वडीलांनी गिफ्ट म्हणून अंगठी दिली, पोरीनं तिच अंगठी वडीलांची सुपारी द्यायला वापरली

काही काही केस अशा असतात, ज्या सोडवायला पोलिसांना कित्येक वर्ष लागतात. तर काही काही अशा असतात, ज्यात आरोपी ढिगानं चुका करतात आणि किरकोळीत घावतात. पण तिसरा पार्ट असतो, तो म्हणजे एखादी केस उलगडते आणि त्यानंतर लक्षात येतं की, ही केस इतकी साधी सरळ नाहीये.

झारखंडच्या जमशेदपूरमध्ये अशीच एक केस झाली होती, जिचा उलगडा पोलिसांनी केला पण खरा आरोपी समोर आला तेव्हा त्यांचेही धाबे दणाणले होते.

कन्हैय्या सिंग नावाचा जमशेदपूरमधला एक ठेकेदार. मजबूत पैसा, राजकीय ताकद, माजी आमदाराचा मेव्हणाच, स्वतः सोबत कायम बॉडीगार्ड बाळगणारा माणूस. पण याच माणसाचा त्याच्याच घराच्या दारात गोळ्या झाडून खून करण्यात आला.

माणूस पॉवरफुल होता, त्यामुळं बातमी पसरायला वेळ लागला नाही. पोलिसात बातमी पोहोचली, राजकीय नेत्यांनी आपली ताकद लावली. पोलिसांनी तपास करण्याआधी बॅकग्राउंड पाहिलं, खंडणी, हेवेदावे, जमिनीचे वाद कसलाच सुगावा लागला नाही. पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी केली, त्यांनीही कुणावर संशय असल्याचं सांगितलं नाही.

पोलिस आपल्यापरीनं तपास करत होते, पण तपासाला ठोस दिशा मिळत नव्हती. राजकीय नेत्यांनी दबाव टाकायला सुरुवात केली. ज्या आदित्यपूरमध्ये ही घटना घडली, तिथल्या लोकांनी पोलिसांविरोधात आंदोलन केलं, मोर्चे काढले. दबाव वाढत चालला होता, पण कॉल रेकॉर्ड चेक करुनही माहिती काय मिळेना.

मग पोलिसांनी पुन्हा एकदा आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक करायला घेतले, तेव्हा त्यांना एक माणूस संशयास्पद रित्या पाळताना दिसला. त्याचा चेहरा क्लिअर दिसत नव्हता, मात्र तरीही त्यांनी रेकॉर्ड तपासून सूत्र हलवली.

हा पळणारा माणूस होता, निखिल गुप्ता. 

निखिल रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार आणि शुटर होता. त्यात ज्या रात्री मर्डर झाला, त्यारात्री तो आपलं लोकेशन वारंवार बदलत राहिला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शहर सोडून गायब झाला. एवढी गोष्ट त्याच्यावर संशय घ्यायला पोलिसांना पुरेशी होती.

पण विषय असा होता की, निखिल गुन्हेगार असला तरी कन्हैया सिंगसारख्या पॉवरफुल माणसाला मारेल इतकी ताकद त्याच्यात नव्हती. त्यामुळं पोलिसांनी निखिलचे कॉल चेक करायला सुरुवात केली. त्याच्यात एक माणूस होता राजवीर सिंग. जेव्हा कन्हैया सिंगची हत्या झाली, तेव्हा या दोघांमध्ये सारखं बोलणं होत होतं.

पोलिस आता या दोघांच्या तपासाला लागले, त्यांनी निखिलला वाराणसीवरुन उचललं. आधी गडी नाही म्हणला, पण पोलिसांनी हिसका दाखवताच त्यानं कबुली दिली. सोबतच आणखी एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे कन्हैया सिंगनं आपल्या घराच्या आजूबाजूला फिरतो म्हणून निखिलला धमकावलं होतं. पण त्यानं ही हत्या या कारणामुळं केली नाही. त्याला कन्हैया सिंगला मारायची सुपारी देण्यात आली होती.

