५० गुंठ्यात कष्टाने फुलवलेला कडीपत्ता थेट लंडनच्या बाजारपेठेत विकला.

एकदा ठरवलं न कि आपले नाव आपण फक्त आपल्या देशात नाही तर सातासमुद्रापारही पोहचवू शकतो, पण त्यासाठी जिद्द आणि अपार कष्ट करण्याची मनाची तयारी हवी.  हि बाब तंतोतंत लागू होते ते, साताऱ्याच्या कांचन कुचेकर यांना.  त्याचं कारणही तसंच खास आहे.

तुम्ही कधी विचार केला आहे का, की महाराष्ट्रातल्या कडीपत्त्याला सातासमुद्रापार इतकी मागणी असेल?

हो आपल्या कांचनताई सात्विक सेंद्रिय कडीपत्त्याला सातासमुद्रापार निर्यात करणाऱ्या एक यशस्वी कृषी उद्योजिका आहेत. मूळच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रेवडी या छोट्याशा गावात कांचन कुचेकर ह्या सेंद्रिय शेती करतात. अतिशय कष्टाळू आणि शेतीची आवड असणाऱ्या कांचन कुचेकर यांनी कडीपत्याची शेती करण्याचे कसं काय सुचलं असा प्रश्न पडला असेल.

‘विषमुक्त माती व विषमुक्त अन्न’ हा एकच ध्यास घेऊन त्या त्यांच्या  शेतामधून निर्यातक्षम  धारवाड 2 या कडीपत्ता वाणाचे निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत. 50 गुंठ्याच्या आपल्या शेतातील पिकाचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी दशपर्णी अर्क, जीवामृत आणि शेणखताचा त्या वापर करतात. मग त्या कडीपत्त्यावर प्रक्रिया करून त्याचे पावडर त्या इंग्लंडच्या बाजारपेठेत विक्रीसाठी निर्यात करतात. 

आपल्याला कडीपत्त्याची पाने फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच वापरली जातात असं वाटत असलं तरीही कडीपत्ता हा फक्त एक मसाल्याचा पदार्थ नसून त्याचा औषध म्हणून देखील उपयोग होतो. साधारणपणे कडीपत्त्याचा वापर जेवण अधिक रुचकर व्हावं यासाठी केला जातो. पण कडीपत्त्यामध्ये असणारे अनेक औषधी घटक शरीरासाठी उपयोगी असतात.

कडीपत्ता ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या पानांमध्ये antioxidant (ॲंटिऑक्सिडन्ट), ॲंटि-डायबेटिक (anti-diabetic), ॲंटिमायक्रोबियल (antimicrobial), ॲंन्टि-इन्फ्लेमेटरी (सूजप्रतिबंधक) गुण असतो. हेच औषधी गुण ओळखून कांचन यांनी कडीपत्त्याची शेती करण्याचे ठरवले.

सध्या बाजारात कडीपत्त्याची पाने 20/30 रुपये किलो दराने विकली जातात. पण कडीपत्त्याचे पानं फार दिवस टिकत नाहीत, फ्रिजमध्येपण ताजे राहत नाही आणि बाहेरही बरेच दिवस नाही राहत नाही. परंतु हे पान वाळवले तर जास्त दिवस वापरता येतात आणि त्याचा सुगंधही टिकून राहतो. म्हणून त्याची पूड करून विकावी असे त्यांना सुचले आणि त्या कामाला लागल्या. ही कडीपत्त्याची पावडर पिशवीबंद करून ही पावडर २० रुपये ५० ग्रॅम दराने विकली जाते.

शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतीच्या आवडीबरोबरच शेतीचे बाळकडू देखील आई-वडिलांकडून मिळाले. आणि पती हनुमंत कुचेकर यांची मोलाची साथ मिळाली.

सुरुवातीला त्या कडीपत्ता तालुक्याच्या, गावाच्या बाजारात विकायच्या परंतू त्यांना चांगला भाव मिळत नसायचा. धारवाड कृषी विद्यापीठाशी संपर्क साधून साताऱ्यातील रगाडे बापू यांच्याकडून त्यांनी कडीपत्त्याची रोपे मिळविली.  त्यावेळी कुचेकर यांनी ५० गुंठ्यात १ टनाहून अधिक उत्पन्न घेतले. त्यावेळी त्यांनी कडीपत्त्याची पाने मुंबईच्या एका व्यापाऱ्याला कमी भावात विकली.

पुढे देखील व्यापाऱ्यांनी त्यांना चांगला भाव देऊ न केल्यामुळे, शेवटी कडीपत्ता ही वाया जाऊ नये म्हणून शेवटी कांचन ताई यांनी स्वतःचाच उद्योग सुरु करायचे ठरवले.

त्यांना याबद्दलचे मार्गदर्शन कृषी खात्याकडून मिळाले असल्याचे त्या सांगतात. पारंपरिक कडीपत्त्याची पाने विकण्यापेक्षा प्रक्रिया करून त्याची पावडर केली तर उत्पन्नात वाढ होईल, असा सल्ला पणनतज्ज्ञ सायली महाडिक यांनी दिला. ‘आत्मा’ने त्यांना रोपांची काळजी, काटणी यापासून विपणन अशा सर्व पातळ्यांवर मार्गदर्शन केले.

