मेरिल स्ट्रीप अभिनयात लिजंड आहेच, पण थेट राष्ट्राध्यक्षांना नडायला मागं-पुढं बघत नाहीत…

बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत. सध्या देशातील सर्वात वादग्रस्त आणि चर्चेत असलेलं नाव. तिच्या बाबतीत एक वाद निवळतो तो पर्यंत दुसरा वाद सुरु होतो, असं आजवरचा इतिहास दिसून येतो. मागच्या आठवड्यात परदेशातून शेतकरी आंदोलनाला मिळालेल्या पाठिंब्यावर उत्तर देताना कंगना सर्वात आघाडीवर होती. तो मुद्दा शांत होतो तो पर्यंत आज तिने दुसरा वाद ओढवून घेतला आहे.

कंगनाने ट्विटमधून स्वतःची तुलना हॉलीवुडच्या दिग्गज अभिनेत्री मेरिल स्ट्रीप आणि गल गदोत यांच्याशी केली. एवढ्यावरच न थांबता तिने स्वतःला ब्रम्हांडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणून घोषित केलं.

मेरिल स्ट्रीप ज्या पद्धतीने आपला अभिनय सादर करतात अगदी तसंच टॅलेंट माझ्यामध्ये आहे. आणि हो, माझ्यामध्ये ग्लॅमर आणि ऍक्शन देखील आहे, एकदम गल गदोत यांच्यासारखी, असं कंगना म्हणाली होती.

 

पण यानंतर सोशल मीडियावर कंगनाला प्रचंड ट्रोल करायला सुरुवात झाली. यात ज्या मेरिल स्ट्रीप यांच्याशी तिने स्वतःची तुलना केली, त्यांच्या एवढ्या महान अभिनेत्री न कधी झाल्या न कधी होतील असं टीकाकारांनी कंगनाला सुनावलं आहे.

मात्र असं नेमकं काय कारण आहे की कंगनाला ही तुलना महागात पडली?

तर पहिली गोष्ट म्हणजे मेरिल स्ट्रीप या १७ वेळच्या ऑस्कर नामांकित आणि ३ वेळच्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्री आहेत.

मात्र एखाद्या माणसाचं मोठेपण हे त्याला मिळालेल्या पुरस्कारांच्या पलीकडचे असते. त्या केवळ दिग्गज अभिनेत्रीच नव्हत्या तर वेळ पडल्यावर थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नडण्याची ताकद त्या ठेवायच्या.

आता ते प्रकरण नेमकं काय होतं हे पुढे सांगणारच आहे, पण त्या आधी मेरिल स्ट्रीप यांच्याविषयी थोडं सांगतो.

१९४९ मध्ये जन्म झालेल्या मेरिल स्ट्रीप यांना अभिनयाचे बाळकडू घरी आईकडूनच मिळाले, पुढे १९७० च्या दशकात अभिनयाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्यांनी कॉलेजमधूनच अभिनयाला सुरुवात केली. १९७७ साली जूलिया या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं.

पुढे आपल्या कारकिर्दीत त्यांनी आउट ऑफ आफ्रिका, डेथ बिकम्स हर, द ब्र‍िजेज ऑफ मॅड‍िसन काउंटी, ऍडप्शन, द हार्स, द डेव‍िल वियर्स प्राडा, डाउट, मामा मिया, जूली ऍण्ड जूलिया, इट्स कॉम्प्लीकेटेड, इंटू द वुड्स, द पोस्ट, लिटिल विमेन यासारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

मेरिल स्ट्रीप यांची दुसरी ओळख म्हणजे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब या पुरस्कारांच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा नामांकित झालेल्या अभिनेत्री आहेत. मेरिल स्ट्रीप यांना २१ वेळा ऑस्करसाठी नामांकित केलं गेलं आहे आणि ज्याच्यात ३ वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला देखील आहे.

त्यांना पहिला ऑस्कर १९८० साली ‘क्रेमर वर्सेज क्रेमर’ यासाठी मिळला होता. त्यानंतर १९८३ साली ‘सोफीज चॉइस’ या चित्रपटासाठी त्यांना दुसरा ऑस्कर आणि २०१२ मध्ये ‘बार द आयरन’ या चित्रपटासाठी तिसरा ऑस्कर मिळाला आहे.

याच्यासोबत गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी ३२ वेळा नामांकित होण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.  त्यातील तब्बल ९ वेळा त्यांनी हा पुरस्कार प्राप्त केला आहे. सोबतच त्यांचं नाव ५ वेळा ग्रॅमी पुरस्कारांना नामांकित झालं आहे.

अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजवलेल्या मेरिल स्ट्रीप प्रसंगी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील नडल्या होत्या.

झालं असं होतं की, ट्रम्प यांनी २०१७ मध्ये स्थलांतराचा मुद्दा उपस्थित करत हॉलिवूडला लक्ष केलं होतं. यावर मेरिल स्ट्रीप यांनी त्यावर्षींच्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना उत्तर दिलं होतं.

त्या म्हणाल्या होत्या,

आपण कोण आहोत, आणि हॉलीवुड काय आहे? ही एक अशी जागा आहे जिथं अन्य ठिकाणांहून लोक आली आहेत, त्या सर्वांनी हॉलिवूड बनवलं आहे. मी स्वतः न्यू जर्सी मध्ये लहानाची मोठी झाली आहे. तर सारा पॉलसन, सारा जेसिका पार्कर, अँमी एडम्स, नताली पोर्टमॅन, रूथ नेगा, वायोला डेविस, देव पटेल आणि रेयान रेनॉल्ड्स हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जन्मले आहेत.

हॉलिवूड बाहेरच्या आणि विदेशी लोकांनी भरलं आहे, आणि जर तुम्ही आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं तर तुमच्याजवळ फुटबॉल आणि मिक्स्ड मार्शल आर्ट शिवाय काहीच शिल्लक राहणार नाही. आणि हे दोन्ही प्रकार कलांमध्ये मोडत नाही.

त्यावर ट्रम्प यांनी उत्तर देताना म्हणाले,

स्ट्रीप हॉलीवुडच्या ओवररेटेड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या मला ओळखत देखील नाहीत, पण तरीही त्यांनी माझ्यावर टीका केली होती.

त्यानंतर २०१८ मध्ये हॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींनी शारीरिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्राध्यक्षांची पत्नी म्हणून मेलानिया ट्रम्प यांनी बोलणं अमेरिकेतील नागरिकांना अपेक्षित होतं, पण बरेच दिवस त्या काहीच बोलल्या नव्हत्या.

त्यांच्या या शांततेवर न्यूयॉर्क टाइम्स दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मेरिल स्ट्रीप म्हणाल्या होत्या,

मी मेलानिया ट्रम्प यांच्या शांततेबद्दल जाणून आहे. पण हे मला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. ते जे काही म्हणतील ते नक्कीच महत्वाचं असणार आहे, सोबतच इंवाकाने देखील यावर आपलं मत व्यक्त करायला हवं.

या पलीकडे जाऊन मेरिल स्ट्रीप या हॉलीवुडच्या त्या ३०० महिलांपैकी एक आहेत ज्यांनी टाइम्स अप या आंदोलनाची सुरुवात केली होती. या आंदोलनाचा उद्देश सगळ्या उद्योगांमध्ये काम करत असलेल्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळवून देणे हा होता.

त्यामुळे मेरिल स्ट्रीप या अभिनयामध्ये लिजंड आहेतच यात तीळमात्र शंका नाही, पण त्या चुकीच्या गोष्टींवर थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील नडायला मागं-पुढं बघत नाहीत हे विशेष.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.