सुपारी देणारा होता राजवीर सिंग, ज्याच्यासोबत निखिलचं हत्येच्या रात्री बोलणं होत होतं…

पोलिसांनी कोलकात्यामधून राजवीरला अटक केली, पण राजवीर आणि कन्हैयामध्ये काय कनेक्शन होतं?

राजवीर आधी कन्हैया राहायचा त्याच आदित्यपूरमध्ये राहायचा, तेही अगदी जवळ. पण मेन विषय असा होता की कन्हैया सिंगची मुलगी अपर्णा आणि राजवीर हे दोघं आठवीत असल्यापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि ही गोष्ट कन्हैया सिंगला समजली होती. त्यानं राजवीरला बेक्कार हाणला, तेही एकदा नाही तर अनेकवेळा. त्यात मेव्हण्याच्या नावानं जीवे मारण्याची धमकीही दिली. कन्हैयाच्या याच दहशतीला घाबरुन राजवीरनं आदित्यपूरमधलं घर सोडलं होतं.

राजवीरनं सुपारी दिल्याचं आणि निखिलनं खून केल्याचं कबूल केलं. पण तरीही केस पूर्णपणे सुटली नव्हती.

कन्हैयाचा खून करण्यासाठी तो कुठल्या वेळेत घरी येतो, तो आत्ता कुठं आहे याची माहिती मिळणं गरजेचं होतं. निखिल आणि राजवीरला ही माहिती कुणी दिली ? निखिलला सुपारी द्यायला राजवीरकडे पैसे कुठून आले ? या गोष्टींचा उलगडा होणं बाकी होतं. ज्यावेळी पोलिसांनी राजवीरचे कॉल रेकॉर्ड चेक केले, तेव्हा त्यांना या गोष्टीची पुसटशी कल्पना आली.

कन्हैयाची हत्या झाली, त्याच्या थोडं आधी राजवीरला कन्हैयाची मुलगी अपर्णानं वारंवार कॉल केले होते. साहजिकच पोलिसांचा संशय तिच्यावर बळावला. मग पोलिसांनी तिच्याविरुद्ध पुरावे गोळा करायला सुरुवात केली, तिच्या कुटुंबाची राजकीय शक्ती बघता थेट तिची चौकशी करणं अवघड होतं.

मग पोलिसांना एक पुरावा सापडला, तो म्हणजे अपर्णाची अंगठी. जी मिळाली हत्येची सुपारी घेणाऱ्या निखिलकडे. या पुराव्यावरुन त्यांना सगळ्या केसचा उलगडा झाला.

कन्हैयाला अपर्णा आणि राजवीरच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळल्यापासून त्याचा या गोष्टीला विरोध होता. मारुन, समजावूनही हे दोघं ऐकत नव्हते. त्यामुळं त्यानं अपर्णाचं लग्न लावायचं ठरवलं. अपर्णाला काय हे पटलं नाही आणि तिनं आपल्या वडिलांनाच मारायचं ठरवलं. पण सुपारी द्यायला पैसे नव्हते म्हणून तिनं आपल्या बॉयफ्रेंड राजवीरच्या माध्यमातून निखिलला एक लाखभर रुपयाची अंगठी दिली.

निखिलचीही कन्हैया सोबत दुष्मनी होतीच आणि राजवीरचीही, त्यामुळं या तिघांनी एकत्र येत कन्हैयाची हत्या घडवून आणली. दुर्दैव इतकंच होतं की, ज्या अंगठीचा वापर अपर्णानं सुपारी देण्यासाठी केला ती अंगठी तिचे वडील कन्हैया यांनी तिला गिफ्ट म्हणून दिली होती.

बाप मुलीच्या नात्याचा असा दुर्दैवी अंत झाला होता…

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.