त्या अल्पभूधारक शेतकरी असून सुरुवातीला त्यांनी कडीपत्ता या पिकाची निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी कर्नाटक राज्यातून धारवाड २ या कडीपत्ता वाणाची निवड केली. आणि 1 एकर 8 गुंठे शेत जमिनीवर लागवड सुरु केली.  आणि सेंद्रिय शेती गटाच्या माध्यमातून आत्मा अंतर्गत निर्यातक्षम प्रमाणपत्र प्राप्त केले. 

आपल्या मुलीच्या नावाने रेवडी यां गावात ‘प्रगती फूड्स’ उद्योग सुरु केला आणि ‘सात्विक ग्रीन गोल्ड’ या नावाने  आपला ब्रँड बाजारामध्ये आणला.

कुचेकर यांनी कडीपत्त्याची पाने पहिल्यांदा मुंबईच्या बाजारात विक्रीस पाठवली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील एका कंपनीत पाने विकायला पाठवली जायची. त्यानंतर पुण्यातील काही मॉलमध्ये त्यांनी कडीपत्ता पावडर विक्रीस ठेवली आणि विस्तार वाढत गेला आणि आता सातासमुद्रापार लंडनला त्यांची पावडर जात आहे.

आपले प्रॉडक्ट इतर ठिकाणी आणि परदेशीं पोहचवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे परवाने त्यांनी शासन पातळीवरुन मिळवले.  निर्यातक्षम कडीपत्ता उत्पादन त्यांनी घेतले व इंग्लंडच्या बाजारपेठेमध्ये देखील त्यांनी आपला कडीपत्ता पावडर करून तसेच कडीपत्त्याची पाने ड्राय करून पाठवली. तेथील बाजारपेठेत याची मागणी वाढत गेली तसा उद्योग ही वाढत गेला.

सुरुवातीला त्यांच्याकडे फारसं भांडवल नव्हतं त्यामुळे त्या कडीपत्ता मिक्सर मधून बारीक करायच्या. सुरुवातीला स्वतः सगळी प्रक्रिया त्या करायच्या, प्रदर्शनामध्ये त्या विक्रीसाठी त्या स्टॉल लावायच्या, फूड मॉल ला ठवण्यामुळे त्यांना अनेक मसाल्यांच्या कंपन्यांकडून त्यांना ऑर्डर येत गेल्या. टन च्या मापदंडातून त्यांना ऑर्डर दिल्या जायच्या  असं करत करत यां माध्यमातून हळहळू पैसे साठवून त्यांनी हिट पंप, पल्वरायझर विकत घेतलं आणि शून्यातून भांडवल उभा केलं!

कशी केली जाते प्रक्रिया?

दर तीन महिन्यांनी कडीपत्त्याची कापणी केली जाते. हनुमंत कुचेकर, पत्नी कांचन आणि बहीण संजीवनी या दोघीही दिवसाला दहा किलो कडीपत्त्याची पावडर करतात.

ताजा कडीपत्ता धुवून त्याची पान तेवढी वाळवण्यासाठी सोलर ड्रायर मध्ये ठेवली जातात. त्यांनी साडे सहा लाख किंमतीचा हा हिट पंप ड्रायर गुजरातवरून मागवला. त्याचे थोडक्यात वैशिष्ट्य असं की, हा हिट पंप ड्रायर फळे किंवा भाजीपाला जसा नैसर्गिकरित्या वाळवला जातो त्याचप्रमाणे अवघ्या 4 तासात वाळवतो. त्यामुळे फळे किंवा भाज्यांची गुणवत्ता, चव आणि रंगात कसलाही फरक पडत नाही ना, कसलाही त्याचा साईड इफेक्ट होत नाही.

ड्रायर मध्ये 4 तास कडीपत्ता ड्राय करून घेतल्यानंतर त्याची गिरणीमधून (पल्वरायजर) बारीक पावडर केली जाते आणि 25ग्रॅम, 50 ग्रॅम च्या पॅकेट मध्ये पॅकिंग केली जाते. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरणं फार सोपं नसल्याचेही त्या म्हणतात, प्रॉडक्ट परदेशात पाठवायचं म्हणजे, तेथील बाजारपेठेचा अभ्यास असावा लागतो, योग्य किंमती, आकर्षक तसेच हवाबंद पॅकिंग, त्यावर त्या प्रॉडक्ट ची माहिती, त्यातील उपयुक्त घटकांची माहिती, लेबल, ब्रँड लोगो इथपासून ते परकीय चलनाचे ज्ञान असणे इथपर्यंत माहिती असणे आवश्यक असल्याच्या त्या सांगतात. तसेच फूड प्रोसेसिंग मध्ये स्वच्छता आणि सुरक्षितता बाळगणे आणि प्रॉडक्ट क्वालिटी मेंटेन करणे सर्वात जास्त महत्वाचे आहे असे त्या आठवणीने नमूद करतात.

व्यवसाय क्षेत्रात महिलांच्या सहभागाविषयी त्या बोलतात की, महिलांना उद्योग -व्यवसायात उतरण्याकरता कुटुंबाचा पाठिंबा आणि त्याचबरोबर भांडवल उभारणे ह्या दोन गोष्टी शक्य असतील तर प्रत्येक महिला यशस्वी उद्योजिका होऊ शकते!

शासनाच्या सर्व आयात निर्यात निकषांवर खरे उतरल्यानंतर त्यांचा कडीपत्ता आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकला जातोय ही महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.

  • भिडू मोहिनी जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.