली विधानसभा जागा वाचवता आली नाही, त्यानंतर इंदिरा गांधींनीही त्यांना किनाऱ्यावर आणायला सुरवात केली.

यानंतर कामराज यांनी केंद्राचे राजकारण सोडले आणि तामिळनाडूकडे वळले. 1971मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुका जिंकल्या, परंतु संघटनेच्या बहुतेक नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

2 ऑक्टोबर 1975 रोजी गांधी जयंतीवर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते 72 वर्षांचे होते. त्यानंतर 1976 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.